घरफिचर्सआई समजून घेताना...

आई समजून घेताना…

Subscribe

एकदा पी. सावळाराम गडकरी रंंगायतनला घाईघाईत आले. त्यांना ‘आई रिटायर होते’ हे नाटक बघायचं होतं. आमच्यातल्या कुणीतरी त्यांना हाक मारली. ते आमच्याजवळ आले आणि म्हणाले, मला हे नाटक बघायचं आहे, मी या नाटकाचं समीक्षण वाचलं आहे, मला या नाटकाची कथा आवडली आहे, मला आई पुन्हा समजून घ्यायची आहे!

कविवर्य पी. सावळाराम आमच्या ठाण्यात राहायचे. त्या चिंचोळ्या आणि कमी लोकवस्तीच्या तेव्हाच्या ठाण्यात कुठे ना कुठे ते हमखास दिसायचे. कधीतरी एखाद्या शाळाकॉलेजच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणूनही व्यासपीठावर दिसायचे. कृष्णधवल सिनेमाच्या त्या जमान्यात सिनेमाच्या श्रेयनामावलीतही गीतकार म्हणून त्यांचं नाव थिएटरातल्या पडद्यावर झळकायचं तेव्हा आमच्या त्या विद्यार्थीदशेतल्या मनाला ते आमच्या ठाण्याचे म्हणून कुतुहलही वाटायचं आणि अभिमानही वाटायचा. पुढे ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतन निर्माण झालं. तिथे ते नाटकं बघायला येऊ लागले. मधल्या काळात ते सेन्सॉरचे सदस्य होते. त्यामुळेही ते नाटक बघायला यायचे. मग कधीतरी त्यांच्या मित्रमंडळींशी असेच गप्पाटप्पा करायला येऊ लागले. आम्ही तरूण मुलंही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने रंगायतनला गर्दी करू लागलो. रोज एकमेकांना पहात असल्यामुळे त्यांच्याशी आम्हा मुलांची ओळख झाली. पुढे आम्ही त्यांना इतरांप्रमाणे चक्क दादा अशी हाक मारू लागलो. हळूहळू त्यांच्यात आणि आमच्यात एक जवळचं नातं निर्माण झालं.

असेच कधीतरी ते आमच्याशी राजकारणावर बोलू लागले. तोपर्यंत राजकारण मूल्याधारित म्हणावं असं होतं. टोकाचं चापलुस झालेलं नव्हतं. पण तरीही ते राजकारणातल्या चांगुलपणाबद्दल आम्हाला सांगायचे. त्यातही पी. सावळाराम यांची ओळख ठाण्यात फक्त कवी-गीतकार इतकी मर्यादित नव्हती. कोणे एके काळी त्यांनी ठाण्याचं नगराध्यक्षपदही भुषवलं होतं. राजकारणात बाहेरून येणारा पैसा त्यांना मंजूर नव्हता. ते एक वाक्य आम्हाला कायम बोलून दाखवायचे, म्हणायचे, पैसा कधीच बाहेरून येणारा नसावा, हा बाहेरून येणारा पैसा माणसाला बाहेरख्याली बनवत असतो. त्यांचे हे विचारच त्यांचं राजकारणातलं वर्तन कसं होतं असेल याचा आम्हाला अंदाज देऊन जायचे. पी. सावळारामांचं एक होतं की ते आम्हाला फार तपशीलात जाऊन सांगायचे नाहीत, पण आम्ही उत्सुकतेपाटी जरा जास्त प्रश्न-उपप्रश्न केले की मग त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्याबद्दलची वेगळी माहिती कळायची.

- Advertisement -

एकदा असंच बोलता बोलता ते म्हणाले, आचार्य अत्रेंच्या झंझावाताचा तो काळ, त्या एका काळावर त्यांचाच प्रभाव होता, त्यांची मोहिनी होती, अशा त्या काळात माझी गाणी लता-आशा गात होत्या, ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने माझ्या नावाला बरीच प्रसिध्दी मिळवून दिली होती…आणि अशाच 1966-67 च्या त्या काळात मी ठाण्याचा नगराध्यक्ष झालो, त्यावेळी सगळ्यांनी माझं कौतुक केलं, पण या कौतुकातलं कौतुक कुणी केलं असेल तर ते आचार्य अत्रेंनी, अत्रे मला म्हणाले, तू एक कवी-लेखक असूनसुध्दा रूक्ष राजकारणात पुढे गेलास आणि ठाण्याचा नगराध्यक्ष झालास ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे, सरस्वतीच्या दरबारातला एक शिलेदार राजकारणाची पायरी चढतो आणि वरचा टप्पा गाठतो ही घटना अनोखी आहे!

आमच्या पिढीने अत्रे नावाचं विराट गारूड ओझरतं पाहिलं असल्याने, पण त्यांचं विराट अष्टपैलुत्व आम्ही पुस्तकांच्या पानोपानी अनुभवलं असल्याने आम्हाला त्यांच्या त्या बोलण्यात अत्रेंचा उल्लेख आला की आमचं मन हरखून जायचं.

- Advertisement -

एकदा असेच ते रंंगायतनला घाईघाईत आले. त्यांना ‘आई रिटायर होते’ हे नाटक बघायचं होतं. आमच्यातल्या कुणीतरी त्यांना हाक मारली. ते आमच्याजवळ आले आणि म्हणाले, मला हे नाटक बघायचं आहे, मी या नाटकाचं समीक्षण वाचलं आहे, मला या नाटकाची कथा आवडली आहे, मला आई पुन्हा समजून घ्यायची आहे!

ते खरंच खूप घाईत होते. त्यांना नाटकाच्या तिकिटाची व्यवस्था करायची होती. त्यामुळे ते आमच्याकडे आले तसेच लगबगीने निघून गेले. इथे आम्हीही आमच्या गप्पाटप्पांत रंगूून गेलो. शाळा-कॉलेज नुकतंच संपल्यामुळे रंगायतन हा आमचा त्या वेळचा वेळ घालवायचा अड्डा झाला होता किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर आम्ही त्या काळात रंगायतनमध्ये ‘पडिक’ असायचो. त्यामुळे नाटक सुरू होण्याच्या आधीच्या काळापासून नाटक संपेपर्यंत आम्ही रंगायतनमध्येच पडिक राहायचो. पी. सावळाराम आमच्यासमोर आणि आम्हाला सांगून ‘आई रिटायर होते’ या नाटकाला बसले होते हे आम्हाला माहीत होतं, पण नाटक संपल्यावर आम्हा मुलांना पुन्हा भेटतील हे आमच्या गावीही नव्हतं. पण नाटक संपलं आणि पी. सावळाराम अनपेक्षितपणे, पण आम्हाला शोधत शोधतच आमच्याकडे आले. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. ते मुसमुसून रडत होते. एका कवी-गीतकाराच्या डोळ्यांत येणारं पाणी थांबत नाही हे पाहून आम्ही मुलं गपगार झालो. आमच्यातल्या एकाच्याही तोंडून एक शब्द बाहेर पडेना. आम्ही एकदम चूप. आम्हाला काय बोलावं ते कळेना. आम्ही वयाने लहान आणि ते आमच्यापेक्षा मानाने आणि ज्ञानाने कितीतरी मोठे! आम्ही त्यांच्याकडे एकटक बघत बसलो.

शेवटी ती कोंडी त्यांनीच फोडली. हुंदके देत देत तेच सांगू लागले, मी आज ‘आई रिटायर होते’ नाटक पाहिलं, भक्ती बर्वेने त्यात आईचं काय काम केलं आहे! अप्रतिम! सगळ्या कुटुंबाचा भार वाहणारी आई शेवटी रिटायर होतानाही सगळ्यांना सूचना कसल्या देते तर हा भार नीट कसा वाहिला जाईल हे पहा, म्हणजे ती आई म्हणून रिटायर होतानाही रिकाम्या मनाने रिटायर होत नाही, तुम्हाला सांगू, आज मी हे नाटक बघत होतोे, पण ते बघताना मी लिहिलेल्या एका गाण्याची आठवण माझ्या मनात पुन्हा जागी होत होती. ‘मोलकरीण’ नावाच्या सिनेमासाठी मला आईच्या मनातलं गाणं लिहायला सांगितलं होतं.

आपल्या पोटचा मुलगा कसाही निपजला तरी आईच्या मनात काय भावना असतील असा प्रश्न माझ्या मनात आला आणि मला हेच शब्द सुचले की ‘देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे, माझे सारे जीवन देई मम बाळाला!’…आज या नाटकाने मला माझ्याच त्या गाण्याची आठवण करून दिली. मुलांनो, मघाशी ते नाटक पहायला जाण्याआधी मी तुम्हाला म्हणालो होतो की मला आई पुन्हा समजून घ्यायची आहे. खरंच, आई समजून घेण्यासाठी हे नाटक मी पाहिलं, तुम्हाला सांगतो, ‘मोलकरीण’ मधलं ते गाणं मी लिहिलं त्या काळात एकदा मी आई नावाची एक व्यक्ती समजून घेतली होती. आज हे नाटक पाहिल्यावर पुन्हा ही आई मी लिहिलेल्या त्या गाण्यातल्या आईशी ताडून पाहिली. ही आई त्या आईसारखीच निघाली रे…तशीच्या तशीच…तंतोतंत, हुबेहुब!

पी. सावळाराम आमच्याशी हे सारं मनात दाटलेलं बोलत असतानाच ‘आई रिटायर होते’ मध्ये काम करणार्‍या भक्ती बर्वे तिथे आल्या. पी. सावळाराम डोळे पुसत पुसतच भक्ती बर्वेंकडे गेले आणि म्हणाले, आज तू मला खूप रडवलंस गं, मी मोलकरीणसाठी लिहिलेल्या गाण्यातल्या आईची आठवण करून दिलीस. तू केलेली आई आणि ती आई, दोघींची जातकुळी एकच निघाली गं!

भक्ती बर्वे काही क्षण नि:शब्द झाल्या, पण नंतर म्हणाल्या, दादा, तुम्ही रडता आहात, तुम्ही जातिवंत कवी आहात!…
पी. सावळारामांचे डोळे तरीही ओलेच होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -