घरफिचर्ससारांशशिक्षणाचा पराभव...!

शिक्षणाचा पराभव…!

Subscribe

समाजात पोलीस, न्यायालय आणि तुरुंगांची संख्या कमी होत असेल तर तो शिक्षणाचा परिणाम मानला जातो. आपल्याकडे तुरुंगांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट सातत्याने त्यात वाढ होताना दिसत आहे. त्याचा अर्थ शिक्षणाचा वाढलेला आलेख शिक्षणाची उद्दिष्टे आणि समाजमनाच्या अपेक्षा पूर्ण करणारा नाही. समाजाच्या विकासात शिक्षणाचा फारसा परिणामकारक हातभार लागत नाही हे दुर्दैवाने समोर आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलेली खंत देशातील धोरणकर्ते आणि शिक्षणात कार्यरत सर्वांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. आज आपल्याला आत्मभान आले नाही तर उद्याचे भविष्य अंधारमय असणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान दिनानिमित्त न्यायवृंदासमोर बोलताना म्हटले की, आणखी तुरुंग बांधणे यात कसला आला विकास? त्यांच्या या विधानाचा अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. या देशाचे वास्तव चित्र त्यांना अधिक ठाऊक आहे. त्यामुळे इतरांसारखे त्यांच्या मताला दुर्लक्षित करून पुढे जाता येणार नाही. दुसरीकडे साक्षरतेचा आलेख उंचावत आहे आणि देशात तुरुंगांची संख्या वाढत आहे. याचा एकमेकाशी काही संबंध आहे का? ते जाणून घ्यायला हवे. एकीकडे शिक्षणाच्या सार्वत्रकीकरणाने मोठ्या प्रमाणात साक्षरतेचा आलेख उंचावत आहे. उच्च शिक्षणात फार नाही तरी सुमारे ३० टक्के विद्यार्थी प्रवेशित होत आहेत. प्राथमिक शिक्षणात सुमारे ९० टक्क्यांहून अधिक पटनोंदणी होत आहे.

एकीकडे शिक्षणाचा आलेख उंचावणे आणि त्याचवेळी देशात तुरुंग, न्यायालय आणि पोलिसांची संख्या वाढणे हा शिक्षणाचा पराभव आहे. समाजात पोलीस, न्यायालय आणि तुरुंगांची संख्या कमी होत असेल तर तो शिक्षणाचा परिणाम मानला जातो. आपल्याकडे तुरुंगांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट सातत्याने त्यात वाढ होताना दिसत आहे. त्याचा अर्थ शिक्षणाचा वाढलेला आलेख शिक्षणाची उद्दिष्टे आणि समाजमनाच्या अपेक्षा पूर्ण करणारा नाही. समाजाच्या विकासात शिक्षणाचा फारसा परिणामकारक हातभार लागत नाही हे दुर्दैवाने समोर आले आहे. राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली खंत देशातील धोरणकर्ते आणि शिक्षणात कार्यरत सर्वांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. आज आपल्याला आत्मभान आले नाही तर उद्याचे भविष्य अंधारमय असणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

- Advertisement -

समाजात शाळांची निर्मिती करताना शहाणपणाच्या पेरणीची अपेक्षा होती. शिक्षण संस्थांनी समाजात मूल्य आणि संस्कारांची पेरणी करायची असते. शिक्षण घेतलेला माणूस अधिक विवेकी, शहाणा असायला हवा असतो. शिक्षणाच्या प्रक्रियेत आलेल्या प्रत्येक बालकाच्या सुप्त गुणांचा विकास आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची शाळांची जबाबदारी आहे. या देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी जबाबदार नागरिक शिक्षणाने घडवायचा असतो. शिक्षण घेतलेला माणूस अधिक राष्ट्रप्रेमी असायला हवा. शिक्षणातून समग्र परिवर्तनाची अपेक्षा आहे. कोणत्याही देशाच्या विकासाची प्रक्रिया शिक्षणाशिवाय पुढे जात नाही, असे म्हटले जाते.

देश प्रगत करायचा असेल तर केवळ भौतिक विकास करून आपल्याला प्रगत राष्ट्र होता येणार नाही. राष्ट्राची प्रगती ही समाजाच्या शहाणपणावर अवलंबून असते. त्यासाठी शिक्षणातून समाजमनात विवेक, निर्मळता, शास्त्रीय दृष्टिकोन आणि स्वातंत्र्याची भावना कितपत रूजली हे महत्त्वाचे आहे. आपण उत्तम समाज निर्माण केल्याशिवाय आपल्याला विकासाची फळे चाखता येणार नाही. उत्तम समाज निर्माण करण्याचे शाळा आणि शिक्षण हे एकमेव साधन असल्याचे जगभरात मान्य करण्यात आले आहे. त्याचवेळी जगातील दैन्य, दारिद्य्र नष्ट करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही हे जगातील अनेक अर्थतज्ज्ञांनी सूचित केले आहे. त्यामुळे शिक्षणातून या गोष्टी घडायला हव्यात.

- Advertisement -

जे घडायला हवे आहे ते घडताना दिसत नाही म्हणून देशात तुरुंग कमी पडत आहेत. राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली खंत काय सांगते हे लक्षात घेतले तर आपल्या शिक्षणाचा पराभव झाला आहे हे सहजतेने लक्षात येईल. शिक्षण घेतलेला माणूस शहाणपणाने वागेल अशी अपेक्षा असतेच. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य पैलू पडावे म्हणून शाळा, अभ्यासक्रम आणि शिक्षक असतात. शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम, पाठ्यक्रम विकसित केला जात असतो. तो अभ्यासक्रम विकसित करताना गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्य यांचा गांभीर्याने विचार केला जात असतो. गाभाघटकांवर नजर टाकली तर त्यात भारतीय चळवळीचा इतिहास, संविधानिक जबाबदार्‍या, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, समता, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक अडसरांचे निर्मूलन, लहान कुटुंबाचा आदर्श, वैज्ञानिक दृष्टिकोन, महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण, बुद्धी, भावना व कृती समन्वय, जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ याचबरोबर जीवन कौशल्यांचा विचार करता सहानुभूती, सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, निर्णय क्षमता, भावनांचे समायोजन, स्वची जाणीव, समस्या निराकरण, परिणामकारक संप्रेषण, ताणतणावाचे समायोजन, व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध तर मूल्य म्हणून संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता यांचा विचार केला जातो.

या सर्व गोष्टी अभ्यासक्रम निर्मिती करताना विचारात घेतल्या जातात. इतक्या मोठ्या प्रमाणावर आदर्शवादी विचाराचे प्रतिबिंब पुस्तकात दिसत असले तरी या गोष्टी प्रत्यक्षात समाजमनात दिसतात का? देशात धर्माधर्मात सुरू असणारा तीव्र संघर्ष, जातीयता कायद्याने संपुष्टात आली असली तरी मनातील जातीयता संपलेली नाही. आपण स्त्री-पुरुष समानतेबद्दल कितीही कौतुकाने बोलत असलो आणि अधिकार देण्याची भाषा होत असली तरी समाजमनातील ते वास्तव नाही. या देशातील अन्याय अत्याचाराच्या आलेखावर नजर टाकली तर या देशातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार होतात. आपल्या देशात स्त्री ही उपभोगाची वस्तू ही मनाची धारणा शिक्षणाचे प्रमाण उंचावल्यानंतरही संपली नाही. हुंडाबळीचे प्रमाण वाढत आहे. स्त्रीयांच्या आत्महत्येचा आलेखही उंचावत आहे. स्त्रीयांना राजकारण, समाजकारणात पुरेशा प्रमाणात सन्मान मिळताना दिसत नाही. शिक्षण घेतल्यानंतर माणसांच्या मनात परिवर्तन होताना दिसत नाही. अशिक्षित समाजात अन्याय, अत्याचार होत असतील तर शिक्षित समाजात ते प्रमाण कमी होण्याची अपेक्षा चुकीची नाही, मात्र आपल्याकडे आलेख तसा दर्शित करीत नाही. शिक्षणाचे प्रमाण ज्या प्रमाणात उंचावत आहे त्याप्रमाणे गुन्हेगारी उंचावत आहे.

राष्ट्रप्रेम आणि बंधुत्वाची भावना दृढ होताना दिसत नाही. संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. धार्मिक तेढ वाढत आहे. जात, धर्माचा उपयोग राजकारण, समाजकारणात वाढला आहे. धर्माधर्माचा संघर्ष माणूसपण संपुष्टात आणत आहे. आपल्या धर्माचा आदर करताना इतर धर्माचा द्वेष हे अशिक्षितपणाचे लक्षण आहे. धर्म ही व्यक्तीच्या जीवनात पूर्णत: खासगी गोष्ट आहे. धर्माचे संस्कार, परंपरा प्रत्येकाने स्वइच्छेने पाळाव्यात, मात्र ते चार भिंतींच्या आत असायला हवेत. आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपण केवळ भारतीय असायला हवे. वर्षानुवर्षे शालेय जीवनात म्हटली जाणारी प्रतिज्ञा…भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.. हा भाव अद्याप रूजलेला नाही. आपल्या विचारातील मतभेद हे मनभेद होत आहेत. त्यातून एकमेकाला संपविण्याचा प्रयत्न हा निर्लज्जपणा आहे. देशासाठी केलेले कायदे पाळावेत असे आपल्याला वाटत नाही. कायद्याचा भंग करण्यात अधिक प्रतिष्ठा दडलेली वाटते.

आपल्याकडे महामार्गावर सिग्नल व्यवस्था आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेग दर्शित करणारे फलक आहेत, मात्र नियम न पाळता सिग्नल तोडावे वाटतात. रोडवर अधिक वेगाने वाहन चालवताना नियमाचा भंग होतो ही जाणीव असूनही बेजबाबदारपणे आपण वर्तन करतो. त्यातून कोणाच्या तरी जीवाला इजा पोहचली जाऊ शकते. आपल्याकडे वाहनांच्या अपघातात यांत्रिक किती आणि मानवी चुकामुळे किती याचा विचार केला तर मानवी चुकांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर येते. म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊनही पोलिसांना उभे राहावे लागते. हे सारे चित्र म्हणजे अविवेकीपणा आहे. शहाणपणाचा अभाव आहे. त्यामुळे हा देश आपला आहे, आपल्या देशातील लोक आपले बांधव आहेत आणि त्यांच्या विकासासाठी आपण सोबत काम करायला हवे, अशी भावना निर्माण करण्यात आपल्याला यश आलेले नाही हे पुन्हा पुन्हा समोर येत आहे.

तुरुंगांची संख्या वाढणे म्हणजे समाजात संघर्ष, द्वेष, भ्रष्टाचाराचे प्रमाण उंचावणे आहे. हे खरे आहे की आपणाला जेव्हा पोलीस अधिक हवे असतात याचा अर्थ कायद्याचे पालन न करणारी माणसं आणि संघर्ष अधिक आहे. त्यातून न्यायालयांची गरज वाढत जाते. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत आहे. समाजाचा पैसा आणि संस्थांमध्ये काम करताना आपण विश्वस्त असतो, ही गांधी विचाराची भावना संपुष्टात आली आहे. आपण आपलाच समाज आणि राष्ट्रबांधवांना लुटत आहोत. त्यातून विकासाचे चित्र दूर जात आहे. त्यामुळे शहाणपणा आणि विवेक निर्माण केल्याशिवाय आपल्याला सुयोग्य वाटेचा प्रवास करता येणार नाही. त्यामुळे आज शिक्षणाचा पराभव दिसत आहे. अशा वेळी अधिक गंभीरपणे पावले टाकण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -