घरफिचर्ससारांशध्येयपूर्ती...

ध्येयपूर्ती…

Subscribe

ध्येय नसेल तर नुसते चालत राहण्यात काही अर्थ नसतो. मग कसं काय ध्येय निश्चित करावं आणि त्याचा पाठपुरावा करावा याविषयी थोडक्यात सांगण्याचा आजच्या लेखातून प्रयत्न केलाय. प्रत्येकालाच ध्येय गाठायचे असते. तुम्हालाही ध्येयपूर्तीचा ध्यास असेलच, मग त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता ते एकदा नक्कीच पडताळून पाहायला हवंय.

स्वप्नवत जीवन जगणे आणि स्वप्नात जगणे या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्वत: कोणतेही कष्ट न घेता फक्त हे असं घडलं पाहिजे ते तसं झालं पाहिजे हे बोलत राहणे म्हणजे स्वप्नात जगणे आणि मोठ्या मेहनतीने, संयमाने आपली उद्दिष्टे पूर्ण करीत स्वप्नवत जीवन जगणे आहे. ध्येय गाठण्यासाठी स्वप्न आणि कल्पनांमधून बाहेर पडून प्रत्यक्ष कृतिशील बनायला हवे.

ध्येय निश्चित केल्यानंतर बर्‍याच वेळा थेट परिणामांवर लक्ष दिले जाते. ध्येयपूर्ती झाल्यावर काय काय होईल या जर तरच्या जगात वावर सुरू होतो. ज्याने लाभ तर काहीच नाही, परंतु वेळेचा अपव्यय होतो एवढे मात्र नक्की. मग त्याऐवजी तिथपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित केले तर परिणाम निश्चितच चांगले मिळतील.

- Advertisement -

दुसरा करतोय म्हणून एखादे काम केले की माणसाचा रोबोट झालाच म्हणून समजा. त्यापेक्षा समजून उमजून काम केले तर ध्येय गाठणे सहज शक्य होईल. मग त्यासाठी आवडीचे काम निवडा. त्यानंतर आयुष्यात तुम्हाला एकही दिवस काम करावे लागणार नाही. कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा आणि कुठे थांबायचे हे कळायला हवे. कुठे थांबायचे हेच माहीत नसल्यास तुम्ही तुमची शक्ती वाया घालवाल. आपण यांत्रिक युगात वावरत आहोत. त्यामुळे इथे प्रत्येक वेळी इंधनाची आवश्यकता असते. मग गाडीला ज्याप्रमाणे इंधन लागते त्याप्रमाणे मानवी शरीरालासुद्धा इंधन लागते. मग हे इंधन आपल्या व आजूबाजूच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मिळत असते. थोडं थांबल्याने आपला झालेला प्रवास आपल्याला आठवता येतो, झालेल्या चुका टाळता येतात आणि मुख्य म्हणजे तिथून दिसणारा आपला रस्ता अगदी आखीव रेखीवपणे पाहता येतो.

प्रबळ इच्छाशक्तीसाठी प्रत्येक मनुष्य धडपडत असतो. इच्छाशक्ती एकवटणे तसे कठीण काम. आज ध्येयापासून दूर नेणार्‍या इतक्या गोष्टी आहेत की त्यातून स्वत:ला सावरणे अवघड असते. स्वत:ला योग्य मार्गावर ठेवायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचा सराव केला पाहिजे. याच छोट्या गोष्टी मोठे बदल आयुष्यात घडवून आणतात. एखादी छोटी सवय जर बदलायची असेल तर त्या बदलाविषयी स्वत:ला नेहमी सांगत राहा. वाईट व्यसन तुम्ही करीत असाल आणि मनापासून सोडू इच्छित असाल तर मनाला सतत सांगत जा की, मला हे सोडायचं आहे. स्वत:वर ताबा ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सतत करत जा. याने इच्छाशक्ती वाढेल आणि नक्कीच फायदा होईल.

- Advertisement -

तुम्ही प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याच्या मागे लागाल तर इतर कामे तशीच राहतील. त्यामुळे एका वेळी एकच काम हाती घ्या आणि पूर्णत्वास न्या. एक समस्या दूर करण्याऐवजी एक पाऊल यशस्वीरित्या टाका. यामुळे पुढे जाता येईल. लक्षात ठेवा की यशस्वीपणाने टाकलेले एक छोटे पाऊल तुमचे अख्खे जीवन बदलून टाकू शकते.

आपण जेवढी अधिक आपली प्रगती साधत राहाल, तेवढे अधिक कामाशी जोडले जाल. असे करताना आपण इतरांची मदत घेऊ शकता. स्वत:ला मोनिटर करीत राहिल्याने स्वत:मधील बदल कळतात व अजून कशी प्रगती साधू शकतो हेदेखील समजते. चूक झाली तर त्यात बदल करू शकतो. चुकलात आणि त्यात सुधारणा केली नाही तर ती तुमची चूकच मानली जात असते.

ध्येय गाठणे अवघड वाटल्यास प्रयत्नांत बदल करायला हवा, ध्येयात नाही. ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आणि मग साधे सरळ आयुष्य अवघड होऊन बसते. खरे पाहायला गेले तर जीवन सोपे आहे, पण त्याला अवघड बनवणारे आपणच असतो. आपल्या आत डोकावून पाहिल्यास त्यात काही चुकीचे आढळत नसल्यास मग काळजी कशाची? भीती का? भीतीच्या दुसर्‍या बाजूला खरे यश असते.

त्यात पण स्वत:पेक्षा दुसर्‍याच्या आयुष्याचा अधिक विचार केल्याने आपलाच र्‍हास होतो हे समजत नाही, मग स्वत:च्या अंगणात घाण साचलेली असताना शेजारच्या घराचे छत घाण असल्याची तक्रार करायला सुरुवात होते. वैयक्तिक र्‍हासाचे कारण बनण्यापेक्षा स्वत:ची ध्येयपूर्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगाला सुधारण्यासाठी आधी देशाला सुधारायला हवे. देशाला सुधारण्यासाठी आधी कुटुंबाला सुधारले पाहिजे. कुटुंबाला सुधारण्याआधी स्वत:च्या आयुष्याला सुधारले पाहिजे. त्यामुळे सुरुवात करायचीच असेल तर स्वत:च्या आयुष्यापासून करा.

ज्ञानी लोक तीन मार्गांनी ज्ञान मिळवत असतात. पहिला चिंतनाने ज्याला आपण ध्यान किंवा केलेल्या अभ्यासाचे पठन म्हणू शकतो, जो उत्तम मार्ग आहे. मौन माणसाचा खरा मित्र. तो कधीही धोका देत नाही. दुसरा इतरांकडून शिकून, जो सोपा आहे व तिसरा अनुभवाने, जो कठीण आहे. जे कठीण आहे ते तितकेच महान आहे. म्हणूनच अनुभवाला सर्वात श्रेष्ठ गुरूचे स्थान आहे. या ध्येयपूर्तीच्या प्रवासात तुम्हाला खूप चांगले वाईट अनुभव येतील. विश्वास ठेवा, हेच अनुभव तुमची खरी ताकद बनतील. जेव्हा हे लक्षात येईल की आपल्याला या प्रवासात अपयश येतंय तेव्हा ध्येय बदलू नका. ते मिळवण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांत बदल करा. आपले भविष्य आपल्याच हातात असते. त्यामुळे भविष्य सुधारावयाचे असेल तर आपला भूतकाळ न्याहाळून पाहायला हवा. भूतकाळात केलेल्या चुका टाळा. मी माझ्या आयुष्यात प्रश्न विचारणारी व्यक्ती आहे. खूप चिकित्सक व कुतूहल असले की प्रश्न पडतात. त्यामुळे जो प्रश्न विचारतो, तो एका मिनिटासाठी मूर्ख समजला जाईल, मात्र जे प्रश्न करीत नाहीत, ते आयुष्यभर मूर्ख मानले जातील.

ध्येयपूर्ती करीत असताना येणार्‍या प्रत्येक संकटाचा सामना मोठ्या जिद्दीने केला तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. शिक्षणाच्या दृष्टीने प्रगल्भ असलेले लोक स्वतंत्रपणे याचा विचार करू शकतात. शिक्षणाने आत्मविश्वास व आत्मविश्वासाने निर्माण होणारी आशा यामुळे आयुष्यात समाधान लाभत असते. चांगला माणूस व ध्येयपूर्ती होण्यासाठी गरज आहे कमीत कमी बोलणे आणि कष्ट करण्यासाठी नेहमी पुढे सरसावणे. मुख्य म्हणजे दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. आपले ध्येय पूर्ण करताना होणारे स्वत:मधील चांगले बदल हे आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या लोकांसाठीच नव्हे तर स्वत:साठीसुद्धा आश्चर्यकारक असतात.

-निकिता गांगुर्डे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -