घरफिचर्ससारांशमुलांना नकाराबरोबर विचारही पचवायला शिकवा!

मुलांना नकाराबरोबर विचारही पचवायला शिकवा!

Subscribe

श्रद्धा हत्या प्रकरणानंतर एकतर्फी प्रेमाबरोबरच स्वत: ब्रेकअप करणार्‍या, पुरुषाला नकार देणार्‍या, त्याच्या मागे लग्नाची भुणभूण करणार्‍या महिला आणि तरुणींच्या हत्येचे सत्रच देशभरात सुरू झालं आहे. एकामागोमाग घडणार्‍या या घटना मेंदू सुन्न करणार्‍या आहेत. अत्यंत थंड डोक्याने विचारपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने या महिलांची विल्हेवाट लावली जात आहे. कधी गळा दाबून तिचा श्वास थांबवला जातोय, तर कधी तेवढ्यावरच न थांबता तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून कुत्र्याला खाऊ घातले जात आहेत, तर कधी दिवसाढवळ्या तिची खांडोळी करण्यासाठी हे माथेफिरू कोयते घेऊन या तरुणींच्या मागे फिरत आहेत. एखाद्या इंग्रजी चित्रपटालाही लाजवेल एवढे पुरुषी क्रौर्य या घटनांमधून समोर येऊ लागले आहे.

–कविता लाखे-जोशी

हे कमी की काय म्हणून आता तर देशात महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असलेल्या मुंबईतील लोकलमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडू लागल्या आहेत. एकंदर पाहता महिला कुठेच सुरक्षित नाहीत अशी आजची परिस्थिती आहे. यासाठी अनेक कारणे आहेत. यामुळे या घटनांची अनेक कारणे जरी असली तरी या घटनेतील प्रत्येक महिलेने त्या पुरुषाला दिलेला नकार हेदेखील एक कारण आजच्या समाजाला विचार करायला लावणारे आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये जीवाने गेलेली प्रत्येक स्त्री ही सुशिक्षित आहे. जेव्हा तिला जोडीदाराचा जाच असह्य झाला तेव्हा तिने त्याविरोधात केलेले बंड हेच तिच्या हत्येचे कारण झाल्याचे या घटनांवरून दिसून आले आहे.

- Advertisement -

एकीकडे आपण मुलांबरोबरच मुलींनाही उच्च शिक्षण देऊन घडवतोय. शिक्षणाच्या जोरावर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुरुषांनाही मागे टाकले आहे. त्याचे आम्हाला कोण कौतुक, पण भावनांचं काय, मनाचं काय? महिलांना फक्त आर्थिक बळ देणं हे आता पुरेसे नसून तिला मानसिकरित्या, शारीरिकही खंबीर आणि मजबूत बनवणं ही आता काळाची गरज आहे. या घटनांमधील प्रत्येक स्त्रीने पुरुषाला नकार देऊन मरण ओढवलं आहे. तिने त्याला नकार द्यायला लावलेला वेळ, समोरच्या मित्रामधल्या जनावराला ओळखण्यासाठी तिला लागलेला वेळ हे जर तिने वेळीच ओळखून थांबवलं तर अशा अनेक श्रद्धा आज जीवित असत्या. आजघडीला बायांनी कितीही कोकलून सांगितलं की, आम्ही पुरुषांच्या बरोबरीने जगतोय, त्यांच्याएवढंच कमावतोय, मग ही सगळी बंधनं आमच्यावरच का लादली जातात.

पुरुषांना किंवा मुलांना पुरुष होईपर्यंत स्त्रीला माणूस समजा, तिला नीट वागवा हे का सांगावं लागतंय. अजून बायकांच्या किती पिढ्यांना या पुरुषी अत्याचाराला बळी पडावं लागणार आहे, असा प्रश्न पडला आहे. याचं कारणही सोपं आहे. स्त्री ही मादी आहे आणि पुरुष हा नरच आहे. निसर्गानेच हा भेद विश्वात समतोल राहावा म्हणून केलाय. यामुळे फक्त बाईमाणसाचे आर्थिक सक्षमीकरण करून चालणार नाही, तर तिला, तिच्या मनाला आणि शरीरालाही पुरुषाप्रमाणे मजबूत बनवावं लागणार आहे. कारण आज २०२३ मध्ये महिलांवरील अत्याचाराचं जे चित्र आहे ते नवीन नसून शतकानुशतके महिला पुरुषी अत्याचाराला बळी पडत असल्याचे आपला इतिहासच आपल्याला सांगतो. ही परिस्थिती आपल्याकडेच नसून जगभरात आहे.

- Advertisement -

यामुळेच काही तज्ज्ञांच्या मते या हत्यांच्या घटनांमधील महिला या शिक्षित जरी होत्या तरी भावनिकरित्या त्या पुरुषाच्या प्रेमजाळ्यात अशा अडकल्या की त्यांची सारासार विचारशक्तीच संपली. सबकुछ तुम या कुठल्याशा ओळीप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पुरुषाला स्वतःला वाहून टाकलं. त्यामुळे तो निश्चिंत झाला. ती मादी आहे, कमकुवत आहे. आपल्या प्रेमाच्या नियंत्रणात आहे, ती आपल्याला कधीही सोडून जाणार नाही याचा त्याला विश्वास वाढला. त्यामुळे त्याचा पुरुषी अहंकार सुखावला, पण तिने नकार दिल्यानंतर तो दुखावला, चरफडला आणि त्याने तिचा काटा काढला. या घटना केव्हा थांबणार, तर ते कोणीच सांगू शकत नाही. कारण कायद्याचं भय आता कोणाला राहिलं नाही.

पोलिसांचा धाक राहिला नाही. सगळ्या समाजात ही विषारी वृत्ती पसरल्याने कोणी कोणाला सुधरायचे, सल्ले द्यायचे, हाच प्रश्न आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यात लहान मुलं वयाने नाही पण शरीराने मोठी होऊ लागली आहेत. ज्या वयात आपण आबाधुबी खेळायचो त्या वयात ही चिमुरडी हातातल्या मोबाईलमध्ये पॉर्न बघू लागली आहेत. सोशल मीडियावरचे व्हायलंट कंटेट या मुलांना चॅलेंजिंग, थ्रीलींग वाटू लागले आहेत. त्यात ते स्वतःला बघू लागल्याने आजच्या पिढीची मानसिकता ही यंत्रासारखी असंवेदनशील झाली आहे, मात्र या सगळ्या धबडग्यात आपली पोरं तासन्तास मोबाईलमध्ये काय बघताय याचा आईबापाला अतापताच नाही, तर दुसरीकडे फ्रीडमच्या नावाखाली मुलीही आईवडिलांचे ऐकेनाशा झाल्या आहेत.

यामुळे आईवडिलांनी त्यांच्या आयुष्यात केलेला हस्तक्षेप त्या धुडकावून लावत आहेत. आर्थिक स्वातंत्र्य आल्याने ही नवी पिढी जुन्या पिढीचे सगळेच विचार धुडकावताना दिसते. त्यातच मुलांना सगळंच उपलब्ध करून देण्याच्या पालकांच्या अट्टाहासामुळेही मुलांच्या मानसिकतेत फरक पडतोय, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण हवं ते मिळत गेल्याने या मुलांना नाही, नको, नो, असे शब्द ऐकण्याची सवयच राहिली नाही. यातूनच मग कोणाकडून नाही ऐकलं की या मुलांची टाळकी फिरू लागली आहेत.

हे फक्त मुलांच्याच नाही तर मुलींच्या बाबतीतही होऊ लागले आहे. मुलाप्रमाणेच मुलींना वाढवताना बरेच आईवडील विसरून जातात की विचाराने, शिक्षणाने जरी आपण लेकीला लेकासारखं ट्रीट करीत असलो तरी शरीराने, मनाने ती स्त्रीच आहे. येथेच खरी मेख आहे. कारण अशा वातावरणात वाढलेली मुलगी स्वतःकडे मुलाप्रमाणेच बघते. त्यामुळे समोरचा मुलगा कितीही वाया गेलेला असला तरी तो आपलाच मित्र आहे याच विचारातून मागचा पुढचा विचार न करता ती त्याच्याबरोबर केव्हा राहू लागते ते बर्‍याच पालकांना उशिरा कळतं.

मुलांना मर्यादेबाहेर देण्यात येणारं वैचारिक स्वातंत्र्य जोपर्यंत घरातून थांबणार नाही, तोपर्यंत या घटना सुरूच राहणार. मुलांना वाढवणं, त्यांचा विकास करणं हे पालकांचं कर्तव्य असलं तरी मुलं त्याचा गैरवापर तर घेत नाहीत ना, वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली ते कोणाला भेटताहेत, कुठे जाताहेत हेदेखील पालकांनी पाहायला हवं. पालक म्हणून मुलांवर विश्वास हवा, पण मुलं त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन चुकीच्या वाटेवर तर जात नाहीत ना हेदेखील पालकांनी बघायला हवं. मुलामुलींना मोकळीक द्यायलाच हवी, पण त्या दोरीचे टोक आपल्याकडे ठेवायला हवे. योग्य वेळी त्यांना एखाद्या गोष्टीस नकार द्यायला हवा. त्यावेळी हे टोक आपल्याला आवळता यायला हवं. नाहीतर ही पाखरं स्वच्छंदी जगण्याच्या हव्यासापायी एखाद्या शिकार्‍याच्या जाळ्यात कधी अडकतील हे त्यांचं त्यांनाही कळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -