घरफिचर्सदेख के दुनिया की दिवाली...

देख के दुनिया की दिवाली…

Subscribe

दिवाळीचे दिवस आले की कुणाकुणाला दिवाळसणाची तशीच काही गाणी आठवत असतील, म्हणजे, ’आली माझ्या घरी दिवाळी’, ’दिपावली मनाये सुहानी’ वगैरे वगैरे, पण मला का कुणास ठाऊक, मुकेशदांचं एकच गाणं आठवतं - ’लाखों तारे आसमान में, एक मगर ढुंढे ना मिला, देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला.’

सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे, जिकडे बघावी तिकडे रोषणाई आहे, फटाके फुटताहेत, पार आकाशात घुसताहेत, मेवामिठाईची चंगळ सुरू आहे, ज्याच्यात्याच्या अंगावर साजिरेगोजिरे कपडे आहेत, आनंद वातावरणात दुथडी भरून वाहतोय आणि अशा वेळी ’देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला’, हे उदासवाणं गाणं ह्या माणसाला का आठवावं, असा प्रश्न एखाद्याच्या कट्टर पारंपरिक मनाला पडेलही, पण मला ऐन धुमधमालीच्या दिवाळसणातही मुकेशदांचं तेच गाणं आठवतं. आज इतकी वर्षं झाली, इतक्या दिवाळ्या गेल्या तरी माझ्या ह्या स्वभावावर मी आजतागायत काही करू शकलेलो नाही. दिवाळी म्हटली की मला मुकेशदा आठवतात आणि मुकेशदांचं हे गाणं आठवतं म्हणजे आठवतंच.

मुकेशदा आणि मुकेशदांचं ते गाणं आठवण्यामागे तसंच कारण आहे. दिवाळी हवेलीपासून झोपडीपर्यंत, रावापासून रंकापर्यंत प्रत्येक ठिकाणी साजरी होते. पण मुकेशदा म्हणजे मुकेशचंद्र झोरावरचंद्र माथूर नावाच्या एका रईस खानदानातल्या माणसाला गोरगरीबांची दिवाळी कशी साजरी होत असेल ह्याबद्दल एक कुतुहल होतं. त्या काळी दिवाळी तेव्हाच्या पराकोटीच्या थंडीत असायची. आज तशी असह्य थंडी दिसत नाही. त्यावेळी अगदी मुंबईतही हातापायाची हाडं साफ गारठून टाकणारा थंडावा त्या थंडीत असायचा. अशा वेळी स्वत:चं घरदार नसणारा समाजातल्या शेवटच्या स्तरावरचा शेवटचा माणूस थंडीच्या दिवसात कसा जगत असेल, दिवाळीच्या दिवसांत त्याचा जो काही इनमिन आनंद आहे तो कसा साजरा करत असेल, असा एका क्षणी मुकेशजींना प्रश्न पडायचा.

- Advertisement -

..आणि एका दिवाळीत एका रात्री अशाच कडाक्याच्या थंडीत मुकेशदांनी आपली गाडी काढली, डिकीत खच्चून ब्लँकेट्स भरली, मिठाईचे पुडे भरले आणि ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाले. तिथे ते गाडीतून उतरले तेच कळकटमळकट कपड्यांतल्या, रापलेल्या चेहर्‍याच्या बेघर माणसांकडे निघाले. थंडीमुळे तो परिसर तसा सुनसानच होता. जे काही लोक होते ते असेच गोरगरीब होते, कपडे नसल्यामुळे थंडीत कुडकुडत बसलेले होते. मुकेशदांनी त्यांना थेट ब्लँकेट आणि मिठाई द्यायला सुरूवात केली. ते ब्लँकेट आणि ती मिठाई त्या लोकांनी घेताना मुकेशदांनी त्यांच्या चेहर्‍यावर जे समाधान पाहिलं त्यात मुकेशदांना सारंकाही मिळालं. आपण आपल्या आलिशान कुलूपबंद, हवाबंद घरात कुडकुडणार्‍या थंडीतही सुखात झोपू शकतो, पण ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही ती माणसं अशा थंडीत आपला निवारा कसा काय करत असतील हा विचार, तरीही मुकेशदांच्या मनात होता. मुकेशदांच्या मनात कायम अपार करूणा होती म्हणूनच असा आणि इतका हळवा विचार त्यांच्या मनात येत होता.

मुकेशदांच्या आवाजातच ओतप्रोत कारूण्य होतं. हळवेपणात कायम बुडालेल्या राज कपूरच्या चेहर्‍याला तर सदैव मुकेशदांचा आवाज लागायचा. मुकेशदांचा आवाज राज कपूरना शोभायचाही. उगाच नाही मुकेशदा गेले तेव्हा मुकेश हा माझा आत्मा होता, तोच आता निघून गेला आहे, असं राज कपूर म्हणाले होते!

- Advertisement -

आज दिवाळसण जवळ येताना म्हणूनच मुकेशदांची आठवण होते ती त्यांच्या त्या कारूण्याने भरलेल्या आणि भारलेल्या आवाजातल्या त्या गाण्याची – ’लाखों तारे आसमान में, एक मगर ढुंढे ना मिला, देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला!’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -