घरफिचर्सतरुणांनी चळवळीत यावे

तरुणांनी चळवळीत यावे

Subscribe

नोकरीसाठी आमच्याकडे अर्ज करा, पैसे भरा किंवा एका वर्षात तुमचे पैसे दामदुप्पट करून देतो, अशा पेपरमधल्या गोष्टी किंवा राशिभविष्य यावर विश्वास ठेवायचा नसतो एवढं तरी चळवळ नक्कीच शिकवते. आपलं जगणं आपणच नैतिक मार्गाने संपन्न करायचे असते हा विश्वास चळवळ देते. त्यासाठी आवश्यक असणारा संयम शिकवते. हिंसाचाराने कुठलाच प्रश्न मिटत नाहीत, याची जाण देते. म्हणून ऐन तारुण्यात तरुणांनी चळवळीत भाग घ्यायचा असतो.

मनाने श्रीमंत मित्रमैत्रिणी असणे ही खरी श्रीमंती आहे असे सध्या मी अनुभवते आहे. आमचे एक डॉक्टर मित्रमैत्रीण यांनी नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले त्यांचे ऑफिस आम्हाला संस्थेच्या कामासाठी वापरायला दिले. आम्ही महाविद्यालयीन मुलांसोबत काम करतो आहोत. त्या सर्वांना गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकणारं कोणी तरी आहे याचाच आनंद आहे आणि तरुण मुलं मनमोकळं येऊन बोलतात याचा आम्हाला आनंद आहे. डॉ. अर्चना आणि डॉ. शिवानंद यांच्यासारखे आधारस्तंभ आहेत म्हणून तरुणांना अशा जागा मिळतात.

एक दिवस ऑफिसमध्ये बसले होते, एक तरुण मुलगा आला आणि विचारलं की, का हो हे महादेव संस्थेचे ऑफिस आहे का? ‘नाही हो’ माझे उत्तर. असे उत्तर मी आठ दहा तरुण मुलामुलींना दिले. सारख्याच चौकशी करणारे लोक वाढले म्हणून मला राहवलच नाही. शेवटी मी दारात येऊन उभे राहिले आणि पुढच्या चौकशी करणार्‍या मुलाला विचारलं की ही ‘महादेव संस्था आहे तरी काय?’ त्याच्याकडून जी माहिती समजली ती अशी की, या संस्थेने पेपरमध्ये नोकरीसाठी जाहिरात दिली होती म्हणून ही सर्व तरुण मुलमुली नोकरीच्या चौकशीसाठी आले होते. आजूबाजूला जरा चौकशी केल्यावर त्या संस्थेचे ऑफिस आमच्या जवळच आहे, असे आमच्या लक्षात आले. त्याबद्दल चर्चाच करत होतो तर एक जण या ऑफिसमधल्या लोकांना शिव्या देत तिथे आला.

- Advertisement -

जो खूप चिडला होता, त्याला कसं तरी शांत केलं आणि काय झालं याची चौकशी केली तेव्हा समजले की, या महादेवाच्या नावावर जगणार्‍या पुरुषाने या गरीब माणसाच्या भावाकडून नोकरीला लावण्याचे पंधरा हजार रुपये घेतले आहेत, याला एक महिना होऊन गेला, पण ना नोकरी मिळाली ना पैसे परत. त्या काळात या संस्थेने आपले ऑफिस बदलले त्याचा पत्ता द्यायला तयार नव्हता, किती तरी दिवस फोनच उचलत नव्हता, उचललाच तर त्याची बायको बोलायची आणि आम्ही का पळून जाणार आहोत का? असं म्हणून फोन ठेवून द्यायची.

बाईशी काय बोलायचे? तिला शिव्या कशा देणार? त्याने फोन उचलू दे मग सांगतो त्याला कोण आहे ते असं म्हणत रोज तो महादेव भक्त वाचत राहिला. काही दिवसांनी त्याचा ऑफिसचा पत्ता मिळाला. हा गरीब माणूस भावाला घेवून ऑफिसला आला. ऑफिसमध्ये चर्चा गरमा गरम झाली तेव्हा उद्या नोकरीचे पत्र घ्यायलाच या असे वचन घेऊन हे दोन्ही भाऊ परत गेले. दुसर्‍या दिवशी खरंच आयसीआयसीआयचे पत्र मिळाले. मोठ्या आनंदाने ते पत्र घेवून बँकेत गेल्यावर समजले की ते पत्र बँकेने दिलेलेच नाही. मग दोन्ही भाऊ ‘महादेवा’कड़े परत. पुन्हा शिविगाळ, बाचाबाची. शेवटी त्या भावांनी त्या ऑफिसमधला लॅपटॉप घेऊन गेले. आमचे पैसे दे आणि तुझी वस्तू घेऊन जा या तोंडी करारावर. एक एपिसोड खतम…..

- Advertisement -

पहिल्या घटनेच्या काहीच दिवसात आमच्या टीमला ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ या सामाजिक विषयांवर नाटकांच्या माध्यमातून परिवर्तनाचे काम करणार्‍या अतिशय ताकदवार गटाची ‘गर्भ’, ‘राजनीति’ आणि ‘न्याय के भवर में भवरी’ अशी नाटके पाहण्याची संधी मिळाली. कुठलाही डामडौल रंगमंचावर नाही. मध्यवर्ती लावलेले माईक, शेवटच्या व्यक्तीला चेहरा दिसावा एवढाच मेकअप आणि जीव तोडून, प्रत्येक हालचालीतून जबरदस्त व्यक्त होणारे कलाकार यासर्व आंतरिक ताकदीमुळे प्रत्येक शब्द कानात साठवून घेणारा प्रेक्षक वर्ग…

दोन्हीकडे तरुण मुलं आहेत, शिकलेली आहेत, शहरात राहणारी आहेत, हातात गाडी, मोबाईल ही प्रगत युगाची साधन आहेत. पण एका ठिकाणी शिक्षण आणि साधन असूनही डोक्याचा वापर अतिशय मर्यादित स्वरुपात करणारी, मी सोडून जग असत आणि त्याचा विचार करायचा असतो या विचारपासून कोसो दूर असलेली, आत्मविश्वास गमावलेली, बळकट शरीर असूनही धास्तावलेली, निस्तेज चेहर्‍याचे तरुण लोक आणि दुसर्‍या बाजूला मात्र स्वतःच्या पलीकडे जग आहे त्याला सुंदर करुयात म्हणजे आपलेही जगणे सुंदर, आनंदी होईल यासाठी स्वतःच्या बुद्धीचा, वेळ, श्रम याचा पुरेपुर उपयोग करणारी तरुण मंडळी. दोघेही एकाच देशात राहतात तरी एवढा फरक का? तर पहिले शिकले पण त्यांच्या आयुष्यात कोणी मंजुल भारद्वाज आले नाहीत. मंजुल हे एका व्यक्तीचे नाही चळवळीचे नाव आहे.

अशी चळवळ जी आपल्या आयुष्याचा अर्थ समजावून सांगते, पृथ्वीच्या पाठीवर असलेलं सर्व काही फक्त आणि फक्त मलाच मिळाले पाहिजे हा अन्यायकारक न्याय सांभाळून जगू नये, कुठलीही गोष्ट उपभोगताना मी ती कोणाच्या वाटेची तर घेत नाही ना याची काळजी करायला शिकवणारी चळवळ. मला जाती-धर्म, प्रदेश, लिंग किंवा आईबाप यांच्या पैशांमुळे ज्या ज्या गोष्टी जन्मतःच मिळाल्या त्या गोष्टी आपल्या हक्काच्या नाहीत आणि त्याचा मला गर्व असण्याचे काही कारण नाही हा जगण्याचा विचार चळवळ शिकवते.

हे वातावरण ज्या ज्या तरुणांना मिळतं ते ते तरुण भरकटण्याची शक्यता कमी, असे तरुण पेपर हा बातम्या वाचण्यासाठी असतो हे लक्षात ठेवतात. हा देश आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून तो आमचा आहे आणि आम्ही त्यात कसेही वागू असं म्हणत नाहीत. नोकरीसाठी आमच्याकडे अर्ज करा, पैसे भरा किंवा एका वर्षात तुमचे पैसे दामदुप्पट करून देतो, अशा पेपरमधल्या गोष्टी किंवा राशिभविष्य यावर विश्वास ठेवायचा नसतो एवढं तरी चळवळ नक्कीच शिकवते. आपलं जगणं आपणच नैतिक मार्गाने संपन्न करायचे असते हा विश्वास चळवळ देते. त्यासाठी आवश्यक असणारा संयम शिकवते. हिंसाचाराने कुठलाच प्रश्न मिटत नाही याची जाण देते. म्हणून ऐन तारुण्यात तरुणांनी चळवळीत भाग घ्यायचा असतो. आपलं जगणं म्हणजे रोजच्या रोजी रोटीपासून आपल्या आयुष्याच्या साथीदारापर्यंत सगळं काही आपले आपण जबाबदारीने करायच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला चळवळ शिकवते. म्हणूनच चळवळ म्हणजे मॅरेज ब्युरो असं टोमणे मिळूनही चळवळ टिकली. त्यासाठी तुम्हाला योग्य अशा चळवळी मिळो यासाठी शुभेच्छा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -