घरफिचर्ससारांशकभी कभी आसपास चाँद रहता है...

कभी कभी आसपास चाँद रहता है…

Subscribe

प्रेमात पडलेल्या तरुणीच्या मनातल्या भावना-आशा-आकांक्षा-इच्छा इतक्या रूपकात्मक पद्धतीने गुलजारने चितारल्या आहेत की आपल्याला कोडं पडतं. ‘यहाँ’ या चित्रपटाची कथा काश्मीरच्या पार्श्वभूमीवर असून तिथल्या लोकांची जीवनशैली, संस्कृती, तिथलं निसर्गसौंदर्य आणि तिथली बंडखोरी, तिथला असंतोष यांचं प्रतिबिंब चित्रपटात उमटलंय. चित्रपटातल्या नायिकेच्या ‘अदा’ या नावाचा गुलजारने गाण्यात चपखल उपयोग केला आहे. रात्रीच्या घनघोर अंधारात चंद्राचा शीतल प्रकाश केवळ उजेडच न राहता आशेचाही किरण बनतो.

सहारा वन मोशन पिक्चर्स आणि रेड आईस फिल्म्सची संयुक्त निर्मिती असलेला आणि शूजीत सरकारने दिग्दर्शित केलेला ‘यहाँ’ हा चित्रपट जुलै २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये जिम्मी शेरगिल, मिनीषा लांबा, यशपाल शर्मा आणि मुकेश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे संवाद पियुष मिश्र यांनी तर पटकथा त्यांच्यासह सोमनाथ डे, शूजीत सरकार व समीर कोहली यांनी लिहिली आहे. हा दिग्दर्शक शूजीत सरकार आणि अभिनेत्री मिनीषा लांबा यांचा पदार्पणाचा चित्रपट. याला शांतनू मोईत्रा यांनी संगीत दिलं असून गाणी अर्थातच गुलजार यांची. यात नाम अदा लिखना….(श्रेया घोषाल-शान), उर्जू उर्जदूर कूट … (श्रेय घोषाल), मेले चलिये के लेके आवे … (श्रेया घोषाल) ही श्रवणीय गाणी आहेत. (गाण्यांचे हक्क असलेल्या टाइम्स म्युझिक कंपनीने नाम अदा लिखना … हे गाणं मधुबंती आणि श्रेयस पुराणिक यांच्या आवाजात नव्याने ध्वनिमुद्रित करून २०१९ मध्ये पुन्हा सादर केलं आहे. ) याच चित्रपटगीताविषयी…

पुछे जो कोई मेरी निशानी, रंग हिना लिखना
गोरे बदन पे उंगली से मेरा नाम अदा लिखना

- Advertisement -

कभी कभी आसपास चांद रहता है
कभी कभी आसपास शाम रहती है…
आओ ना आओ ना…
जेहलम में बह लेंगे…
वादी के मौसम भी
इक दिन तो बदलेंगे
कभी कभी…

आऊ तो सुबह, जाऊ तो मेरा नाम सबा लिखना
बर्फ पडे तो, बर्फ पे मेरा नाम दुआ लिखना
जरा जरा आग-वाग पास रहती है
जरा जरा कांगडी की आंच रहती है
कभी कभी…

- Advertisement -

(शामे बुझाने आती है राते
राते बुझाने, तुम आ गए हो )

जब तुम हंसते हो, दिन हो जाता है
तुम गले लगो तो, दिन सो जाता है
डोली उठाये, आएगा दिन तो पास बिठा लेना
कल जो मिले तो, माथे पे मेरे सूरज ऊगा देना

जरा जरा आस पास धूप रहेगी
जरा जरा आस पास रंग रहेंगे
पुछे जो कोई …
कभी कभी आसपास चाँद रहता हैं
कभी कभी आसपास शाम रहती हैं…

प्रेमात पडलेल्या तरुणीच्या मनातल्या भावना-आशा-आकांक्षा-इच्छा इतक्या रूपकात्मक पद्धतीने गुलजारने चितारल्या आहेत की आपल्याला कोडं पडतं. चित्रपटाची कथा काश्मीरच्या पार्श्वभूमीवर असून तिथल्या लोकांची जीवनशैली, संस्कृती, तिथलं निसर्गसौंदर्य आणि तिथली बंडखोरी, तिथला असंतोष यांचं प्रतिबिंब चित्रपटात उमटलंय. चित्रपटातल्या नायिकेच्या ‘अदा’ या नावाचा गुलजारने गाण्यात चपखल उपयोग केला आहे. रात्रीच्या घनघोर अंधारात चंद्राचा शीतल प्रकाश केवळ उजेडच न राहता आशेचाही किरण बनतो. हे शब्द म्हणजे प्रेम आणि आशा यांचा उत्कट मिलाफ. गाण्यातली प्रेयसी मेंदीचा चमकदार रंग अशी आपली ओळख करून द्यायला सांगते. सैन्य अधिकारी अमन आणि दहशतवादी भावाची बहीण असलेल्या अदा यांची ही प्रेमकहाणी. इथं शांतता नांदली तरच त्यांची प्रेमकहाणी पुढे जाणार आहे. काश्मीर खोर्‍यातली परिस्थिती नक्की बदलेल असा आशावाद गुलजारने व्यक्त केलाय.

आपल्या जीवलगासोबत झेलम नदीत मुक्त विहार करण्याची, यथेच्छ डुबकी मारण्याची, अंघोळ करण्याची तिची इच्छा आहे. गाण्यातला प्रियकर तिला सांगतो की, त्याचं येणं म्हणजे सकाळ होणं आणि जाणं म्हणजे प्रार्थनेसोबतचा हिमवर्षाव ! कांगडी म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासाठी काश्मीरमध्ये वापरण्यात येणारं मातीचं भांडं. हे एक आशेचं प्रतिक म्हणून आलंय. असंतोष, अशांतता, संघर्षग्रस्त या प्रदेशात कांगडी त्यांना आशेचीही ऊब देते. तुमचं सर्वस्व असलेल्या व्यक्तीच्या साध्याशा कृती म्हणजे येणं-जाणं देखील विलक्षण वाटतात.

संध्याकाळ संपल्याची घोषणा करण्यासाठी जशी रात्र येते तशी आशादायक सकाळ रात्र संपल्याची घोषणा करते. त्याच्या हास्याने दिवस उजाडतो नि त्याच्या उबदार मिठीने तिला संध्याकाळ झाल्याची जाणीव होऊन ती निद्रादेवीला शरण जाते. निरोपाची वेळ आली तर या वेळेला थोपवून ठेवण्याची विनंती ती प्रियकराला करते. या काळोख्या रात्री लख्ख उजळलेल्या दिवसांत परावर्तीत करायला सांगते. भवताली ऊन आणि रंग असणं हे आशेची प्रतीकं म्हणून आली आहेत. दहशतीच्या पार्श्वभूमीवर आकारास येत असलेल्या प्रेमाचं विलोभनीय पण निराशेची छटा असलेलं हे युगल गीत रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून राहणारं आहे.

चित्रपटातल्या दुसर्‍या गाण्याचा आस्वाद घेऊ या..

छन्न से बोले चमक के जब चनर बोले
ख्वाब देखा है आंख का खुमार बोले
ख्वाब छलके तो आंख से टपक के बोले
झरना छलके तो पूरा आबशार बोले
उर्जू ऊर्जदुर कूट, उर्जू उर्जदुर कूट, उर्जू उर्जूदुर कूट

हरे ख्वाब की हरी चुडिया
कलाई में किसने भरी चुडिया
उठी निंद से चली आई मैं
साथ ही आ गई मेरी चुडिया
आंख बोले के ख्वाब ख्वाब खेलते रहो
रोज कोई एक चांद बेलते रहो
चांद टूटे तो टुकडे टुकडे बांट लेना
गोल पहिया है रात दिन धकलते रहो
उर्जू उर्जदुर कूट, उर्जू उर्जदुर कूट, उर्जू उर्जदुर कूट

हे एक आनंदी, खेळकर गाणं. यातले उर्जूदूर कूट हे काश्मिरी बोलीतले शब्द म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी वापरली जाणारी म्हण. उर्जू म्हणजे उत्तम आरोग्य आणि दूर कूट म्हणजे मजबूत गुडगे. ख्वाब ख्वाब देखते रहो… या ओळीतून खोर्‍यात शांतता प्रस्थापित होण्याची आशा व्यक्त झालीये. आधीच्या गाण्याप्रमाणे इथंही चंद्र आशेचा प्रतीक बनलाय. चंद्राच्या गोलाकाराप्रमाणे चपाती बनवण्याची कल्पना कवीने केलीये. चिंता आणि तणावाच्या काळात दररोज आशेच्या चपात्या बनवत राहण्याचा सल्ला गुलजार देतात. इथं काळाचं रूप म्हणून चाकाची कल्पना केलीये. शांत, समृद्ध आणि सौहार्दपूर्ण परिस्थिती निर्माण होण्यासाठी हे चाक पुढे ढकलत राहण्यास सांगितलं आहे. भक्कम असलेलं आणि संथ गतीने चालणारं चाक पुढे ढकलण्यासाठी मजबूत गुडघ्यांची गरज आहे. सुरक्षित आणि निरोगी काळाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही काश्मिरी म्हण आहे. याचा शब्दश: अर्थ म्हणजे ‘आपले गुडगे असेच मजबूत राहावेत ! (आपके घुटने सलामत रहे !) गुलजार-शांतनू मोईत्रा जोडीची ही दोन गाणी अनवट, अर्थपूर्ण नि अविस्मरणीय अशीच आहेत, यात शंका नाही !

–प्रवीण घोडेस्वार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -