घरफिचर्ससारांशसिंधू नदी : प्राचीन सभ्यतेची साक्षीदार

सिंधू नदी : प्राचीन सभ्यतेची साक्षीदार

Subscribe

मानसरोवराजवळ खोल हिमालयात उगम पावणार्‍या अतिप्राचीन आणि मूळ संस्कृतीचा उद्घोष करणारी सिंधू नदी जी तब्बल तीन देशांतील जनमानसांची भरण-पोशिनी आणि अमृतदायिनी आहे. अर्थातच तिच्या पावित्र्याची जबाबदारी या तीनही देशांची आहे, परंतु मानवाच्या स्वार्थाला परिसीमा आहेत कुठे? जीवनदायिनी सिंधूच्या कासेला बिलगलेल्या तीनही देशांतील सरकारे आणि प्रजेने मात्र सिंधूला प्लास्टिकचा डोह बनवून टाकले आहे. पाकिस्तान जो सर्वात जास्त तिच्या पाण्याचा लाभ घेतो त्याने सिंधूच्या दुर्दशेची कोणतीच मर्यादा ओलांडण्याचे बाकी ठेवलेले नाही.

-संजीव आहिरे

सिंधू नदी एक आश्चर्यजनक नदी आहे. जगातील सर्वात लांब २००० मैल (३२०० किमी) वाहणारी ही नदी चीन, भारत आणि पाकिस्तान या तीन देशांच्या मोठ्या भूभागावरून वाहते. त्यामुळे या तीनही देशांचा सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा सिंधू नदीला आहे म्हणून ती एक अनन्यसाधारण नदी आहे. विविध देश, धर्म आणि प्रांताप्रांतातून वाहताना त्या त्या भौगोलिक आणि सांस्कृतिकतेला जन्म देणारी ही नदी भिन्न-विभिन्न संस्कृतींचा मिलाफ घडवत, काठावरच्या कोटी कोटी निवासी जनसंख्येला पोसत आणि तीन देशांचा प्रचंड मोठा भूभाग सुजलाम सुफलाम् करीत पाकिस्तानात अरबी समुद्राला मिळते.

- Advertisement -

उगम – हिमालयातील नैऋत्य तिबेट या स्वायत्त प्रदेशात मापाम सरोवराजवळ कैलास पर्वताच्या उत्तर भागात १८००० फूट उंचीवर या नदीचा जन्म होतो. हे उगमस्थान मानसरोवराच्या उत्तरेस १०० किमी अंतरावर ५५०० मीटर उंचीवर आहे. उगमापासून हिमालयाच्या उतारावरून वायव्य दिशेला २५० किमी अंतर वाहत येऊन ती गार नदीला मिळते. २५० किमीचा हा प्रवाह सिंग-क-बाब किंवा सिंग-गे -चू या नावाने ओळखला जातो. पुढे आग्नेय दिशेकडून ती भारताच्या जम्मू-काश्मीर राज्यात प्रवेश करून वायव्य दिशेकडे वाहू लागते. काश्मीरमध्ये उत्तरेकडील लडाख पर्वत शृंखला व दक्षिणेकडील झास्कर पर्वत शृंखला यादरम्यानच्या खोल घळीतून वाहताना लेहजवळ तिला झास्कर नदी येऊन मिळते.

यापुढे श्योक, खेटाश्यो या उपनद्यांना सोबत घेत काराकोरम पर्वत शृंखलेच्या पायथ्याजवळ गिलगीट नदीला घेत एक मोठे वळण घेऊन नैऋत्य वाहिनी बनते. सिंधू नदीच्या ह्या खोल घळीच्या पात्रामुळे हिंदुकुश ही हिमालयाची पर्वतरांग मूळ हिमालयापासून दुभागली गेली आहे. जम्मू-काश्मीरमधून असा रोमांचक प्रवास करीत सिंधू नदी उत्तरेकडून पाकिस्तानात प्रवेश करते. पुढे दक्षिण दिशेचा वेध घेत हिमालयाच्या कडेकपारीतून, दर्‍याखोर्‍यातून १६६५ किमीचा प्रवास करून अटकजवळ पर्वतीय प्रदेशातून ती बाहेर पडून पंजाबच्या पठारी प्रदेशात येते.

- Advertisement -

इतिहास – सिंधू नदीची प्राचीनता तिच्या खोर्‍यात वसलेल्या ईसा पूर्व ३३०० वर्षे प्राचीन हडप्पा आणि मोहिंजदडो येथील उत्खननात सापडलेल्या प्राचीनतम संस्कृतीच्या अवशेषावरून लक्षात येऊ शकते. ही प्राचीन संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती आहे. हिंदुस्तानचा निर्देश करणारा हिंदू हा शब्द सिंधू या शब्दातूनच उगम पावला आहे. यावरून हिंदू अर्थात सिंधू संस्कृती किती प्राचीन आहे आणि सिंधूचे खोरे त्याहून किती प्राचीनतम आहे याची कल्पना येते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीला सनातन संस्कृती म्हटले जाते. वैदिक साहित्यातही बर्‍याच ठिकाणी सिंधू नदीचा नामोल्लेख आला आहे. ऋग्वेदात सिंधू शब्द काही ठिकाणी सिंधू नदी तर काही ठिकाणी सागर या अर्थाने वापरल्याचे आढळून येते. आर्य लोक सिंधू नदीला पूजनीय मानत असत.

सिंधूच्या किनार्‍यावरील भाषा प्रवाह – सिंधू नदीचा प्रवाह तीन देशांतून सळसळत वाहतो. सहाजिकच तिच्या किनार्‍यावरील संस्कृती आणि भाषांची विविधता मोठाच रंजक आणि अभ्यासाचा विषय आहे. सिंधूच्या वरच्या भागात राहणारे तिबेटी, लडाखी आणि बाल्टी लोक तिबेटी भाषा बोलतात आणि बौद्ध धर्माचे पालन करतात. त्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालनाचा आहे. सिंधू खोर्‍यातील इतर रहिवासी इंडो-युरोपियन भाषा बोलतात आणि इस्लाम धर्माचे पालन करतात.

काश्मीरच्या पर्वतीय रांगांमधील लोकांची डार्दिक भाषा आहे, तर हुंझा नदीच्या खोर्‍यातील बुरुशो बुरुशास्की भाषा बोलतात. पश्तो बोलणारे पश्तून, पंजाबी बोलणारे पंजाबी, राजस्थानी, हरियानवी आणि पाकिस्तानी बोलणारे लोक कृषक व्यवसाय करीत सिंधूच्या समृद्ध तटांवर आपापल्या बोलीभाषा आणि संस्कृतीचे सिंचन करीत जीवन जगतात. एकंदरीत सिंधू नदीचे तट विविध धर्म, संस्कृती, चालीरीती, भाषा यांनी गजबजलेले बहुआयामी आणि वैविध्याने भारलेले तट आहेत. सिंधू बहुरंगा आणि प्राचीनतम आहे.

जलसिंचन – सिंधू नदीची गणना जगातील जलसिंचनासाठी सर्वाधिक उपयोग केल्या जाणार्‍या नद्यांमध्ये केली जाते. नदीच्या पाण्याचा सर्वाधिक भाग पाकिस्तानमध्ये जातो. पाकिस्तानात या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचन व जलविद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी केला जातो. सक्कर, कोटरी व टार्बेला ही प्रचंड साठ्याची धरणे पाकिस्तानच्या जमिनीला सुजलाम सुफलाम् बनवतात. सिंधू नदी हाच पाकिस्तानला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्त्रोत आहे.

सिंधू ही पाकिस्तानची जीवनरेखा आहे. ईजिप्तमध्ये जसे नाईल नदीला महत्त्व आहे तसेच महत्त्व पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे आहे. सिंधूचे खोरे हेच तेथील कृषी क्षेत्र असून गहू, मका, तांदूळ, तृणधान्य, कापूस, खजूर व फळे या पिकांचे उत्पादन या खोर्‍यातच घेतले जाते. पाकिस्तानची प्रमुख शहरे कराची, कोत्री, ठत्ठा, केंटा, हैदराबाद, सेहृन, सक्कर, रोहरी, मिठान कोट या तीरावरील प्रमुख शहरांची ती जीवनधारा आहे.

भारतातील पाणलोट क्षेत्र – सिंधू नदीचे भारतातील पाणलोट क्षेत्र २७.५६ टक्के आहे. त्यापैकी ६० टक्के जम्मू व काश्मीरमध्ये, १६ टक्के हिमाचल प्रदेश, १६ टक्के पंजाब, ५ टक्के राजस्थान व ३ टक्के हरियाणात आहे. सिंधू सदानिरा नदी असून पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा प्रचंड जलौघ धारण करते. हिवाळ्यात हिमशिखरे गोठत असल्यामुळे प्रवाहात कमालीची घट होते, तर उन्हाळ्यात हिमशिखरे वितळून तिच्या प्रवाहाला कमालीची धार चढते.

देशाची फाळणी आणि सिंधूचे पाणी – भारताच्या फाळणीचा सर्वात मोठा परिणाम हिंदुस्तान प्रांतावर झाला आहे. फाळणीमुळे सिंधू खोर्‍याचा सर्वाधिक भाग पाकिस्तानात गेला. सहाजिकच त्याचा लाभ पाकिस्तानला झाला आहे. भारत आणि त्यावेळच्या पश्चिम पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सिंचन व्यवस्था कमी झाली. बारी-दोआब आणि सतलज खोरे या प्रकल्पांच्या पाण्याच्या विभागणीमुळे पाकिस्तानचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ लागला. त्यातून निर्माण झालेला वाद बरीच वर्षे चिघळत राहिला. शेवटी जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० साली सिंधू जल करार करण्यात आला.

प्रदूषण – मानसरोवराजवळ खोल हिमालयात उगम पावणार्‍या अतिप्राचीन आणि मूळ संस्कृतीचा उद्घोष करणारी सिंधू नदी जी तब्बल तीन देशांतील जनमानसांची भरण-पोशिनी आणि अमृतदायिनी आहे. अर्थातच तिच्या पावित्र्याची जबाबदारी या तीनही देशांची आहे, परंतु मानवाच्या स्वार्थाला परिसीमा आहेत कुठे? जीवनदायिनी सिंधूच्या कासेला बिलगलेल्या तीनही देशांतील सरकारे आणि प्रजेने मात्र सिंधूला प्लास्टिकचा डोह बनवून टाकले आहे.

पाकिस्तान जो सर्वात जास्त तिच्या पाण्याचा लाभ घेतो त्याने सिंधूच्या दुर्दशेची कोणतीच मर्यादा ओलांडण्याचे बाकी ठेवलेले नाही. पाकिस्तानच्या सर्व प्रमुख शहरांच्या गटारी कोणत्याही प्रक्रियेविना सिंधूच्या पाण्यात मिसळतात. याशिवाय सर्वात मोठा प्रश्न आहे नदीत सोडल्या जाणार्‍या प्लास्टिकचा. गेल्या कित्येक वर्षांपासून सर्व नागरी वस्त्यांतून प्लास्टिक एवढ्या प्रचंड प्रमाणात नदीत सोडले जाते, ज्यामुळे सिंधू नदी प्लास्टिक प्रदूषणासाठी जगातील दुसर्‍या क्रमांकाची बदनाम नदी ठरली आहे.

या विक्राळ होत चाललेल्या स्थितीला आणि माणसांच्या स्वार्थी प्रवृत्तीला पाहून पुन्हा पुन्हा नद्या सागरांना शाप की वरदान हा एकच प्रश्न सतावू लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर सर्व देशांतील राजनेत्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात नदीच्या धोरणाचा मुद्दा समाविष्ट आहे की नाही आणि त्यावर अंमलबजावणी होते की नाही हे तपासून पाहण्याची जनतेवर वेळ आली आहे, अन्यथा प्रकृती कुठपर्यंत माफ करीत राहणार?

सिंधू तेरे बिंदू बिंदू में समाया समस्त सिंधू हैं
सिंधू माँ तेरे कारण ही हम कहलाते आज हिंदू हैं
हम आर्यो कि प्रतिमान और बस तुम्हारे बिंदू हैं
मानसरोवर से चलकर मैया समाती अरब के सिंधू हैं

कितनी सभ्यताये, संस्कृतीया कितनी पली तुम्हारे तटपर हैं
कितनी भाषाये और भंगीमाये, पिहर में तुम्हारे नटवर हैं
संस्कृतियो का आरंभ बताती, विश्व बोलिया तुम्हारी धरोहर हैं
कलकल बहते गात तुम्हारे बस प्यार के झिलमील सरोवर हैं

सुना है मैया तुम भी आजकाल मानव कुकर्मो से पीडित हो
प्लास्टिक कचरा और सडांध डालते मानव से उत्पिडीत हो
शर्म आती है मुझको मेरी तुम हम सब से जो प्रताडीत हो
सोंच रहा हुं क्या कर सकता जिससे तुम नव अवतारीत हो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -