घरफिचर्ससारांशपोपटपंची बाता अन् प्रेरणादायी लाथा!

पोपटपंची बाता अन् प्रेरणादायी लाथा!

Subscribe

जिराफाच्या पिल्लाचा जन्म होतो तेव्हा उंचावरून धाडकन जमिनीवर आदळत आपल्या अस्तित्वाची पावती निसर्ग देतो, पण हा पहिला धडा कमी की काय एखादे गाढव मारणार नाही अशी कमरेत लाथ मारणारी जिराफाची आई त्याच्या ढुंगणावर मारते. म्हणजेच हा जीवनाचा पहिला धडा जिराफाला मिळतो तेव्हा जिराफाचे पिल्लू लांब कोलमडून पडलेले असते. मानवी आयांप्रमाणे झबलं टोपडं देत आंजारून गोंजारून आपल्याच पिल्लांना मरतुकडे करणे, परिस्थितीपुढे हतबल होत रडगाणे गाण्याचे आणि दुसर्‍याच्या नावाने खडे फोडत जबाबदारी झटकण्याचे ‘महान ट्रेनिंग’ द्यायला जिराफ हा काही मानव प्राणी थोडाच आहे?

केवळ शाळेतच नाही तर जन्मल्यापासून मरेपर्यंत मानवी जीवन हे असंख्य पोपटपंची बातांच्या श्रृंखलांची दुनिया आहे, पण लाथादेखील प्रेरणादायी असतात हे समजणार्‍याची दुनिया अनोखी असू शकते का? लाथा मारायचेदेखील एखादे ‘टेक्निक’ किंवा तंत्र विज्ञान असू शकते का? माणसांनी यासाठी कोचिंग क्लास कोणाकडे करायला हवा, असा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर मोठे रंजक आहे.

‘झरापा’ ते ‘जिराफ’

- Advertisement -

‘झरापा’ हा अरबी शब्द! ज्याचा अर्थ चपळाईने चालणारा जणू वेगवान धावणारा असा. झरापाचा शब्दभ्रंश होत बनला तो ‘जिराफ’! जिराफ म्हणजे समखुरी गणाच्या जिराफिडी कुळातील उंच मानेचा अद्भुत गजब प्राणी. सर्वाधिक उंच म्हणजे अगदी साडेपाच मीटर तरीही वजनदार म्हणजे १ हजार २०० किलोचा हा चपळ भूचर सस्तन प्राणी. जिराफाचे वास्तव्य फक्त रखरखत्या उन्हात आफ्रिकेतील धगधगत्या सहाराच्या दक्षिण भागात असलेल्या खुल्या वन क्षेत्रात आहे. गाई-म्हशींसारखा जिराफ हादेखील रवंथ करणारा प्राणी शाकाहारी आणि कुणालाही त्रास न देणारा म्हणजे भित्रा, शांत व निरुपद्रवी प्राणी! १० ते ५० पर्यंत संख्येने कळपात राहत एकतेच्या शक्तीचे दर्शन घडविणारा.

जन्म हा गोंजारण्यासाठी का?

- Advertisement -

जिराफाच्या पिल्लाचा जन्म होतो तेव्हा उंचावरून धाडकन जमिनीवर आदळत आपल्या अस्तित्वाची पावती निसर्ग देतो, पण हा पहिला धडा कमी की काय एखादे गाढव मारणार नाही अशी कमरेत लाथ मारणारी जिराफाची आई त्याच्या ढुंगणावर मारते. म्हणजेच हा जीवनाचा पहिला धडा जिराफाला मिळतो तेव्हा जिराफाचे पिल्लू लांब कोलमडून पडलेले असते. मानवी आयांप्रमाणे झबलं टोपडं देत आंजारून गोंजारून आपल्याच पिल्लांना मरतुकडे करणे, परिस्थितीपुढे हतबल होत रडगाणे गाण्याचे आणि दुसर्‍याच्या नावाने खडे फोडत जबाबदारी झटकण्याचे ‘महान ट्रेनिंग’ द्यायला जिराफ हा काही मानव प्राणी थोडाच आहे? कमरेत लाथ खाल्ल्यानंतर डोळे किलकिलेही होत नाही तोच जिराफाच्या पिल्लाला दिसते की ‘माता न तू वैरीन’ अशी जनदात्री आई वेगाने (म्हणजे सुमारे ५६ किलोमीटर प्रतितास म्हणजे बसच्या वेगापेक्षा जास्त वेगाने) पुन्हा पळत येत आहे.

धडा क्रमांक दोन

काय होत आहे हे कळण्याच्या आधी आता दुसरी लाथ जिराफाच्या पार्श्वभागावर बसलेली असते. धडा क्रमांक दोन तो हाच! पहिल्यापेक्षाही जास्त अंतरावर जाऊन आता हे पिल्लू कळवळत उभे राहते. आपली आई परत आपल्याकडे धावत येत आहे हे पाहून ‘नाथा काय होईल आता?’ म्हणत जीव मुठीत घेऊन जिराफाचं पिल्लू धूम ठोकते. जीवाच्या आकांताने नखशिखांत थरकाप करीत जिराफाचे पिल्लू आत्मविश्वासाने दूर दूर पळू लागलेले पाहून जिराफ मातेचा आनंद गगनात मावत नाही.

ममत्व!

मग ममत्व जागे होते आणि वेगाने पाठलाग करीत ती पिल्लाला गाठते आणि चाटू लागते. पिल्लाला कळते की ‘जीवन सुंदर आहे!’ पण लाथा खाल्ल्यानंतरच! रेडिमेड सुंदर जीवन कुणी कुणासाठी ठेवलेले नाही. हाच ममत्वाचा धडा होय. गंमत म्हणजे जिराफांच्या दुनियेत मानवी दुनियेच्या विरुद्ध कागदी नोटांची किंमत जगण्यासाठी शून्य आहे हे विशेष!

पोपटपंची नाही रे राजा!

पिल्लाला ती पोपटपंची करीत अरे उठ रे राजा, जीवनाचा अभ्यास कर, नाहीतर वाघोबा खाऊन टाकेल, अशी बातूनी भुते उभी करत बसत नाही. जिराफ मातेला खरा आनंद होतो तो डायरेक्ट ‘प्रॅक्टिकल’ने! ‘लाथों के भूत बातों से नहीं मानते’ हे निसर्गाचे वरदान आहे. प्रसंगी ‘रणछोडदास’ बनत, निळ्याशार खुल्या आसमंताखाली निधड्या छातीने परिस्थितीशी दोन हात करत स्वाभिमानाने जगणारा जिराफ स्वत:ला अतिशहाणा समजणार्‍यांना बरंच काही शिकवतो. आजवर एकाही जिराफाने जीवन संघर्षाला किंवा शत्रूला भिवून आत्महत्या केल्याची पृथ्वीवर नोंद झाल्याचे मी तरी पाहिलेले नाही.

लाथा खा आणि…

जिराफाचे मांस अतिशय लुसलुशीत आणि चवदार म्हणून वाघ-सिंहांसारख्या श्वापदांपासून वाचत दीर्घकाळ मरणाचा सामना करायचा असेल तर आईरुपी परिस्थितीच्या ‘लाथा खा आणि उभे राहा’! माणसांच्या आयांसारखे मुलांना सर्व काही आयते देऊन ‘जन्मच कशाला दिला आम्हाला?’ अशी बोलणारी औलाद जिराफ जन्माला घालतच नाहीत. आईच्या लाथा खाऊन, मार खाऊन एकही जिराफाचे पिल्लू आजपर्यंत कुठे मेल्याची नोंद निदान माझ्या वाचनात तरी नाही, परंतु गंमत म्हणजे लहानपणी लाथा खात उभे राहिलेल्या मजबूत पायांच्या जिराफाची एकच लाथ खाऊन तरस, वाघ, सिंह असे भलेभले प्राणी मेल्याच्या नोंदी मात्र आहेत. कारण जिराफाच्या जीवनात पोपटपंची नाही रे राजा!

स्टॅण्ड जीवनाचा!

उंच मानेने दूरदृष्टी ठेवूनदेखील जिराफ संपले. जिराफांनी नेमके कोणत्या काळात कसा ‘स्टॅण्ड’ घेतला हा संशोधनाचा विषय ठरेल, पण वस्तुस्थिती ही आहे की हे सर्व असले तरी जीवन संघर्षाच्या लढाईत जिराफ हरत चालला आहे. आता जिराफाची केवळ एकच जात अस्तित्वात असून तिचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमेलोपरडॅलिस असे आहे. आफ्रिकेत त्याच्या ९ उपजाती असून स्थानानुसार त्यांना नूबियन जिराफ, केप जिराफ, सोमाली जिराफ आदी नावे आहेत.

लायकच या जगात टिकतात!

चार्ल्स डार्विनचा सिद्धांत आहे की ‘लायकच या जगात टिकतात!’ आपली लायकी सिद्ध करीत! म्हणजे एकतर परिस्थितीशी जुळवून घेत स्वत:मध्ये सुयोग्य बदल करून घ्यायचे, नाहीतर संघर्ष करीत परिस्थितीला नमवूनच! मृत्यूच्या बाहूपाशात शांत पहुडण्याआधी जीवन सुंदरच आहे. आपले जीवन पोपटपंची बाता करण्यात घालवायचे की जिराफासारखे प्रेरणादायी लाथा घेत फुलवायचे हा विचार आणि कृती खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे, खरं ना!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -