घरफिचर्सतिचं कौतुक कधी वाटतं?

तिचं कौतुक कधी वाटतं?

Subscribe

सकाळी लवकर उठून घरकाम करुन नोकरीला जाणारी आणि पुन्हा दिवसभर शारीरिक, बौद्धिक कष्ट उपसून घरी पुन्हा कामात स्वत:ला जुंपणार्‍या महिलेविषयी काय वाटतं? अपार कौतुक. ते कौतुक अर्थातच तिनं घरकामात तरबेज असण्यासाठी असतं. ती नोकरीवर जाते, तिथं तिच्या मेंदूचा, बुद्धिमत्तेचा भरपूर वापर करुन कंपनीच्या नफ्यात वाढ करते याचं अप्रुप वाटण्याचं कारण नसतंच मुळी.

कधी विचार केलाय खरंच..आपल्याला आपल्या घरातल्या, घराबाहेरच्या स्त्रियांचं भरपूर कौतुक वाटतं ते नेमकं कशाचं? आपल्या घरातल्या मुलींच्या, महिलांच्या कोणत्या प्रकारच्या कौतुक सोहळ्याला सर्वाधिक उधाण येतं? बघा हं, मी नुसतं कौतुक म्हणत नाहीये तर वारेमाप कौतुकाविषयी बोलतेय हे ध्यानात घ्या. स्त्रियांच्या शिक्षण, नोकरी, करिअरसारख्या छोट्या मोठ्या अ‍ॅचिव्हमेंटसाठी वाहवा होत नाही असं नाही. पण ती अ‍ॅचिव्हमेंटच छोटी मोठी असल्याने कदाचित त्याचं कौतुकही काही भरघोस करावं असं कुणाला वाटत नसणार. अगदी बायकांचं बायकांनाही.

- Advertisement -

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी हे काय म्हणतेय की शिक्षण, नोकरी, करिअर या छोट्या मोठ्या अ‍ॅचिव्हमेंट आहेत? माझं हे विधान वाचणार्‍या तुम्ही जर बायका असाल तर या विधानावर तुम्हाला रागच आला असेल. (यायलाही हवा!) किती तरी मुलींना जन्म घेण्यासाठीच संघर्ष करावा लागतो तिथं शिक्षण मिळणं, नोकरी करता येणंं, नुसती नोकरी नव्हे तर हवं ते आवडीचं प्रोफेशन करायला मिळणं यासाठी किती झंझटमारी करावी लागते हे हिला ठाऊकच नाहीये… सगळं आयतं मिळालेलं दिसतंय हिला, स्वत:च्या कंफर्ट झोनमधून बाहेर निघ बाई..असा सल्लाही द्यावा वाटला ना! आणि पुरुष असाल तर…तर कदाचित तुम्हाला वाटत असणार, हं म्हणजे, स्त्रीयांचं शिक्षण, नोकरी, करिअर आणि मग त्यांचा खडतर प्रवास बिवास जरा ओव्हररेटेडच आहे. पुरुषांना काय त्यांच्या पदरात-( खिशात म्हटलं तरी चालेल) मिळतं.

तुम्ही स्त्री असाल वा पुरुष, पण मी अद्यापही माझ्या मुद्यावर ठाम आहे. आणि पुढं जे काही सांगत आहे त्यावरुन तुम्हालाही मुद्दा पटेल याची खात्री वाटतेय.

- Advertisement -

तर, सकाळी लवकर उठून घरकाम करुन नोकरीला जाणारी आणि पुन्हा दिवसभर शारीरिक, बौद्धिक कष्ट उपसून घरी पुन्हा कामात स्वत:ला जुंपणार्‍या महिलेविषयी काय वाटतं? अपार कौतुक. ते कौतुक अर्थातच तिनं घरकामात तरबेज असण्यासाठी असतं. ती नोकरीवर जाते, तिथं तिच्या मेंदूचा, बुद्धिमत्तेचा भरपूर वापर करुन कंपनीच्या नफ्यात वाढ करते याचं अप्रुप वाटण्याचं कारण नसतंच मुळी. पण तिनं घरकाम केलं याचं कौतुक वाटलं नाही असं होत का कधी? समजा मी उलटं म्हटलं, नोकरीवरुन एखादी महिला आली आणि तिने घरातल्या कामांकडे दुर्लक्ष केलं तरी तुम्हाला तिचं कौतुक असतं का? नसतंच ना.. कारण तिने कामावर काय झेंडे लावलेत त्याबाबत आपल्याला छटाकभर रस नसतो. पण तिने घरात स्वच्छता मोहीम काढली, कपड्यांचं कपाट आवरून ठेवलं, एखादा फक्कड जेवणाचा बेत केला तर आणि तरच तिच्या अमर्याद कष्टांना दाद द्यावीशी वाटते की नाही, तुम्हीच सांगा, यात मी काहीतरी खोटं बोलतेय का?

कितीदा तरी आपण मुली असतील त्या घरात ऐकतो, अगदी दोन वेण्या घालणार्‍या शाळकरी पोरी असतील तेव्हापासून. म्हणजे तेव्हासुद्धा काहीजणींचा अभ्यासात उजेड असेल आणि काही जणी दिवे लावत असल्या तरी त्यांची आई काय म्हणत असते, अभ्यासात तर हुशार आहेच पण वांग्याची, बटाट्याची, मटकीची (अनेकदा तिला आठवेल त्या भाजीचं नाव घेऊन ) भाजी उत्तम करते असं ती चारचौघांत किती आनंदाने सांगत असते की नाही! लेकीच्या हातची बिर्याणी खायला या एकदा असं अनाहूत निमंत्रण पण देऊन टाकते. तिच्याकडून पुस्तकातील कविता ऐकायला या, गणित सोडवायला या असं कधीतरी म्हणते का आपली आई. बाबांना पण तिच्या हातच्या चहाचं भारी कौतुक असतं. प्रगतीपुस्तकात सही करताना तेही तर म्हणतातच की घरातल्या चार गोष्टी पण शिकवत जा लेकीला. तर हे असं, शिक्षण ही किती छोटी अचिव्हमेंट आहे बिर्याणीसमोर हे लक्षात येतंय ना.

आई तर आई सासू लोकांचंही हेच असतं. आपल्या मुलाला शिकलेलीच बायको पाहिजे, अमकी शिकलेली, तमकी नोकरी करणारीच पाहिजे असं टुमणं लावून लावून आणलेल्या सूनेकडून बिचार्‍या सासूचं म्हणणं तरी काय असतं, बाई गं सकाळचा स्वयंपाक करुन जात जा. घरात आल्या गेल्यांचं पाहत जा. याच आल्यागेल्यांना सासू काय सांगत असते सूनेचं तर ती घर कसं उत्तम चालवते आणि जरा कुचाळक्या करणारी सासू असेल तर ती नाव ही ठेवते ते कशावरुन तर घर अजिबात चालवता येत नाही याच्यावरुनच ना !

माझ्या एका मैत्रीणीची लग्नानंतर गाव बदलल्याने नोकरी गेली. नव्या जागी लवकर नोकरी लागली नाही. पुढं मुल झालं असं करत चार वर्षे गेली. तिला पुन्हा स्वत:साठी वेळ काढायचा आहे. नोकरी करायची आहे. आता नोकरी करायची म्हणजे आपल्या आवडत्या प्रोफेशनमध्येच करावी असं थोडी असतं, सहा-आठ तास मुलाला घरात सोडूनच जायचं आहे ना कुठंतरी. तर काहीही केलं तर बिघडणार काय आहे? तिचं आर्थिक उत्पन्न कमी असेल तरच तेवढं काय ते बिघडेल.. नवर्‍याचा हा प्रॅक्टिकल विचार चूक तरी कसा. ‘नोकरी करायची तर कर ना, पण पैसे भरपूर येणार असतील तरच’ हा जणू मंत्र असल्यासारखा तिला ऐकावं लागतंय. वरुन घरकामाचा जोडधंदा काय सुटणार नाही तो नाहीच.

भरपूर कमाई महत्त्वाची तिच्या समाधानाचं, मानसिक आनंदांचं काय लोणचं घालायचं असतं. ती शिकली काय आणि करतेय काय? म्हणत तुम्हीसुद्धा किती जणींवर हसला असाल. झालंच तर कौतुक तिच्या ‘भरपूर’ पैशांचं होईल त्यासाठी उपसणार्‍या कष्टांचं होऊच शकत नाही. फक्त पैसाच आणत नसलेल्या गृहिणीचं असं कौतुक कधी ऐकलंय? अगदी बाई शेतावर राबत असेल तरीही तिच्या घामाच्या धारात शिवार फुललं असलं तरी तिची दखल घ्यावं असं असतं का त्यात काही. तिने निजायला अंथरुण टाकलंय का नाही आणि पहाटं ती सगळ्यांच्या आधी उठून आंघोळ करुन कामाला लागली का नाही यात तिचं कर्तृत्व असतं. तिच्या उशिरा निजण्याचं नाहीतर पहाटं उठण्याचं कुणाला सोयरं सुतक असतं, कुणालाच नाही.

आता माझ्या अगदी मैत्रीणीच्या बहिणीचंच सांगते. ती आयटीतली तरुणी. लग्नानंतर अमेरिकेला जायचं ठरलं. कंपनीत तिने कळवलं. तिने कळवलं तेव्हा कंपनीतून नोकर्‍यांची कपात सुरूच होती. पण कंपनीला तिचं काम फारच आवडेल ते म्हणाले, अमेरिकेत गेलीस तरी आमच्या कंपनीतच नोकरी कर. खटाटोप करुन कंपनीनेच प्रक्रिया पूर्ण केली. पण सहाच महिन्यात पुन्हा कॅनडाला जायचं निघालं. तेव्हाही कंपनीने सांगितलं, वर्क फ्रॉम होम कर, पण कंपनी सोडू नको. अशीही तिच्या कामात तरबेज असलेली तरुणी. तिच्या कंपनीतल्या अचिव्हमेंटपेक्षाही ती ज्या दिवशी काहीतरी स्वयंपाक करते याचं तिच्या आईला कौतुक वाटतं. तिचं एकच म्हणणं नसतं, पोरगी जगभर फिरतेय, कंपनी तिला सोडत नाहीये, भरपूर पगार देतेय, तिथली आव्हानं पार करतेय ते सारं ‘ठीकच’ पण काय खिचडी-बिचडी करुन खाल्ली त्या दिवशी अगदी त्या व्हिडीओकॉलमधूनसुद्धा प्रेम ओतू जात असतं. आणि हे असं कसं काय घडू शकतं हेच तिला कळत नाही. पण खरंतर, तिचं जगभर फिरणं हीच किती क्षुल्लक गोष्ट आहे हे या बहिणीला कळत नाहीये त्याचं काय! असो.

अशीच आणखी एक संशोधक-लेखक मैत्रीण. संशोधनाच्या कामी तिला सतत फिरतीवर रहावं लागतं. काय काय उकरुन, उकलून काढून लिहीत असते, पण या सगळ्या गदारोळात ती दुसरा चान्स घेत नाहीये याचा घरातून सतत उच्चार आणि उद्धार होणं हे स्वाभाविकच आहे. ती काय लिहिते आणि त्यासाठी जी काय मरमर करते त्याचं कौतुक नाही असं नाही, पण म्हणून दुसरा चान्सच घ्यायचा नाही याला काय अर्थय. कुटुंबातली अपेक्षा असणारच. तिच्या दुसर्‍या चान्ससाठी घरात सुरू असलेल्या आंदोलनापुढं तिच्या लेखनीचं वजन ते काय! आणि लिहून लिहून असं काय अभिजात आणि चिरकाल टिकणारं लिहिणार आहे. पण घरातल्या एका लेकराला दुसरं भांवडं देणं तिचं इतिकर्तव्यच. तिच्या कर्तव्यापलिकडं तर कुणी तिला काही मागत नाहीच ना..

थोडक्यात, मी जे म्हणत होते ते लक्षात आलंय ना, या उदाहरणांवरुन तरी. तिची सचोटी, कष्ट, प्रयत्न, समाधान यांचं मूल्य तिच्या गृहकृत्यदक्षापलिकडं कशी असतील. म्हणजे तिचं शिक्षण, नोकरी, करिअर बिरियर सब छोटामोटा है. वर्षाअखेरच्या कामगिरीच्या ताळेबंदातून तिचं पदवगैरे काही वाढत-घटत असेल, पण तिचं अंतिम कौतुक तर घरातल्या कामगिरीवरच होऊ शकतं. इथला परफॉर्मन्स बेस्ट तरच ती स्त्री म्हणून लायक…नाहीतर आहेतच की राखून ठेवलेल्या शिव्या तिच्यातूनच जन्माला घातलेल्या..!

-हिनाकौसर खान-पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -