घरफिचर्ससारांशअधिकार मानवाचा !

अधिकार मानवाचा !

Subscribe

मानव आणि समाज एकमेकांच्या गरजा भागवत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, मात्र मानवाच्या सर्वांगीण विकासकारिता शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक या गरजा देखील महत्वाच्या आहेत. आणि या गरजांमधूनच हक्कांची निर्मिती होते, म्हणून मानवी हक्क आणि मानवाच्या गरजा यांच्या परस्पर संबंध आहे. शनिवारी १० डिसेंबरला मानवाधिकार दिन साजरा झाला. या निमित्ताने असमानता दूर करून मानवाधिकार जोपासणे या दृष्टीने आपण मानवाधिकार समजून घेवूया.

समाजात जात, धर्म, पंथ, गरीब आणि श्रीमंत तसेच स्त्री-पुरुष असा मोठ्या प्रमाणावर भेद केला जातो. आणि त्यामुळे मानवी अधिकारांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात दिसून येते. समाजात माणसाला जगण्यासाठी जीविताचा हक्क नैसर्गिकरित्या मिळाला आहे. मात्र व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक राजकीय तसेच संसाधने याकरिता असमान वागणूक दिली जाते. मानवाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि स्वत:चा स्वतंत्रपणे विकास करण्यासाठी मानवी अधिकार दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या अधिकारांचे उल्लंघन होताना दिसते. अशा परिस्थितीत हक्क आणि मानवाधिकारांची ओळख करून घेवू या… पहिल्यांदा हक्क म्हणजे काय ते समजून घेवूया. हक्क हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो.

मात्र सध्यासोप्या शब्दात सांगायचे झाले तर हक्क धारण करणारा (हक्कधारक), ज्याला हक्क आहेत असा , कोणते हक्क (हक्कांचा विषय/हेतु ) असे हक्क एखादी व्यक्ती मागू शकते, त्याचा उपभोग घेऊ शकते. हे हक्क एखाद्या व्यक्तीला वा गटाला असू शकतात. मग या हक्कांची गरज का आहे, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. मनुष्य हा समजशील प्राणी आहे. मानव आणि समाज एकमेकांच्या गरजा भागवत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, मात्र मानवाच्या सर्वांगीण विकासकारिता शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक या गरजा देखील महत्वाच्या आहेत. आणि या गरजांमधूनच हक्कांची निर्मिती होते, म्हणून मानवी हक्क आणि मानवाच्या गरजा यांच्या परस्पर संबंध आहे.

- Advertisement -

आता आपण मानवी हक्क वा मानवाधिकार म्हणजे काय? समजून घेवू या. मानवाधिकार हे नैसर्गिक अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार आहेत. पशू, पक्षी, जलचर प्राणी सर्व मानवसारखेच जन्म घेऊन आलेले आहेत. त्यामुळे सर्वांना मूलभूत हक्क हे नैसर्गिकरित्या मिळाले आहेत, मात्र जेव्हा मानवी हक्कांचा विचार करता आपल्या समोर राष्ट्रसंघाने जाहीर केलेले सैद्धांतिक व कायदेशीर हक्क येतात. मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी होत. हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत. स्वतंत्रपणे आणि समूहाने जगण्यासंबंधी हे हक्क आहेत. मानवी हक्क हे माणसाशी संबंधित आहेत. आपले जीवनसुखी, आनंददायी जगण्याच्या दृष्टीने हे हक्क नैतिक हमी देण्याचे काम करतात.

मानवी हक्क समजून घेताना फ्रेंच राज्यक्रांती असो की अमेरिकन राज्यक्रांती असो त्यामध्ये मानवी प्रतिष्ठेची कास धरण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो आणि म्हणून साम्राज्यशाही विरोधात झालेले स्वातंत्र्याचे लढे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी असल्याचे दिसून येतात. आणि म्हणून आपण मानवी हक्कांचे स्वरूप जाणून घेवूया.. मानवी हक्क हे सार्वत्रिक आहेत. ते एक माणूस म्हणून माणसाला मिळालेले असतात. प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी त्याला संधी मिळायला हवी असते. आणि जेव्हा जात, धर्म व लिंगभेदाशिवाय समान संधी दिल्या जातात तेव्हा माणसाच्या सुप्त गुणांचा विकास होतो म्हणून मानवी हक्क हे सार्वत्रिक आहेत. तसेच मानवी हक्क हे काळानुसार विकसित होत असतात. आज आपण नागरी, राजकीय, महिलांचे तसेच महितीचा अधिकार आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार यांचाही विचार करू पाहत आहोत. मुळात मानवी हक्क हे आपल्यापासून बाजूला करताच येत नाहीत. ते जन्मत: मिळतात म्हणून कोणी हिरावूनदेखील घेऊ शकत नाही.

- Advertisement -

मानवी हक्क हे वैश्विक आहेत माणूस एका देशातून दुसर्‍या देशात गेला तरी त्याचे हक्क कायम असतात. मानवी हक्क हे परस्पर संबंधी आणि परस्परावलंबी असतात ते एकत्र बघावे लागतात. मानवी हक्क आणि कर्तव्य हे व्यक्ती आणि राज्यासाठी बंधनकारक आहेत. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि या हक्कांना कायद्याची मान्यता आहे. मानवी हक्कांचे स्वरूप आणि व्याप्ती समजून घेताना असे लक्षात येते की, मानवी हक्क ही अनेकांगी व गुंतागुंतीची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने मांडलेला मानवी हक्कांचा जाहीरनामा खूप महत्वाचा आहे. या जाहीरनाम्यानुसार मानवी हक्क म्हणजे मानवाचे अविभाज्य (स्वाभाविक), वैश्विक आणि परस्परावलंबी हक्क आहे. या तीन वैशिष्ठ्यांच्या आधारे मानवी हक्काचे स्वरूप स्पष्ट होते. मानवी हक्क हे अविभाज्य व परंपरागत असतात. हे निसर्गत: म्हणजे जन्मत: मिळालेले असतात. मानवी हक्क हे वैश्विक असतात, याचा अर्थ व्यक्तीला ती कोणत्याही धर्म,जाती,वंश, लिंग सामाजिक, आर्थिक स्तरातील किंवा भाषा, प्रांत, जन्माचे

ठिकाण कोणतेही असले तरी त्या व्यक्तीला मानवी हक्क प्राप्त होतात, मग ती व्यक्ती कोठेही असो. ती एका देशातून दुसर्‍या देशात गेल्यावरदेखील तिचे हक्क तिच्या सोबत असतात. तसेच मानवी हक्क हे परस्परसंबंधी व परस्परावलंबी असतात. हे सर्व हक्क एकत्रितपणे बघावे लागतात. त्यानुसार कोणताही हक्क स्वतंत्र काढून बघता येत नाही. हे सर्व हक्क सर्व माणसांसाठी अस्तित्वात असतात. आणि म्हणून त्यांना तसेच पहावे. कोणताही एक मानवी हक्क इतर हक्कांपेक्षा अधिक महत्वाचा किंवा श्रेष्ठ नसतो. उदाहरणार्थ,अन्न मिळविण्याच्या हक्काशिवाय जीविताच्या हक्काला अर्थच रहात नाही. माणसाला जगण्यासाठी अन्न हवे असते. तसेच शिक्षण आणि महितीचा हक्क नसेल तर अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याला अर्थच उरत नाही. यावरून असे सांगता येईल की, जीविताचा, अन्न मिळवण्याचा, अभिव्यक्ती व भाषणाचा हक्क हे सर्व हक्क परस्परावलंबी हक्क आहेत. एकूणच मानवी हक्कांची व्याप्ती व्यापक आहे. प्रत्यक्षात व अप्रत्यक्षपणे मानवाच्या संरक्षणासाठी मानवी हक्क महत्वाचे आहेत. मानवाच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये आणि प्रत्येक नागरिकाच्या मानवी हक्कांचे रक्षण याकरिता मानवाधिकार महत्वाचे आहेत.

–चंद्रप्रभा निकम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -