घरफिचर्ससारांश‘ट्रोल बेबी ट्रोल’

‘ट्रोल बेबी ट्रोल’

Subscribe

दिवाळीत आणलेली एखादी फटाक्यांची लड जशी फुसकी निघावी तशी टीम इंडियाची लड क्षणार्धात फूस-फास-फूट करत विझून जाते. यात कॅप्टन कोहली नावाचा फटाका काही वेळ इकडून तिकडे आवाज करत चांगली झुंज देतो, पण इतकरांच्या फुसक्या शोमुळे त्याचाही हिरमोड होतो अन् तो ‘फाट फूट फाट फूट फूट करत फूसससससऽऽऽ’ होऊन जातो. खरं पाहिलं तर भारताकडे ‘ऋषभ’, ‘के.एल.’, ‘सर जडेजा’, ‘सूर्या’ असे एक ना एक धडाकेबाज फटाके होते ओ...पण त्यांचा ‘बार’ उडालाच नाही आणि ‘बार’मध्ये बसलेल्यांच्या मात्र ‘अंदाजबॉम्ब’ फुसका ठरला. पक्या आणि त्याचे सवंगडी वारंवार खुर्च्या बदलत होते. पक्या तर टेबलवरच बसायचा बाकी होता.

आयुष्यातल्या एका सांजवेळी निवांत एका पडद्यापुढे कसाबसा क्रिकेटप्रेमी पक्या स्थिरावला अन् नजर ताठ करून त्या पांढर्‍या शुभ्र पडद्याकडे पाहू लागला. अर्थात ही एका मोठ्या युद्धापूर्वीची स्मशान शांतता आणि चाहूल होती. अट्टल देशप्रेमी ग्रुप आज ताठ मानेने देशासाठी बलिदान द्यायला काही दमड्या खर्च करून तयार झालेला होता. त्याला निमित्तही तसंच होतं.. अहो एका चिडक्या टीमसोबत आमच्या देशाची क्रिकेट मॅच होती ओ… ऐन दिवाळी तोंडावर असल्याने या मॅचच्या निमित्ताने जोरदार फटाके फुटणार, आतषबाजी होणार होती. मग काय.. पक्याच्या अंगात तेंडुलकर, गावस्कर, कपिल देव, धोनी, द्रविड, जडेजा, कोहली असे एकामागून एक बरेच धुरंधर संचारत होते. त्यामुळेच की काय कधी नव्हे ते सर्वकाही विसरून महागड्या अन् अलिशान मदिरालयात पक्या अन् आम्ही सर्वांनी क्रिकेटची शाळा भरवली होती. अरे पण या शाळेतही पक्याचे नालायक सोबती वेळेत आलेच नाहीत.. किल्ला लढवण्यासाठी पक्या सर्वात पुढे ठाण मांडून बसला अन् केविलवाण्या नजरेने वेटरला शोधू लागला. इथून सुरू झाली ‘किस्स्यांची शाळा’… पक्याला या अलिशान मदिरालयातील वेटर्स आणि मॅनेजर अन् ग्राहक सगळे एकसारखेच दिसत होते. त्यांचा पेहराव पाहून पक्याला हाक मारू तरी कोणाला असं वाटू लागलं.

चुकून कुण्या अन्य ग्राहकाला आपण आवाज द्यायचो आणि इज्जतीचाच फालुदा करून घ्यायचो, या भीतीने पक्याने आपला आवाज घशातच गिळला अन् गप्प पडला. पुन्हा टेबलावरील मेनूकार्डमध्ये डोकावून बसला. पडदा अजूनही पांढराच होता, ज्यामुळे पक्याला अस्वस्थ वाटत होते. हळूच पक्याने आपल्या खिशात हात घालून डिजिटल कंपासपेटी (टॅब) काढला आणि त्यात वेळ पाहून घेतली. तिसर्‍या प्रहराला काही वेळ शिल्लक होती. ते पाहून पक्याची छाती अजूनच फुगली. त्याने कसेबसे पुन्हा धारिष्ठ्य करत एकाला शूक शूक केलंच आणि गपचूप भामट्या नजरेने टेबलाकडे पाहू लागला. ती व्यक्ती तातडीने त्याच्यापर्यंत पोहोचली आणि ‘येस सर’ म्हणून पक्याकडे पाहू लागली. पक्याने त्याची इंग्रजी ऐकून ‘सॉरी’ म्हणत पुन्हा मेनूकार्डवर बोटं फिरवली. वेटरने तिथून काढता पाय घेतला अन् पक्याची अस्वस्थता अधिकच वाढली. त्याने आपल्या कंपासपेटीला बोटं टोचून आपल्या शूरविरांना फोन लावला. पहिले तर कुणी प्रतिसाद दिलाच नाही. एकाने उचलला आणि नेहमीच्या ऐटीत ‘आलो आलो, पाच मिनिटांत पोहोचतो’ म्हणत फोन ठेवला. पक्याने पुन्हा एका धुरंधराला फोन फिरवला… त्याच्या घरात कुणी तरी फोन उचलला आणि पक्याची पुन्हा बोबडी वळाली.

- Advertisement -

पक्याला काय बोलावे सूचेना. कारण हे शूरवीर लढायला आलेले खरी, पण सगळ्यांच्या नजरा चुकवून..! कारण लढाईच तशी होती… एकीकडे भारत पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सामना, तर दुसरीकडे बिकट परिस्थितीत प्रपंचाचा गाडा ओढणार्‍या सर्वसामान्य माणसांची या निमित्ताने अस्तित्वाची लढाई… अशा स्थितीत पक्याने फोन कट करत पुन्हा पडद्याकडे नजर वळवली. त्याने आपल्या टॅबमध्ये नेट चालू करून गुगलदादांच्या मदतीने मॅचची वेळ पुन्हा एकदा पाहून घेतली. तासभर वेळ होता. तितक्यात पक्याचा खास लंगोटीयार त्याला शोधत आला. पक्याला पाहून त्याने झ्यांगमध्ये अलिंगण दिले अन् वेटरला एकदम दिमाखात (हात वर करत, निर्लज्जपणाने हसत) आवाज दिला. ते पाहून ग्राहक आणि वेटर-मॅनेजर यांच्यातला फरक पक्याने हेरला. मग काय एकामागून एक यार जमत गेले आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या शाळेत माहोल बनला. आजूबाजूच्या टेबलांवरही गोंधळ वाढला. देशभक्तीचे, स्फूर्ती चेतवणारे, खेळाशी संबंधित गाणे वाजत होते. त्यामुळे एकदम फाडू वातावरणनिर्मिती झाली. याच गर्दीतून एकाने पडदा पेटवायला सांगितला.

कुणीतरी धावपळ करत सिस्टीम आणली आणि पडद्यावर क्रिकेटचे रणसंग्राम सुरू झाले. तितक्यात मॅनेजर महिलेने माईकवर सर्वांना नियम पालनाचं आणि मॅचकडे फक्त खेळ म्हणून पाहावं. जातीवाचक, देशांतर्गत वाद, गैरभाषेत वाद टाळण्याचं वैगरे पोटतिडकीने आवाहन केलं, पण गंमत काय, त्याला पक्याने स्टँडिंग ओवेशन देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. आता सगळ्यांना कुठे माहीत ओ.. पुढे पुढे करत टाळ्या पिटणारा पक्या म्हणजे ‘गंगाधरच शक्तीमान होता..!’ असो.. मॅनेजर महोदया मात्र जाम खूश झाल्या. प्रत्येक टेबलवरून फर्मान सुटू लागले आणि देशप्रेमाचे झरेही वाहू लागले. पाकिस्तानला अकरा वेळा हरवणार्‍या टीम इंडियाचे फॅन्स वेगळ्याच अविर्भावात होते. काहींनी तर स्पोर्टी कपडेही घालून मस्त ढिन्चॅक मूड बनवला होता. पक्या मात्र एकदम फॉर्मल अन् गावंढळप्रमाणे इकडे-तिकडे तोंड फिरवत होता.

- Advertisement -

पण, पक्याला कमी समजू नका, क्रिकेटचा गंध त्याला बर्‍यापैकी होता. इतक्यात मॅचचा टॉस होतो आणि पाकिस्तान टॉस जिंकतो, तोच अनेकांच्या तोंडी संतापातले ‘सुविचार’ येऊ लागतात. पण काहीजण त्यांची समजूत काढत टॉसच आहे, ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत कंटिन्यू करण्याचा सल्ला देतात. कसंबसं कारलं खाल्ल्यगत पुन्हा तोंड वाकडं करून सगळे आपआपला ग्लास उचलतात. भारताचे गोड सलामीविर मैदानात उतरतात तोच पुन्हा जल्लोष होतो. पक्या जोराने शिट्टांची बरसात करतो. पण त्याच्या शिट्यांची गुंज संपत नाही तोच पहिला मावळा धारातीर्थी पडतो आणि आख्या मदिरालयात स्मशान शांतता पसरते. कारण हा मावळा म्हणजे मुंबईकरांचीच नव्हे तर टी-ट्वेन्टी क्रिकेटप्रेमींची जान होता. कसाबसा प्रत्येक जण स्वत:ला सावरतोे अन् कोरड्या घशाला आराम देऊ पाहतो. पण तेही सुख कुठे त्यांना जास्त वेळ मिळते.

दिवाळीत आणलेली एखादी फटाक्यांची लड जशी फुसकी निघावी तशी टीम इंडियाची लड क्षणार्धात फूस-फास-फूट करत विझून जाते. यात कॅप्टन कोहली नावाचा फटाका काही वेळ इकडून तिकडे आवाज करत चांगली झुंज देतो, पण इतकरांच्या फुसक्या शोमुळे त्याचाही हिरमोड होतो अन् तो ‘फाट फूट फाट फूट फूट करत फूसससससऽऽऽ’ होऊन जातो. खरं पाहिलं तर भारताकडे ‘ऋषभ’, ‘के.एल.’, ‘सर जडेजा’, ‘सूर्या’ असे एक ना एक धडाकेबाज फटाके होते ओ…पण त्यांचा ‘बार’ उडालाच नाही आणि ‘बार’मध्ये बसलेल्यांच्या मात्र ‘अंदाजबॉम्ब’ फुसका ठरला. पक्या आणि त्याचे सवंगडी वारंवार खुर्च्या बदलत होते. पक्या तर टेबलवरच बसायचा बाकी होता. वेगवेगळ्या अँगलने मॅच पाहण्याची धडपड सगळे करत होते, पण त्यांना कुठे ठाऊन हो, की आपले फटाके चुकून ‘आयपीएल’च्या फ्रिजमध्ये ठेवले गेल्याने काहीसे गारठले होते. त्यांचा बार उडणं इतकं सहज शक्य नव्हतं. त्यात पाकिस्तानचे फटाके मात्र उन्हात गरम करून आणले गेले होते. त्यांच्यात ऑलरेडी आग होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामुळेच त्यांचा आवाज जोरदार निघाला आणि इकडे पक्याच्या टेबलावरचा आवाज मात्र ‘डाउन’ झाला.

कसेबसे तोंड घेऊन दीडशे धावा खूप आहेत, आपल्याकडे चांगले बॉलर आहेत, म्हणत पक्याने परत सगळ्यांना धीर दिला. पक्याचा आवडता बॉलर शमी आज फॉर्ममध्ये आहे म्हणत सगळे त्याच्यावर नजरा रोखून होते. पण ‘नसीब ही खोटा तो क्या करेगा लोटा’ असंच पुन्हा पुन्हा म्हणावं लागत होतं. पक्याचा बॉलर पाकिस्तानी फलंदाजांपुढे नांग्या टाकत होता आणि इकडे पक्या आईसवर आईस टाकत टेन्शनफ्री होण्याचा प्रयत्न करत होता. बिचारा ‘स्ट्रेट हॅण्ड’ बुमराह कधी बूम-बूम करेल आणि कधी प्रतिस्पर्ध्यांच्या पायाजवळ जाऊन फुटेल, त्यांच्या चिंधड्या उडवेल असा विचार पक्या अणि त्याचे सोबती करत होते. पण त्याचाही बिचार्‍याचा घाम संपून गेला तरी विकेट काही मिळाली नाही. जसे जसे पाकिस्तानी जिंकण्याजवळ येऊ लागलेे, इकडे पक्याने बिल काऊंट करायला घेतले. आता आपला ‘आवर्‍या’ झाला म्हणत बिचार्‍याने प्रत्येकाला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न सुरू केला. काहीजण शमीला जातीवरून बोलू लागले, काहींना बुमराहची स्टाईल आवडली नाही, तर काहींना किंग कोहलीचे निर्णय… सगळ्यांचा संताप वेगवेगळ्या प्रकारात व्यक्त होत होता, पण कारण एकच होतं. भारताचा जिव्हारी लागणारा पराभव..!

इतक्या दिवसांनी कट्टर प्रतिस्पर्ध्याची जिरवायची संधी होती, तिही ऐन दिवाळीत… अशास्थितीत जोरदार आतषबाजी होणं पक्याला काय सगळ्यांनाच अपेक्षित होतं. पण झालं उलटच. पक् पक् करणारा पक्याही कधी नव्हे तो गप पडला आणि वेटरसह मॅनेजरलाही गुलाबी थंडीत घाम फुटू लागला. टेबलजवळ गेलेल्या वेटरला बिल द्यायला कुणीच तयार नव्हते. प्रत्येकाची तोंडं उतरलेली, प्रत्येकाला बिल द्यायचं जिव्हावर आलेलं.. आता काय बोलायचं. काहींना खरोखर वाईट वाटलेलं पण काहींना क्रिकेटचा ‘क’ माहीत नाही, त्यांनी उगाचच नाटकं सुरू केली. अशात पक्याने मध्यस्थी केली. खेळ खेळ असतो, अकरा वेळा आपण जिंकतोय, एखाद वेळेस त्यांचीही दिवाळी गोड होऊ द्या म्हणत पक्याने सगळ्यांची समजूत काढली. तरीही माहोल बनत नव्हता. शेवटी ‘चिंगचाँग’ पक्याच्या डोक्यात ट्युब पेटली. आपली ‘ती’ कंपासपेटी काढत त्याने मॅनेजरला माईक द्यायला सांगितले. आता तीन तासांपासून मैदानात असलेला पक्या बर्‍यापैकी ‘सेट’ झालेला होता, त्यामुळे ‘स्टेज डेअरिंग’ तर हाय लेव्हलला पोहोचलं होत म्हणा. मग काय पक्याने माईक घेतला आणि मस्त एक किस्सा वाचून दाखवला. पक्या म्हणाला, ‘मितरांनो… तुम्ही पितात का..?’ लागलीच सगळीकडे हशा पिकली. मदिरालयात बसल्यावर दुधाचा विषय म्हणजे अजबच होता. पण पक्याचा मूळ उद्देश इथेच सफल होऊ लागला.. उतरलेली तोंड काहीशी फुलली. मग पुन्हा काहींनी हात वर केले, तर काहींनी चिंग झालेल्या माना डोलावल्या. मग पक्या म्हणाला..

‘तुम्ही दुधात काय टाकून पितात… किंवा प्यायचे…?’ तेवढ्यात पक्याच्याच ग्रुपमधल्या एकाने हॉर्लिक्स, बॉर्नव्हिटा अशी नावं घेतली. पुन्हा हशा पिकली. पक्याने मोठ्या डेअरिंगमध्ये पुन्हा विचारलं, ‘मी पण बॉर्नव्हिटा पितो, पण तुम्ही कधी बॉर्नव्हिटाची अ‍ॅडव्हर्टाइज पाहिली आहे का?’ तेव्हा काहींनी होकार दिला. यावेळी बर्‍यापैकी पुन्हा वातावरणनिर्मिती झाली होती. एव्हाना सगळ्यांना लाजिरवाण्या पराभवाचा काहीसा विसरही पडला होता. आता पक्याने ही अ‍ॅडव्हर्टाइज आपल्या कंपासपेटीवर वाजवली आणि सगळ्यांना ऐकवली, ती ऐकून अख्या वातावरणाला चार चाँद लागले. ही जाहिरात म्हणजे यातील धावपटू आई तिच्या मुलाला धावणे शिकवत असते पण तो तिच्या बरोबरीने पळू शकत नसतो. पण योग्य सरावातून अखेर तो तिला हरवतो आणि तेव्हा ती आई म्हणते… ‘मेरे बेटे को जीत की आदत तभी लगेगी जब वो मुझे हराएंगा’

बस मग काय..? मॅच हारूनही शिट्यांची बरसात होऊ लागते. पक्याचे मित्र तर त्याला डोक्यावर घेऊन नाचू लागतात आणि क्षणार्धात सगळ्यांचा पुन्हा घसा ओला करण्याचा मूड बनतो. तात्पर्य काय तर, खेळात हार जीत सुरूच असते ओ..पण जर हार झालीच तर ती पचवायला ‘इनो खायचीसुद्धा तयारी ठेवायला हवी एवढंच. जे इनो पक्याने या तंग वातावरणात सगळ्यांना पाजलं, ते त्याच क्षणापासून सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल झालं आणि त्यांच्या क्राईम पार्टनर्सनेही त्याला चांगलाच ट्रोल केला. त्यांच्या या डायलॉग्सचे मिम्सही चांगलेच व्हायरलं झाले आणि ऐन दिवाळीत ‘उदास’ झालेले चेहरे मोती साबण, उटणं लावल्यागत उजळले… फुल्ल चार्ज झालेला पक्या पण ‘ट्रोल बेबी ट्रोल’ म्हणत आनंदाने उड्या मारत मित्रांसोबत घरच्या रणभूमीकडे रवाना झाला.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -