घरफिचर्ससारांशबूस्टर फसवणूक !

बूस्टर फसवणूक !

Subscribe

साधारण गेल्या अडीच वर्षांपासून जगभरात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने सर्वांचीच झोप उडवली होती. या आजारामुळे मोठ्या प्रमाणावर जैविक आणि आर्थिक नुकसान सोसावे लागले. आधीच, कोविड, एसआरएस 2, डेल्टा ह्या विषाणूंपासून मुक्तता मिळू पाहत असतानाच ‘ओमायक्रॉन’चा आणखी एक व्हेरिएंट (बीए-2) वेगाने पसरत असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण करणे गरजेचेच झाले आहे. या आजाराचा वाढता आलेख पाहून दोन कोविड लसींच्या डोससोबत आणखी तिसरा बूस्टर डोसही गरजेचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक राज्यांत हा डोस सुरू केला आहे. हा डोस दुसर्‍या डोसनंतर ठराविक कालावधीने घ्यावा लागतो. हळूहळू सर्वांना हा डोस दिला जाणार आहे.

हे डोस घेण्यासाठी ऑलाईन बुकींगची सुविधा आहे. हे नागरिकांसाठी सोयीचे असले, तरी याद्वारे सायबर गुन्हेगारांना अजून एक साधन मिळाले आहे. बूस्टर डोससाठी नावनोंदणी करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगार लोकांना नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या नावे फोन, मेसेजेस करतात. मग ते गोड गोड बोलून आधार कार्ड, पॅनकार्ड, ओटिपी इत्यादी खासगी माहिती काढतात. त्या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या खात्यातून पैसे उकळतात. यासाठी हे लोक बनावट लिंक्स्, संदेश, अ‍ॅप्स् यांची मदत घेतात. लसीकरण मोफत असल्याचे सांगतात. त्याचबरोबर काहीवेळा ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स् करायला सांगतात, आणि ते झाल्यावर फोन ब्लॉक करतात. कधीकधी हे लोक नागरिकांच्या आधीच्या डोसबद्दलचे डिटेल्स मिळवतात.

- Advertisement -

ते सांगून मधुर संभाषणाने फोनवरील व्यक्तीवर प्रभाव पाडतात. या गुन्हेगारांचे प्रमुख लक्ष अशी माणसे असतात ज्यांना तात्काळ उपचारांची, लसीकरण, ऑक्सिजन सिलेंडर्स इत्यादींची आवश्यकता असते. त्यामुळे असे लोक जीवाच्या काळजीने भावनिक होऊन कोणतीही शहानिशा न करता सहज यांच्या जाळ्यात फसतात. सायबर गुन्हेगारांचे ऐकून फोनवरील लिंकवर क्लिक किंवा विशिष्ट की प्रेस करुन बसतात. आपण काय चूक केली, हे कळण्याच्या अगोदरच त्यांचे खाते रिकामे झालेले असते.

तंत्रज्ञानाच्या ह्या युगात बर्‍याच गोष्टी ऑनलाईन माध्यमातून केल्या जातात. ते पारंपरिक पद्धतीपेक्षा सुलभ व सोयीचे आहे खरे; परंतु हे वाढते तंत्रज्ञान एका अर्थाने सायबर गुन्ह्यांना आमंत्रणही देते आहे, हेही तितकेच खरे आहे. त्यातही कोरोना हे नुसते नाव जरी ऐकले, तरी अंगावर कांटा येतो, इतकी ह्या आजाराची दहशत आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याला हा आजार होऊ नये, म्हणून लसीकरण करून घेण्यास जबाबदार नागरिक प्राधान्य देत आहेत. सामान्यतः लसीकरणाच्या नावाखाली कुणी आपल्याला फसवू शकते, हेच सामान्य लोकांच्या लक्षात येण्यासारखे नाही. त्यामुळे अगदी हुशार, सुशिक्षित लोकही आरामात जाळ्यात सापडत आहेत. लसीकरण करणे गरजेचे असल्याने तेही टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे ह्या संदर्भात सर्व नागरिकांनी जागरूक राहणे अपरिहार्य झाले आहे. आपली फसवणूक तर होत नाही ना, आपण लसीकरणाच्या योग्य त्याच वेबसाइटवर लॉग इन करत आहोत ना, ह्या गोष्टींची खात्री प्रत्येकाने करून घ्यायला हवी. मुळात, बूस्टर डोससाठी जे रजिस्ट्रेशन केले जाते, त्यासाठी कॉल येत नाहीत.

- Advertisement -

पंजाब येथील एका व्यक्तीला अशा पद्धतीने फसविण्यात आले. त्या व्यक्तीने ही माहिती दिली- आधी तुम्हाला एक फोन येतो, पलीकडून विचारण्यात येते की, आपल्या प्रदेशात किंवा जवळपासच्या भागांमध्ये कोविड रुग्णांची संख्या किती आहे, मग पुढचा प्रश्न असतो की तुम्ही लस घेतली की नाही, कुटुंबात किती सभासद आहेत, त्यांच्यापैकी किती जणांनी लस घेतली, किती जण बाकी आहेत, ह्या सर्व गोष्टींची चौकशी केली जाते. यापुढे विचारले जाते की, आपल्याला लस घरी घ्यायला आवडेल की इस्पितळात जाऊन घ्यायला आवडेल? असे विचारल्यावर जास्तीत जास्त लोक घरीच घेणे पसंत करत असल्याचे सांगतात. मग पलीकडून आधार कार्ड नंबर मागितला जातो. यानंतर आपले रजिस्ट्रेशन झाले आहे, असे सांगण्यात येते. मग एक ओटीपी येईल, तो आम्हाला ओळख पटवण्यासाठी गरजेचा आहे, असे म्हणून तो मागितला जातो, आणि आमची टीम तुमच्याकडे लस देण्यासाठी येईल, असे म्हणून फोन ठेवला जातो. यानंतर वर घेतलेल्या आधार नंबरशी जोडलेली सर्व खाती रिकामी होतात. उत्तर प्रदेशातही ह्या प्रकारे एक हजारहून अधिक लोकांना लुटण्यात आले. हे लोक विशिष्ट टूल्सच्या मदतीने खोटे ओटीपी तयार करू शकतात. पण ओटीपीमुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. तसेच, यांच्याकडे आधी मिळवलेली आपली खासगी माहिती असतेच!

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व साइबर क्राईम विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही संशयित कॉल, मेसेज किंवा इमेलकडे दुर्लक्ष करावे, तसेच, स्क्रिनवर कुठेही खात्री केल्याशिवाय क्लिक करु नये. कोणताही सरकारी विभाग कधीही असे कॉल्स इ. करत नसून अ‍ॅपही इन्स्टॉल करण्यास सांगत नाही याची नोंद घ्यावी. लसीकरणाचे बुकींग केवळ ‘कोवीन’ वर होते किंवा थेट केंद्रावर जाऊन लसीकरण करता येते. त्याचबरोबर ‘आरोग्य सेतू’ हे अ‍ॅप खास कोविड संबंधी बाबींसाठी असल्याने त्यावरून सुद्धा लसीकरणाची नोंदणी उपलब्ध आहे. ह्याच मार्गांनी नोंदणी करता येते. मुळात कोणत्याही बाबतीत नोंदणी ही अशी फोन वर होत नाही.

आपल्याला आलेला फोन कॉल हा खरा आहे की खोटा, हे समजण्यासाठी ट्रू कॉलरसारखे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर अवश्य करावा. जेणेकरून स्पॅम कॉल ताबडतोब समजण्यास मदत होईल. ओटीपी हा केवळ ज्याच्या फोनवर येतो, त्या व्यक्तिपुरताच मर्यादित असतो. वरील कोणत्याही प्रकारे फसवणूक झाल्यास लगेचच 155260 या वेब पोर्टलवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. जेणेकरुन सायबर सेलचे सदस्य उपलब्ध सामुग्रीच्या आधारे गुन्हेगारांचा तपास करुन नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळवून देवू शकतील. तसेच बूस्टर डोस हा ज्यांना आवश्यक आहे, त्यांना दिला जातो आहे. आपल्यापर्यंत सुद्धा तो येणारच आहे. कोविडच्या दुसर्‍या लसीनंतर 9 महिन्यांचा कालावधी मध्ये जावा लागतो. त्यानंतरच हा तिसरा डोस देण्यात येतो, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. ह्या ठराविक कालावधीनंतर आपण थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही हा डोस घेऊ शकता. हा डोस घेण्यासाठी केलेली घाई नागरिकांना पस्तवायला भाग पाडू शकते.

तसेच, बरेच लोक लसीकरण झाल्यावर सोशल मीडियावर सर्टिफिकेट शेअर करतात. हा जवळजवळ ट्रेंड झालेला दिसून येतो आहे. पण, ह्यामुळे सायबर ठगांचे काम सोप होते. कारण सर्टिफिकेट वर आपल्या डोससंबंधी वैयक्तिक तपशील असतात. मग ते पाहून त्या व्यक्तीला लक्ष्य बनवणे हा सायबर गुन्हेगारांच्या डाव्या हाताचा खेळ होतो. त्यामुळे, लसीकरण केल्याचे सोशल मीडियावर टाकताना, नागरिकांनी कृपया सर्टिफिकेट शेअर करू नये. ते आपल्याला आर्थिक संकटात टाकू शकते. सगळ्यात जास्त बुस्टर डोसच्या नावाने होणारे सायबर फ्रॉड हे ह्याच प्रकारे केले जातात. वरील माहितीवरून असे लक्षात येते की, हे असे गुन्हे घडू न देणे हे आपल्याच हातात आहे. आपण जर कुणाला माहिती दिलीच नाही, अशा फोन कॉल्सना प्रतिसाद दिलाच नाही, सोशल मीडियावर खासगी माहिती अपलोड केलीच नाही, तर हे गुन्हे घडणारच नाहीत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली, तर निश्चितच कोणत्याही सायबर ठगाला फसवणूक करणे इतके सोपे जाणार नाही. सायबर गुन्हे कमी करण्यासाठी सर्वात जास्त गरज आहे ती आपण सर्वसामान्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांबद्दल जागरूक राहण्याची नितांत गरज आहे. तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही माहिती देऊन सावध करणे आणि आवश्यक ती काळजी घेणे हे सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यास सहाय्यक ठरू शकते.

–तन्मय दीक्षित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -