घरफिचर्सहा प्रश्न सर्वांचा आहे...

हा प्रश्न सर्वांचा आहे…

Subscribe

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ज्या ज्या आयुष्य जगण्याच्या पायर्‍या असतील त्या सर्वच पायर्‍यांवर प्रत्येक स्त्री पुरुषाला एकमेकांची गरज असते, लागते किंवा त्याशिवाय पुढे जाण्याची किंवा त्या पायरीला जगण्याची शक्यताच संपून जाईल असं असतानाही दर वेळेस स्त्रियांवर अत्याचाराचा, हिंसाचाराचा प्रश्न आला की उत्तर, प्रतिक्रिया तयार असते ती म्हणजे, ‘हा बायांचा प्रश्न आहे’.

आज एका खर्‍या अर्थाने सौंदर्याची व्याख्या सांगणार्‍या तरुण मुलीला भेटण्याचा प्रसंग आला. नाशिकमधील अभिव्यक्ती संस्थेच्या ‘शोधिनी’ प्रकल्पाच्या कार्यक्रमासाठी खास दिल्ली येथून आलेल्या ‘रितू’ हिला भेटण्याचा प्रसंग आला. आठ वर्षापूर्वी तिच्यावर दिल्लीत अ‍ॅसिड हल्ला झाला होता ज्यात तिचा चेहरा बर्‍यापैकी विस्कटला गेला, पण बाई मोठी खंबीर निघाली. बोलताना म्हणाली या अपघातामुळे मला दोन चेहेरे मिळाले आणि त्या दिवसापासून आजूबाजूला असलेले अनेक चेहेरे अनुभवायला मिळाले. स्वतःवर झालेल्या या हल्ल्याच्या निमित्ताने हा प्रश्न काय आहे तो तिने स्पष्टपणे मांडला. ऐसी हॉलमध्ये बसलेल्या माझ्यासारख्या अनेकांना त्यामुळे चांगलाच मानसिक त्रास झाला, त्यांची कथा ऐकताना डोक्याला मुंग्या आल्या आणि रितूचा उद्देश सफल झाला. ‘हा तिचा एकटीचा प्रश्न नाही’ असं ती ठोकून सांगत होती. त्या निमित्ताने तिने तिच्यासारख्या अनेकींचे दुःख मांडले. आपल्या विरोधी मत असलेल्यांना जगूच द्यायचे नाही ही एक हिंसात्मक, संकुचित आणि धर्मांध मानसिकता आहे. त्याचे हे सर्व बळी आहेत असे ती मांडत होती. त्यांनी जे भोगलं ते आम्हाला ऐकवत नव्हतं. आपल्यासारख्या रोजच्या जगण्याच्या चक्रात अडकलेल्यांना जाग करण्यासाठी प्रत्येकानेच त्यांचा ‘शिरोज हँग आऊट कॅफे’ ची कथा ऐकलीच पाहिजे, समजावून घेतलीच पाहिजे आणि अशा कथा परत घडू नये यासाठी सतत जागरूक राहीलच पाहिजे. मी तरी आज त्यांच्याकडून हे शिकले आणि तुमच्यापर्यंत तीच शिकवण, तोच त्रास आणि चिमटा पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे.

मला कळते तेव्हापासून स्त्रियांवर होणार्‍या विविध प्रकारच्या अत्याचाराच्या विरोधी मी काम करीत आले आहे. वस्तीत जन्मले होते, दलित होते आणि बाई आहे यामुळे दुःख शोधायला जायची गरजच कधी पडली नाही. माझ्या स्वतःच्या आयुष्यात या सर्व गोष्टींमुळे फार काही बिघडलं असा अनुभव नाही. सर्वच दलितांना स्वतःला आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेला सतत सिद्ध करावं लागत तसं आणि तेवढच मलाही सिद्ध करावं लागलं. पण पहिल्या दिवसापासून मला लोकांच्या एका प्रश्नाची, प्रतिक्रियेची चीड होती, आहे आणि पुढेही राहील तो प्रश्न किंवा ती प्रतिक्रिया म्हणजे ‘हा त्यांचा – म्हणजे बायांचा/ दलितांचा/ आदिवासींचा/ मुस्लिमांचा प्रश्न आहे’ कसा? आज जरा यावर मोकळेपणाने बोलूयात.

- Advertisement -

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ज्या ज्या आयुष्य जगण्याच्या पायर्‍या असतील त्या सर्वच पायर्‍यांवर प्रत्येक स्त्री पुरुषाला एकमेकांची गरज असते, लागते किंवा त्याशिवाय पुढे जाण्याची किंवा त्या पायरीला जगण्याची शक्यताच संपून जाईल असं असतानाही दर वेळेस स्त्रियांवर अत्याचाराचा, हिंसाचाराचा प्रश्न आला की उत्तर, प्रतिक्रिया तयार असते ती म्हणजे, ‘हा बायांचा प्रश्न आहे’.

आम्ही सध्या ‘संगिनी महिला जागृती मंडळ’ या नावाने ‘स्त्रियांवरील अत्याचार’ हाच विषय घेऊन मुले, तरुण आणि पुरुष यांच्यासोबत काम करीत आहोत. आमच्या संस्थेच्या फंड रेजिंगसाठी आम्ही ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक घेतले. ज्या ज्या व्यक्तींकडे आम्ही या विषयावर बोलत होतो तिथे तिथे एकच प्रश्न, ‘हा शो फक्त स्त्रियांसाठीच आहे का? किंवा या शो साठी पुरुषही आले तर चालतील ना?’ खरतर अगदी गार्गी, मैत्रेयीपासून ते माझ्यापर्यंतच्या कुठल्याही स्त्रीवादी स्त्री पुरुषांची भाषणे, लिखाण आपण वाचले, ऐकले तर आपल्या लक्षात येईल की, कोणीच, कुठेच आणि कधीच हा फक्त स्त्रियांचा प्रश्न आहे असा ओझरतासुद्धा उल्लेख केलेला नाही, मग हे वाक्य का तयार झालं असावं? माझा अनुभव असा म्हणतो की, असं म्हटलं की, आपली जबाबदारी संपते असे लोकांना वाटते आणि त्यामुळे ते पटकन हे वाक्य म्हणून मोकळे होतात किंवा तसा प्रयत्न तरी करतात.

- Advertisement -

1992 साली एका शासकीय कर्मचारी महिलेने तिचे बाल विवाह थांबवण्याचे शासकीय कर्तव्य पूर्ण केले, पण ती दलित होती त्यात ती बाई होती याचा राग येऊन उच्च वर्णीय (सो कोल्ड) पुरुषांनी तिच्याशी गैरवर्तणूक केली, तिचा बाई म्हणून अपमान केला, पण याचा स्त्रियांच्या संघटना किंवा काही दलित संघटना वगळता कोणालाच राग आला नाही कारण तीच प्रतिक्रिया, ‘हा बायांचा प्रश्न आहे’. अजूनही तिची केस देशाच्या सुप्रीम कोर्टात अनिर्णीत आहे. पण तिच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा विषय ऐरणीवर आला. त्यावर २००३ साली पहिल्यांदा ‘मार्गदर्शक सूचना’ आल्या आणि त्यानंतर स्त्री वादी चळवळीच्या रेट्यामुळे २०१५ साली त्याचा कायदाही आला. त्या कायद्याच्या निमित्ताने सर्वच आस्थापनांमध्ये याविषयावर लक्ष ठेवण्यासाठी आणि कामाची ठिकाण ‘लैंगिकदृष्ठ्या तटस्थ (जेंडर न्यूट्रल)’ व्हावीत यासाठी अंतर्गत समित्या करण्याचा आग्रह हा कायदा करू लागला तर लोकांची, संबंधितांची प्रतिक्रिया सेम, ‘हा बायांचा प्रश्न आहे’. कायद्याची गरज म्हणून जेव्हा या समित्या कराव्याच लागल्या तेव्हा अनेकांनी कागदावर या समित्या बनवल्या आणि शासनाला त्याची यादी पाठवली. पण या समित्यांमध्ये असणार्‍या लोकांना आपण यात का आहोत? आपली नेमकी भूमिका काय आहे? हा कायदा काय आहे? याची कसलीच जाणीव नाही असे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. यावर कार्यालयांमधून सर्व कर्मचारी किंवा किमान त्या समितीच्या सदस्यांचे तरी प्रशिक्षण व्हावे यासाठी फार आग्रह होताना दिसत नाही. काही ठिकाणी नावापुरते प्रशिक्षण आयोजित होते आणि आमच्या कंपनीचे नाव बदनाम होऊ नये यासाठी काय केले पाहिजे यासाठी आम्हाला शिकवा असा आग्रह प्रशिक्षणात धरला जातो.

ज्या देशाची अर्धी लोकसंख्या या प्रश्नात गुंतलेली आहे तो एका गटाचा प्रश्न कसा होऊ शकतो? ही एक साजीश आहे यावर कुठलाही उपाय न शोधण्याची. यामुळे ज्यांच्यावर हिंसा होते तो समूह एकटा पडतो आणि त्यावरील अन्याय वाढत जाऊन तो समूह अधिकाधिक अन्यायात जातो हा अनेक वर्षांचा इतिहास दाखवतो आहे. सध्या आपल्या देशात नित्यनेमाने घडणार्‍या घटनांचा या दृष्टीने विचार करूयात. आपल्या देशात अनेक समूह मांसाहार करतात. सूटबुटातल्या घार्मिक लोकांपासून ते अर्ध नग्न असणार्‍या, डोंगर कपारीत राहणार्‍या समूहांपर्यंत अनेक समूह मांसाहार करतात त्यात ही गायीचे मांस खाण्याची त्यांच्याकडे सहज प्रवृत्ती आहे. पण आज देशभर गायीचे मांस आहे असा संशय घेऊन ज्या ज्या लोकांची समुहाने ‘गायी’ च्या प्रेमापोटी हत्या केली आणि ज्यांच्या त्यात नाहक बळी गेला असे सर्व लोक एकाच मुस्लीम धर्माचे आहेत हा केवळ एक योगायोग नाही. ही एक मोठी साजीश आहे, त्याच लोकांची ज्यांची सहज प्रतिक्रिया असते, ‘हा त्यांचा प्रश्न आहे’. रोज मारल्या जाणार्‍या या आपल्या बांधवांचे प्रश्न कोणी विचारु नये, त्याप्रश्नाचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली ती साजीश आहे.

आपण दरवर्षी गर्भजललिंग परीक्षेत मुलीचा गर्भ आहे हे कारण सांगून शेकडो स्त्रिया पोटात मारतो, जन्माला आल्याच तर दुधात डूबवून मारतो, पुढे त्यांना कळायच्या आत घरच काम शिकवून खुंटवतो, बालपणीच लग्न लावून देतो, हुंडा आणला नाही म्हणून मारून टाकतो, देशाचे भविष्य ज्या कोखेतून जन्माला येणार आहे त्याला कुपोषित ठेवतो, बाळंतपणासाठी लागणार्‍या मूलभूत सुविधाही देत नाही, त्यात दरवर्षी शेकडो स्त्रियांना मृत्युच्या दारात ढकलतो आणि या सर्वांचा जाब कोणी विचारु नये म्हणून एक फालतू वाक्य तोंडावर फेकतो, ‘हे सर्व बायांचे प्रश्न आहे’.

बायांनी दादा, भाऊ, काका, मामा, वडील, आजोबा असं सर्व म्हणून पाहिलं, कर्त्या पुरुषांकडून मदत मागून पहिली त्यांच्यावर अवलंबून राहून पाहिलं, आता त्यांनी स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. दोन वेळची भाकरी आणि शारीरिक संबंधातील वीर्याचे ते दोन थेंब यासाठी इतके दिवस बायांच्या अनेक पिढ्या मार खात होत्या. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, हे आपले प्रश्न आहेत त्यांनी आता स्वतःची भाकर आणि आवडीचे ते दोन थेंब आनंदाने मिळवण्याचे अनेक मार्ग शोधले आणि त्याचा आनंद घ्यायला सुरुवातही केली. मग आता मुली जरा सहन करत नाही, जरा नवर्‍याने किंवा त्याच्या घरच्यांनी त्रास दिला की, लगेच घटस्फोट मागतात, मुली आता लवकर लग्न करायला तयार होत नाहीत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या शिवाय लग्न नकोच म्हणतात असे लक्षात आणून दिले जाते. परिस्थिती आता बदलली आहे. हे सर्व समाजात प्रत्यक्ष घडत आहे. पण जेव्हा हे का घडतंय याचा विचार आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे सर्व समाजातल्या त्या प्रतिक्रियेची -‘हा बायांचा प्रश्न आहे’ याची प्रतिक्रिया आहे हे समाजाने वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे.

आजची रितू ठणकावून प्रश्न विचारत होती, असं का? बाई म्हणून, दलित म्हणून, आदिवासी म्हणून किंवा अल्पसंख्याक म्हणून का तुम्ही आम्हाला असे वागवता, का? या का चे उत्तर द्यावेच लागेल. आता यावर तो त्यांचा प्रश्न आहे असे उत्तर देऊन तुम्हांला सुटता येणार नाही, जबाबदारी झटकता येणार नाही. यासर्व वातावरणावर बोट ठेवण्यासाठी रविश कुमारने सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची कविता मांडली. त्यात कवी म्हणतो, एका खोलीत आग लागली असेल तर तुम्ही शांतपणे झोपू शकाल? तुमच्या घरात एकीकडे माणसांच्या मृत्यूचे तांडव चालू असेल तरी तुम्ही शांतपणे प्रार्थना कशी काय म्हणू शकता? देश, शहर, गांव, कुटुंब हे काही कागदावरचे चित्र नाही तर ते जिंवत माणसांनी बनलेली रचना आहे. अशी अनेक माणसे मारताना तुम्ही शांत राहणार असाल तर तुम्ही आधीच मेलेले आहात असे मी म्हणेल. कवीच्या या वक्तव्याला प्रतिसाद द्यायचा असेल तर प्रत्येकच ‘ रितू’ वरचा कुठलाही हल्ला हा आपल्यावर होतो आहे याचे दुःख समजावून घेऊन त्याविरोधात उभे रहावे लागणार आहे. प्रत्येकाने रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. सोशल मीडियावर जे जे कोणी असे अंग काढून घेईन, किंवा शी वाक्य म्हणून आपल्यात फूट पडेल त्यांना जाब विचारला पाहिजे. रोज गायब होणार्‍या मुस्लीम मुलांचे पुढे झाले काय? हा जाब त्या त्या वेळच्या शासनाला, सरकारला विचारलाच पाहिजे. देशाची सुरक्षितता जितकी महत्वाची तितकीच देशातल्या प्रत्येक बाळाला आरोग्य, शिक्षण मिळालेच पाहिजे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संरक्षण की, शिक्षण हा प्रश्नच चुकीचा आहे. हे सतत आपण संवेदनशील माणूस म्हणून लक्षात ठेवले पाहिजे. आज जी परिस्थिती आहे त्याच वर्णन करणार एक आंदोलनकारी गाणं आम्ही संघटनेत म्हणायचो आणि आजही म्हणतो की,

तोड मर्दा तोड ही चाकोरी, तोड ग बहिणी तोड ही चाकोरी,
मुक्तीचं गीत म्हणा, रात आहे अंधारी,

कुणाची शेत आणि कुणाची भात, आम्ही जात्यात आन ते हसत्यात सुपात
सुपातल जात्यात जाणार हाय रं, हा इतिहास कधी खोट बोलणार नाय रं

आज जे संकटात आहेत त्यांना तुम्ही आज वाचवलं नाही तर ही दमनकारी, अन्याय करणारी, हिंसाचार करणारी यंत्रणा उद्या तुमच्याशीही अशीच वागणारी आहे हे आजच लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा माझ्या रक्षणासाठी आज जो संकटात आहे त्याच रक्षण केले पाहिजे. अशा अनेक संधी तुमच्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. तुम्ही त्यावर फक्त शिक्का मारायचा आहे, आलं ना ध्यानात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -