घरफिचर्ससारांशशिकवणी वर्ग वाजवणार महाविद्यालयांची मृत्यूघंटा!  

शिकवणी वर्ग वाजवणार महाविद्यालयांची मृत्यूघंटा!  

Subscribe

काही महाविद्यालयांच्या सोबत शिकवणी वर्गांनी करार केले आहेत. शिकवणीच्या वर्गासाठी मोजल्या जाणार्‍या पैशांतील काही हिस्सादेखील महाविद्यालयांना दिला जात असल्याचे बोलले जात आहे. शिक्षण हा अलीकडे धंदा होत असल्याच्या अनेक घटना माध्यमांतून समोर आल्या आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. खरंतर शासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहायला हवे. असे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. तरच या गोरखधंद्याला चाप बसेल. महाविद्यालयांना काहीच न करता पैसा मिळत असल्याने आज हे फार लाभदायी वाटत असेल, पण ही महाविद्यालयांसाठी मृत्यूघंटा ठरण्याची दाट शक्यता आहे.

–संदीप वाकचौरे
  राज्यात कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आणि देशात व राज्यात इतरत्र महानगरात शिकवण्याचे वर्ग लावायचे या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या पाल्याला अभियंता, डॉक्टर बनवायचे आहे म्हणून पहिलीच्या वर्गापासून शिकवणीला पाठविणार्‍या पालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील विविध सर्वेक्षणानुसार यात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अलीकडे कनिष्ठ महाविद्यालये आणि शिकवणी वर्गाचे व्यवस्थापन यांच्यात जणू अलिखित करार झाले आहेत. आज विद्यार्थी महाविद्यालयात शिकत नाही, मात्र त्यांना परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी प्रवेश घ्यावा लागतो म्हणून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यासाठी महाविद्यालयांना मुबलक पैसे मिळतात. कोणत्याही खर्चाशिवाय भरमसाठ पैसा मिळत असल्याने हा प्रवास काहीसा छान वाटत आहे. आज हे पैसे मिळवून देणारे साधन वाटत असले तरी ही पाऊलवाट उद्या कनिष्ठ महाविद्यालयांचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचा धोका आहे. ही वाट म्हणजे शिक्षणाच्या भविष्यावर येणार्‍या अंधाराची चाहूल आहे. यासंदर्भाने दैनिक महानगरने हा गंभीर प्रश्न चव्हाट्यावर आणल्यानंतर शिक्षणात आता गंभीर पावले उचलण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
मुळात आपल्याकडे शिक्षणाच्या प्रक्रियेतून समाज परिवर्तन अपेक्षित आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. मुलांचे शिक्षण होण्यासाठीचे प्रयत्न शाळांनी करणे अपेक्षित आहेच. अलीकडे पालकांच्या मनात बालकांच्या समृद्ध शिक्षणापेक्षा त्यांच्या मार्कांचेच अधिक आकर्षण आहे. आपला पाल्य शाळा-महाविद्यालयात गेल्यानंतर काय आणि किती शिकला? यापेक्षा त्याला मार्क किती मिळाले हे महत्त्वाचे मानले जात आहे. जीवनात अपयश आले तरी चालेल, मात्र परीक्षेत घवघवीत यश मिळायला हवे. त्यासाठी पालक कोणताही त्याग करायला तयार आहेत. पालकांनी निवडलेला हा मार्ग विद्यार्थ्यांविषयी आणि त्यांच्या भविष्याविषयीचे प्रेम आहे की उद्याच्या त्यांच्या स्थिरस्थावर होण्याविषयीची चिंता आहे, हा खरा प्रश्न आहे. शिक्षणातून आपल्याला जगण्यासाठी सक्षम नागरिक निर्माण करायचा आहे. मानवाचे माणसात रूपांतर करण्याचा विचार शिक्षणात आहे. शिक्षणातून माणसात शहाणपण आणि विवेकाची पेरणी करायची आहे. जगण्याच्या प्रवासात ज्या समस्या निर्माण होतात त्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत शिक्षणाने पेरण्याची अपेक्षा असते.
शिक्षणातील हा मूलभूत विचारच आता हरवत चालला आहे. शिक्षणात ज्ञानापेक्षा केवळ मार्क मिळून देणारी व्यवस्था उभी करणे आणि त्या दिशेने प्रवास करणे पालकांना महत्त्वाचे वाटू लागले आहे. त्यासाठी पालक आपल्या पाल्याला महाविद्यालयात केवळ प्रवेश घ्यायचा आणि त्याला शिकवणीला पाठवणे महत्त्वाचे वाटत होते. आपल्याकडे कधीकाळी शिकवणीला पाठवणे म्हणजे विद्यार्थ्याच्या शिकण्यात गती कमी आहे, त्याच्या शिक्षणात अडथळे आहेत असे समजले जात होते. शाळा, महाविद्यालयात शिकवले जात असतानादेखील विद्यार्थी शिकवणीला जातो हे त्या कुटुंबासाठी अप्रतिष्ठेचे मानले जात होते. आपल्या शाळा-महाविद्यालयाचा विद्यार्थी शिकवणीला जातो हे शाळांना आणि शिक्षकांना अपमानजनक वाटत होते. विद्यार्थी शिकवणीला जातो म्हणजे आपल्या अध्यापन प्रक्रियेत दोष आहेत असे शिक्षक मानत होते. संस्थाचालकही संबंधित शिक्षकाला त्यासंबंधीची समज देत होते, मात्र अलीकडे सारेच संदर्भ बदलले आहेत. आपला पाल्य शिकवणीला जातो हीच बाब आता प्रतिष्ठेची वाटू लागली आहे.
 राज्यात सातत्याने शिकवणीला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या उंचावत आहे. असर अहवालानुसार पहिलीतील १०.२ टक्के, दुसरीत १३.६ टक्के, तिसरीत १५.४ टक्के, चौथीत १६.३ टक्के, पाचवीत १६.९ टक्के, सहावीत १६.२ टक्के, सातवीत १५.९ टक्के, तर आठवीत १६.१ टक्के विद्यार्थी शिकवणीत सहभागी झाले आहेत. सरासरी पहिली ते आठवीतील १५.१ टक्के विद्यार्थी शिकवणीत सहभागी झाले आहेत. यातील आकडेवारीवर नजर टाकली तर खासगी शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे शिकवणीत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण २१ टक्के इतके आहे. सरकारी शाळेत प्रवेश घेणार्‍या आणि तरी शिकवणीला जाणार्‍या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण १२.५ टक्के इतके आहे. यातील पहिलीत शिकणार्‍या सरकारी शाळेतील ८.० टक्के विद्यार्थी, तर खासगी शाळेतील २०.९ टक्के विद्यार्थी शिकवणीला जातात. दुसरीत शिकणार्‍या सरकारी शाळेतील ११.१ टक्के विद्यार्थी शिकवणीत सहभागी आहेत, तर खासगी शाळेतील २६.२ विद्यार्थी शिकवणीला जात आहेत. या आलेखावर नजर टाकली तर खासगी शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी शिकवणीत सहभागी आहेत.
खासगी शाळेतील तिसरीतील २९.६ टक्के, चौथीतील २९.२ टक्के, पाचवीतील २०.९ टक्के, सहावीतील १९.३ टक्के, सातवीतील १९.८ टक्के, आठवीतील १६.५ टक्के विद्यार्थी शिकवणीला पैसे मोजून सहभागी होत आहेत. राज्यातील हे प्रमाण गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. २०१० साली सरकारी शाळेतील ६ टक्के आणि खासगी शाळेतील १५.३ विद्यार्थी सहभागी होत होते. आता २०२२ मध्ये म्हणजे गेल्या १२ वर्षांत सरकारी शाळेतील १२.५ टक्के आणि खासगी शाळेतील २१.० विद्यार्थी शिकवणीत सहभागी होत होते. सरकारी शाळेतील शेकडा प्रमाण ६.२ टक्के, तर खासगी शाळेतील ५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी शाळा म्हणजे गुणवत्ता अशी आपल्या समाजमनाची धारणा आहे, मात्र तेथील वाढते प्रमाण चिंताजनक मानायला हवे. दहावी आणि बारावीच्या बहुतांश विद्यार्थी शाळांपेक्षा शिकवणी पसंत करीत आहेत. महानगरे, शहरी भागात तर हे प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक आहे. ग्रामीण भागात काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
  प्राथमिक, माध्यमिकबरोबर कनिष्ठ महाविद्यालयात आता नवा पायंडा पाडला जात आहे. विद्यार्थी अभियंता, मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी नीट, जेईईसारख्या परीक्षांमध्ये अधिकाधिक वरचे स्थान मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी देशात आणि अलीकडे राज्यातदेखील काही शहरांमध्ये शिकवणी वर्ग प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि शिकवणीसाठी मात्र महानगरात किंवा अगदी परराज्यात प्रवेश घेतात. अनेक महाविद्यालये अशा स्वरूपात प्रवेश देत आहेत. यासाठी ते हजारो रुपये घेत आहेत हे विशेष. ही फी तालुक्याच्या ठिकाणी लाखावर पोहचली आहे. काही महाविद्यालयांच्या सोबत शिकवणी वर्गाने करार केले आहेत. शिकवणीच्या वर्गासाठी मोजल्या जाणार्‍या पैशांतील काही हिस्सादेखील महाविद्यालयांना दिला जात असल्याचे बोलले जात आहे. शिक्षण हा अलीकडे धंदा होत असल्याच्या अनेक घटना माध्यमांतून समोर आल्या आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. खरंतर काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने विज्ञान शाखेत शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला थम मशिनद्वारे हजेरी नोंद करण्याची सक्ती केली होती, मात्र त्याला काही ठिकाणी विरोध झाला.
शिक्षणातील गोरखधंदा बंद होण्याची भीती या शासन निर्णयामागे असल्याने शंभर टक्के महाविद्यालयात ती राबविली गेली नाही. खरंतर शासनाने या निर्णयाची सक्ती करीत प्रभावी अंमलबजावणी केली असती तर मोठ्या प्रमाणावर सुरू असणार्‍या गोरखधंद्याला चाप बसला असता. महाविद्यालयांना काहीच न करता पैसा मिळत असल्याने आज हे फार लाभदायी वाटत असले तरी ही महाविद्यालयांसाठी मृत्यूची घंटा ठरण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपात ही प्रक्रिया होत असेल तर उद्या शिकवणी वर्गाला अधिकृत मान्यता दिली तर शासनाची महाविद्यालयांवर होणार्‍या खर्चात बचत होईल. त्याचवेळी विद्यार्थी दहावी पास असेल तर त्याला बारावीला बाह्य परीक्षेद्वारे प्रविष्ठ होण्याची अनुमती दिली गेली. विज्ञान शाखेतील विद्यार्थी असेल तर त्याला प्रात्यक्षिक परीक्षांसाठी केंद्र निर्माण केली तर महाविद्यालयांचे भविष्य काय असेल? हे असेच सुरू राहिले तर शासन आज नाही तर उद्या यावर निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आता या पर्यायाचा विचार करण्याची वेळ आली आहे. या माध्यमातून होणारी फसवणूक आज समाजाला आणि पाल्यांनादेखील आपल्या हिताची वाटत असली तरी उद्याच्या भविष्यासाठीची ती वाट विद्यार्थ्यांच्या जीवनात अंधार निर्माण करणारी ठरणार आहे.
शिकवणी लावली तरी मुलांचे शिक्षण खरंच होतं का? आपल्याकडील शिकवणीचे वर्ग हे मुलांचे शिक्षण करण्यासाठी नाही तर पालकांच्या मनातील मार्कांचा आलेख उंचावण्यासाठी आहे. पालकांना शिक्षणापेक्षा मुलांचे मार्क हवे आहेत. शिक्षण कसे होते याचा विचार केला जात नाही. परीक्षेत किती मार्क पडले यावर शिक्षणाचे मूल्यमापन होते. त्यामुळे जीवनासाठी शिक्षणाचा विचार, संस्कार, संवेदना, सहकार्य, श्रमप्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता मूल्य, जीवन कौशल्य, गाभा घटक, २१व्या शतकासाठीची कौशल्य किती रूजली यापेक्षा फक्त मार्क पालकांना महत्त्वाचे वाटत असतील तर आपण शिक्षणातून माणूस, समाज, राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे हे चुकीचेच ठरेल. शिकलेले पक्के होण्यासाठी चिंतन, मननाची गरज आहे. सातत्याच्या बौद्धिक प्रक्रियेमुळे मुलांना थकवा येतो आणि शिकण्याचा प्रवास थांबतो म्हणून विचार करायला हवा. ही वाट आज लाभदायी असली तरी हा थोडासा लोभ शिक्षण व्यवस्थेला गिळंकृत करण्याचा धोका आहे, म्हणून जागे राहण्याची गरज आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -