घरफिचर्ससारांशसमाज, संसद आणि धर्म

समाज, संसद आणि धर्म

Subscribe

द्रौपदीला जिवंतपणी न्याय मिळाला नाही. पूजा चव्हाणला मेल्यावरही न्याय मिळणार नाही. राजसंसद असो की धर्मसंसद, तेव्हाही विकली गेली होती, आताही विकली गेली आहे. एका कोवळ्या मुलीला न्याय देण्याची संवेदना समाज मार्तंडांच्या मनात जराही जागी झाली नाही. तेवढी त्यांच्यात हिंमतही नाही. उलट ते सारे सत्तेचे पाय चेपण्यासाठी पुढं सरसावले आहेत. ह्यात कोणती नीतिमत्ता आहे? हा कोणता धर्म आहे? हे कसले महंत आहेत? ही कसली पिठं आहेत? मूळ धर्माची शिकवण असल्या कृत्यांना खरंच मान्यता देवू शकते का?

समाज असो, राजकारण असो, धर्म असो की पक्ष असो, सार्‍याच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अध:पतन सुरू आहे. सर्वत्र बाजारबुणग्या लोकांची चलती आहे. नीतिमत्ता आणि विवेक कधी नव्हे एवढा रसातळाला गेला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण म्हणजे त्याबाबतचा ताजा पुरावा आहे एवढंच! तो अपघात आहे, आत्महत्या आहे, की खून आहे, ह्यातलं सत्य बाहेर येण्याची शक्यता तशी कमीच आहे. आणि समजा सरकारनं अत्यंत प्रामाणिकपणे तपास केला, तरी त्यातील निष्कर्षावर विश्वास ठेवायचा की नाही, हे मात्र जो तो आपापल्या सोयीप्रमाणे ठरवणार आहे.

मुळात जी व्यक्ती निघून गेली, ती तर गेलीच ! ती काही परत येणार नाही. त्यामुळे तुमचं आमचं काही त्यात व्यावहारिक नफा-नुकसान आहे का? तर.. मुळीच नाही! या प्रकरणाशी डायरेक्ट संबंध आहे, तिच्या आईवडिलांचा. कुटुंबाचा. पण त्यांची अवस्था फार अवघड झाली आहे. दुसरा डायरेक्ट संबंध येतो तो मंत्री संजय राठोड यांचा. त्यांच्याबाबत केलेले आरोप खरे किंवा खोटे, हा भाग पूर्णतः वेगळा आहे. सत्य माहीत असलेली एकमेव अधिकृत व्यक्ती म्हणजे.. फक्त संजय राठोड हेच आहेत. बाकी दोन नावे हे तर नुसते मोहरे आहेत.

- Advertisement -

या प्रकरणी अगदी व्यावसायिक तोडीचं आणि नेमकं रेकॉर्डिंग असलेल्या 11 ऑडियो क्लिप्स जाहीर झालेल्या आहेत. बारावी क्लिप संभ्रम निर्माण करणारी आहे. हा साराच एका सुनियोजित कटाचा भाग असावा, अशी शंका घ्यायलादेखील जागा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, यावर राठोड यांचं भवितव्य अवलंबून आहे. अर्थात असे धक्के सर्वच राजकीय पक्षांना मध्ये मध्ये बसत असतात. त्यात काही नवीन नाही. खुद्द भाजपला सुद्धा प्रमोद महाजन यांच्यामुळे ‘शिवानी’ प्रकरणी देशव्यापी धक्का बसला होता. पण पुढं काही झालं नाही. फार काही होतही नसतं. आताही फारसं काही होणार नाही. फार फार तर राठोड यांच्याकडून तात्पुरता राजीनामा घेतला जाईल. ठरल्याप्रमाणे चौकशी पार पडेल. अहवालात अपघाती मृत्यू असा अहवाल येण्याची शक्यता 90 टक्के आहे. नंतर उद्धव ठाकरे यांना वाटलं तर राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल केलं जाईल. हा ठरलेला राजमार्ग आहे. काही दिवसांनी चित्रा वाघ नावाच्या बाहुलीचा खेळदेखील आपोआप शांत होईल. कारण बंजारा मतांना जास्त डिवचून फायदा नाही, याची जाणीव भाजपला नक्कीच आहे.

मुळात आता हे प्रकरण तसं मर्यादित राहिलेलं नाही. भाजपा चित्रा वाघ सारख्या बोलघेवड्या बाईला समोर करून सोयीचा टाईमपास करत आहे. ह्यातून फारसं काही हाती लागणार नाही, याची त्यांनाही कल्पना आहे. त्यामुळे सुरुवातीला आपलं तुणतुणं वाजवणारे भाजपा नेते आता मौन धारण करून बसलेले आहेत. चित्रा वाघ यांनाही त्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी काहीतरी काम हवंच होतं, ते या निमित्तानं मिळालं आहे. नव्यानं कळपात सहभागी झालेल्या बुलबुलला जीव तोडून नाचण्याशिवाय पर्याय नसतो. त्याशिवाय मजुरी कशी मिळणार ?

- Advertisement -

अर्थात, चित्रा वाघ जे मुद्दे मांडत आहेत, त्याबद्दल मात्र वाद असण्याचं कारण नाही. मात्र त्याचवेळी त्या धंदेवाईक राजकारणी आहेत, त्यांना न्याय, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा या गोष्टींशी काहीही देणंघेणं नाही, हेही आपण लक्षात घ्यायला हवं. अर्थात, त्यांचा हेतू धंदेवाईक असला, तरी मागणी मात्र मुद्देसूद आहे. याबद्दल वाद नाही. थोडाफार आक्रस्ताळेपणा आहे, त्याकडे दुर्लक्ष करूया. राजकारणी असणं चुकीचं नाही. पण राजकारण आणि धंदेवाईक राजकारण ह्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. हल्ली राजकारणात धंदेवाईक प्रवृत्ती सर्वत्र बोकाळलेली दिसते. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. वाघ बाई ह्यादेखील त्याच शाखेच्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार, हे चित्र सर्वमान्य होतं ! तोच फायदा घेण्यासाठी आणि स्वतःच्या नवर्‍यावर जेलमध्ये जायची पाळी येवू नये, याची दक्षता म्हणून या बाईंनी भाजपची दीक्षा घेतली, लोटांगण घातलं, हा इतिहास ताजा आहे.

आता विचार करू या की, आधी ठरल्याप्रमाणे भाजपा-सेना युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं, राठोड मंत्रीही असते आणि बाकी सारी परिस्थिती ए टू झेड सेम असती, तर मग ह्या बाईंची भूमिका याच प्रकरणात नेमकी काय असती ? तेव्हाही ह्या असाच थयथयाट करत फिरल्या असत्या का ? एवढी नैतिकता त्यांच्यात आहे, असं स्वप्नात तरी मानता येईल का? की उलट या निमित्तानं संजय राठोड यांच्याशी जवळीक साधून मोकळ्या झाल्या असत्या ?

अर्थात, हा प्रश्न केवळ चित्रा वाघ यांनाच लागू आहे असं नाही. तो भाजपामधील इतर नेत्यांनाही तंतोतंत लागू आहे. जसा भाजपावाल्यांना लागू आहे, तसाच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनादेखील लागू आहे. त्या त्या पक्षांच्या समर्थकांना, विरोधकांनाही लागू आहे. संबंधित जाती आणि धर्म संस्थांनादेखील लागू आहे.

वास्तव हे आहे, की पूजा चव्हाण प्रकरणाशी कुणालाही काहीही देणंघेणं नाही. तिच्या कुटुंबाशी देखील कुणाला देणंघेणं नाही. खुद्द तिच्या समाजानं आणि विशेषतः तिच्या धर्मपीठ किंवा तत्सम तथाकथित आदरणीय, वंदनीय वगैरे वगैरे लोकांनी तर तिला दुधातील माशीसारखं झटकून टाकलं आहे. एखाद्याची बकरी मारली असती, तरी गावभर आरडाओरडा झाला असता. पण पूजा चव्हाण मात्र तिच्या गावातही दुर्दैवी ठरली.

कसलीही भिडमुरवत न बाळगता धर्मपीठदेखील कौरवांच्या भूमिकेत गेले आहे. द्रौपदीला जिवंतपणी न्याय मिळाला नाही. पूजाला मेल्यावरही न्याय मिळणार नाही. राजसंसद असो की धर्मसंसद, तेव्हाही विकली गेली होती, आताही विकली गेली आहे. एका कोवळ्या मुलीला न्याय देण्याची संवेदना समाज मार्तंडांच्या मनात जराही जागी झाली नाही. तेवढी त्यांच्यात हिंमतही नाही. उलट ते सारे सत्तेचे पाय चेपण्यासाठी पुढं सरसावले आहेत. ह्यात कोणती नीतिमत्ता आहे? हा कोणता धर्म आहे? हे कसले महंत आहेत? ही कसली पिठं आहेत? मूळ धर्माची शिकवण असल्या कृत्यांना खरंच मान्यता देवू शकते का?

समजा, ती दुर्दैवी मुलगी पूजा चव्हाणच असती..पण संशयित मंत्री जर दुसर्‍या समाजाचा असता, तर ? तेव्हा हे धर्ममार्तंड कसे वागले असते ? असेच चूप बसले असते का ? एवढे शांत राहिले असते का? किंवा पीडित मुलगी आणि संशयित मंत्री यांचे धर्म आणि जात वेगळी वेगळी असती, तर त्या त्या समाजांनी अशीच शांतता बाळगली असती का ? खरंच, परिस्थिती लाजिरवाणी आहे. चिंताजनक आहे.

थोडक्यात, तुमच्या माझ्या दृष्टीनं पूजा चव्हाण हे एक साधं नाव असतं, निमित्त असतं. तिचा मृत्यू ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे कधी अपघात असतो. कधी आत्महत्या असते, तर कधी खून असतो. धर्म व्यवस्था, समाजव्यवस्था, न्याय व्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था सार्‍याच आता दलालांच्या हातात गेलेल्या आहेत. माकडांनी बागेवर कब्जा केलेला आहे. कधी या फांदीवरील बंदर त्या फांदीवर, कधी त्या झाडावरील माकड या झाडावर, एवढीच अदलाबदल सुरू असते. कुणाला माकड म्हटलं काय किंवा बंदर म्हटलं काय.. काहीही फरक पडत नाही ! हे असंच सारखं सुरू आहे आणि त्यालाच आपण लोकशाही म्हणतो.

मेहनतीनं बागा लावणार्‍या, पाणी घालणार्‍या, कुंपण करणार्‍या, राखण करणार्‍या पिढ्या केव्हाच निघून गेल्या आहेत. आता फक्त दलालीसाठीची लढाई सुरू असते. समाज असो, संसद असो की धर्म असो, सर्वत्र हेच सुरू आहे. ह्याला तुम्ही अपघात म्हणा, आत्महत्या म्हणा की खून म्हणा.. पण जबाबदार आम्ही स्वतः आहोत, याबद्दल संशय नाही.

जाऊ द्या. उगाच टेन्शन घेण्यात अर्थ नाही. किडे मुंग्या देखील जगतातच ना ! ते कुठं असले फालतू विचार करत बसतात ? तेही जगतात.. आपणही जगू या !
तूर्तास एवढंच..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -