घरफिचर्सशिवसेनेचा डोळा मुख्यमंत्रीपदावर!

शिवसेनेचा डोळा मुख्यमंत्रीपदावर!

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि ठाकरे ही घराणी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. गेल्या आठवड्यात शरद आणि अजित पवार यांच्या बातम्यांनी एकच राळ उठवून दिली आणि घटस्थापनेच्या दुसर्‍या दिवशी आदित्य ठाकरे यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करत मातोश्री ते मंत्रालय हे अंतर कमी करून थेट सहाव्या मजल्यावर आपण उतरणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले. शिवसेनेचे ‘स्वयंभू’ चाणक्य संजय राऊत यांनी मग ते प्रत्यक्ष सांगत वरळीच्या मेळाव्यात शिवसेनेचा डोळा मुख्यमंत्री पदावर असल्याचे जाहीर केले. यावेळी मागच्या रांगेत आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे या जातीने उपस्थित होत्या, हे विशेष! राजकारणात कुठलीच गोष्ट ही सहज होत नाही. सर्व काही ठरलेले असते. फक्त हे काही आमच्यासाठी नाही, जनतेसाठी आहे, असा जो प्रभावी अभिनय करेल, तो जातिवंत राजकारणी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासूनच मातोश्रीला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले होते. मात्र, शिवसेनेची ताकद, उद्धव ठाकरे यांना स्वतःसाठी सहाव्या मजल्याविषयी फारसे नसलेले आकर्षण, बाळासाहेब यांच्याप्रमाणे रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवण्याची असलेली इच्छा आणि त्यांची प्रकृती या कारणांमुळे मातोश्रीची इच्छा असूनही ठाकरे परिवाराची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली नाही. दुसरीकडे बाळासाहेबांनी शिवसेनेची सूत्रे उद्धव यांच्याकडे दिल्याने स्वतःची वेगळी चूल मांडत मनसेची स्थापना करणार्‍या राज ठाकरे यांनाही कधी निवडणुकीच्या रिंगणात उतरावेसे वाटले नाही. ते तर उद्धव यांच्या एक पाऊल पुढे असून कोणाच्या इच्छेची वगैरे ते तमा बाळगणारे नाहीत. प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्यातील वाचन, मनन, भाषण, कला अशा सर्व विद्या त्यांना आत्मसात आहेत. ते मुख्यमंत्री झाले असते तर या राज्याला त्यांचे नाव कोणी न सुचवताही मनापासून आवडले असते. त्यांची दूरदृष्टी, विचार खूप पटण्यासारखे असून आज राज्यातील नव्हे तर देशातील युवा वर्गाला त्यांचे आकर्षण वाटते ते या सर्व त्यांच्या ठायी असलेल्या जन्मजात गुणांमुळे. पण, गुणी आणि निष्ठावंत माणसे जमा करणे, त्यांना जपणे, आपल्या कार्यकर्त्यांना गरज असेल तेव्हा आधार देणे ही बाळासाहेबांकडे असलेली कला त्यांनी जोपासली नाही. परिणामी २००९ मध्ये पहिल्या प्रयत्नात १३ आमदार निवडून आणून कोणालाही न जमलेली कामगिरी राज यांना पुन्हा करता आली नाही. आता तर आमदार सोडाच नगरसेवकही राज यांच्याकडे औषधाला उरलेले नाहीत. त्यामुळे कृष्णकुंजवरून नजीकच्या काळात कोणी मुख्यमंत्री होणार नाही, हे वेगळे सांगायला नको. ठाकरे यांची तिसरी पिढी मुख्यमंत्री होणार नाही, हे लक्षात येताच मातोश्रीवरून धनुर्धारी अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, तसेच वांद्रे येथून मंत्रालयाचा सहावा मजला खुणावत होता. त्यासाठी राज आणि नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यापुढे पक्षात कोणालाच मोठे न करण्याचा निर्णय झाला. यासाठी घाईघाईने आदित्य यांच्यासाठी युवासेनाप्रमुख असे नवे पद तयार करून पुढचा पक्षप्रमुख कोण असेल? हा वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली गेली आणि २०१४ पासून भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर उद्धव यांच्याप्रमाणे आदित्य कायम प्रकाशझोतात राहतील, याची काळजी घेण्यात आली. शिवसेनेचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत आदित्य यांचे मत विचारात घेण्यात आले. शिवसेनेचे प्रचार दौरे, भाषणे, उद्घाटने आणि निवडणूक व्यूहरचना यात त्यांना प्रमुख स्थान देण्यात आले. २०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर तर उद्धव यांच्यापेक्षा आदित्य कसे केंद्रस्थानी राहतील, याची काळजी घेण्यात आली. आदित्य यांचा मुख्य चेहरा ठेवून शिवसेनेची काढण्यात आलेली संवाद यात्रा तर आपला पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याची झलक दाखवणारी होती आणि शेवटी ‘निवडणुकीच्या मैदानात उतरलेला पहिला ठाकरे’, असा राजकारणाच्या इतिहासात आपल्या नावाची मुद्रा उमटवून आदित्य हे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत उतरले आहेत. आता त्यांचे स्वप्न कधी साकार होणार, हे काळ ठरवेल. पण, काळ पुढे सरकत असताना आपले वय आपल्या हातात असले पाहिजे आणि चाळीशीच्या आसपास देवेंद्र फडणवीस जसे मुख्यमंत्री झाले तसेच छोट्या वयात ही खुर्ची आपली झाली पाहिजे, हे लक्ष्य ठेवून आदित्य सज्ज झाले आहेत. मात्र, मातोश्रीवरून पक्ष चालवणे आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून राज्याचा गाडा हाकणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिवसेनेची स्थापना ही २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या हेतूने स्थापन करत प्रबोधनकार ठाकरे यांनी भगवा बाळासाहेबांच्या हाती दिला. या समाजकारणाच्या बाळकडूतून शिवसेना घडली, पसरली आणि आजही टिकून आहे ती ८० टक्के समाजकारणाच्या पायावर. कारण सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शाखाशाखांतून लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, मराठी माणूस, भूमिपुत्रांना न्याय आणि आपल्या राज्यापोटी असीम प्रेम यामुळे एका विचारधारेचा पक्ष म्हणून शिवसेना आकाराला आली, फुलली आणि फळली. या सार्‍याचा एक घट्ट पाया तयार झाला. गेल्या सहा दशकात अनेक उन्हाळे पावसाळे पक्षाने बघितले, सोसले पण, पाया डळमळीत झाला नाही. सामान्य शिवसैनिक हलला नाही. नेते, पदाधिकारी बाळासाहेब यांच्या शब्दात सांगायचे झाले तर गद्दार निघाले, लखोबा लोखंडे झाले. मात्र, माझा सैनिक शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखा निष्ठावंत असल्याने पक्ष हलणार नाही, हे त्यांचे शब्द आज आणि उद्याही खरे असतील. हे शिवसेनेचे संचित आहे. स्वतः शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या बैठकांमध्ये सेनेच्या या कडवट सैनिकांच्या मोठेपणाचे धडे दिले आहेत. पण, पाया भक्कम असला तरी शिवसेनेची मजल आजही इतक्या वर्षांनंतर मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक आणि औरंगाबाद याच्या पलीकडे जाताना दिसत नाही. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा सारा महाराष्ट्र कवेत घेण्याची ताकद निर्माण झालेली नाही आणि ठरवून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. सत्ता नसताना पक्ष बांधणीसाठी जिवाच्या आकांताने जसे प्रयत्न होताना दिसतात, तसे ते ११९५ साली आणि २०१४ साली झालेले दिसले नाहीत. उलट नेहमीप्रमाणे सामान्य शिवसैनिकांनी सत्ता येऊनही काडीची अपेक्षा न करता भगवा खाली ठेवला नाही. आदित्य यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने जरुर बाळगावीत आणि संजय राऊत यांनी त्यांना जरुर हवा द्यावी, पण २०१४ प्रमाणे ६३ आणि आता त्यात किती वाढ होणार माहीत नाही (२० वाढतील अशी आशा धरून ८० च्या घरात शिवसेनेचे आमदार होतील, असा अंदाज ठेवूया) याच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळत नाही, हे ध्यानात ठेवायला हवे. १२३ आमदार निवडून आल्यानंतर भाजप सत्तेत मोठा भाऊ होऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. १९९५ साली मातोश्रीच्या छायेखाली मोठा होऊन सत्तेत आलेल्या भाजपने नंतर ठरवून पक्ष मोठा केला. उलट शिवसेनेचा जीव कायम मुंबई, ठाणे, कल्याण महापालिकांच्या सत्तेत अडकल्यासारखा दिसला. भाजप शिवसेनेच्या या सार्‍या जमेच्या बाजू आणि कमकुवत स्थाने ओळखून आहे. त्यांनी सत्तेत येण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या कशा वापरल्या आणि नंतर त्यांना कसे फेकून दिले, हा इतिहास ताजा आहे. आता देशात या घडीला एक नितीश कुमार सोडले तर एका मित्र पक्षांची नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत नाही. मोदी लाटेतही बिहारवरील पकड नितीश यांनी ढिली होऊ दिलेली नाही, पण उद्धव ठाकरे यांचे तसे नाही. त्यांचे राजकारण हे भाजपच्या मागे फरफटत जाणारे आहे. ही सत्तेची अगतिकता आहे की आपल्यावरच्या विश्वासाचा अभाव हे अजून उद्धव यांच्या भाषणासारखे असंबंध आहे आणि याचे उत्तर काळच देईल. पण, भाजप मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काही इतक्या लवकर शिवसेनेला हवी म्हणून मिळवून देईल, असे आणखी बरीच वर्षे होणार नाही. निवडणुकीच्या मैदानावर उतरलेला पहिला ठाकरे असा मान मिळवणे, इतपत सारे ठीक आहे, पण आदित्य यांना विधानसभेसाठी उभे करून शिवसेना मुख्यमंत्रीपदाची दिवसा स्वप्ने बघत असेल तर ते दिवास्वप्न असेल. स्वप्न बघायला काहीच हरकत नाही, पण मुंबईच्या पुढे चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र उभा आडवा पसरला आहे. यासाठी निवडणूक आली की एक संवाद यात्रा काढून चालणार नाही. त्यासाठी रात्रंदिवस शिवसेनेच्या प्रचार प्रसारासाठी काम केले पाहिजे. राजकारण हे पार्ट टाईम कधीच नसते, हे आदित्य यांच्या आजोबांचे मित्र शरद पवार यांच्या वागण्या बोलण्यात आजही ते दिसते. तेच एक जाणत्या नेत्याचे असले पाहिजे. तरच मुख्यमंत्रीपद आजचे उद्या मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -