घरफिचर्सअविस्मरणीय .. मधुमती

अविस्मरणीय .. मधुमती

Subscribe

काळ कसा भरभर जातो. अगदी ताजी वाटणारी एखादी घटना असते, पण नीट विचार केला की जाणवतं, अरे ती तर कितीतरी वर्षांपूर्वी होऊन गेली आहे. काहीे चित्रपटांचंही तसंच असतं. चांगले चित्रपट पाहताना नेहमीच ते ताजेतवाने असल्यासारखंच वाटत असतं. त्यांना सदासतेज, एव्हरग्रीन म्हटलं जातं, ते त्यांच्या या गुणांमुळंच. मधुमती हा असाच एक चित्रपट.

 पुनर्जन्मावर आधारलेले मिलन, नील कमल, मेहबूबा, कर्ज, कर्ण-अर्जुन, कुदरत असे अनेक चित्रपट आले आणि त्यातील बहुतेक यशस्वीही ठरले. दुसरी साम्याची बाब म्हणजे या सर्व चित्रपटांतील गाणीही संस्मरणीयच आहेत. लता मंगेशकर तर मधुमतीती ल आजा रे परदेसीचा समावेश त्यांच्या सर्वोत्तम 10 गाण्यांत करतात.या चित्रपटात सलील चौधरी यांनी महंमद रफी, मन्ना डे आणि मुकेश या तिघांचाही आवाज वापरला होता, त्यांच्या बराबेर लता आणि मुबारक बेगम या गाायिकांचा.

मधुमतीमधील आजारे परदेसी किंवा घडीघडी मेरा दिल धडके, दिल तडपतडप के कह रहा है .. सुहाना सफर, जंगल में मोर नाचा किसी ने न देखा, चढ गयो पापी बिछुआ ही गाणी तर आजतागायत सर्वांच्या ओठांवर आहेत. खरं तर मुबारक बेगमचं हम हाले दिल सुनाएंगे, हे गाणंदेखील चांगलंच लोकप्रिय झालं होतं. पण त्याच्या लोकप्रियतेचा फारसा फायदा काही तिला मिळाला नाही. अगदी मोजक्या गाण्यांची, तिची कारकीर्द ठरली. ती मात्र लोकांच्या आठवणीत आहेत. नंतरच्या काळात तिची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती आणि मुख्यमंत्र्यांनी फ्लॅट मंजूर केला तरी त्या फ्लॅटसाठी तिला जावेद अख्तर आणि शबानाने पैसे दिले होते.

- Advertisement -

दिलीप कुमार, वैजयंतीमाला, प्राण, जॉनी वॉकर, जयंत, तरुण बोस असे गुणवान कलाकार आणि बिमल रॉय यांचं दिग्दर्शन, सलील चौधरींचं संगीत या सार्‍यांचा असा मेळ जमला होता की बस्स. एस. डी. बर्मनदा त्यावेळी सुजाताचं संगीत देत होते, त्यामुळं रॉय यांनी सलील चौधरी यांच्यावर संगीताची जबाबदारी सोपवली. आश्चर्य वाटेल, पण तेव्हा दिलीप कुमारने त्यांच्या नावाला कडाडून विरोध केला होता, हे सत्य आहे. रॉय यांनी मात्र त्याचा विरोध न जुमानता आपला निर्णय कायम ठेवला आणि सलील चौधरी यांनीही त्यांचा विश्वास सार्थ ठरवला, हे आता कोणलाही मान्य होईल. चित्रपट आणि त्यातील सर्व गाणी गाजली. त्यामुळंच वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तो अनेकदा दाखवला जातो आणि आवडीनं पाहिलाही जातो. साठ वर्षं झाली तरीही त्याचा ताजेपण अद्यापही कमी झाल्यासारखा वाटत नाही. (पुढंही दीर्घकाळ वाटणार नाही.) कितीही ताजातवाना वाटला तरीपण तारखांची साक्ष काढली की कळतं, खरोखरच हा चित्रपट 19 सप्टेंबर 1958 रोजी प्रदर्शित झाला होता. म्हणजे आता त्याला साठ वर्षं झालीच की!

खरं तर दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांनी बर्‍याच चित्रपटांत बरोबर काम केलंय. म्हणजे मधुमती, देवदास, नया दौर, लीडर, गंगा जमुना, संघर्ष इ.इ. तरीही अनेकांना या जोडीचं नाव काढलं की मधुमतीच आठवतो. ज्यांनी हा पाहिला असेल, त्यांना असं का ते सांगायची आवश्यकताच नाही, आणि ज्यांनी पाहिलाच नसेल त्यांना सांगून काय उपयोग? तर हा मधुमती लोकांना खूपच आवडला आणि त्यांनी तो अक्षरशः उचलून धरला. त्यानं चांगला पैसाही केला. पण आता हे कुणाला खरं वाटेल का, की तेव्हा चित्रण चालू असताना, निर्मितीचा खर्च आटोक्याबाहेर गेल्यामुळं बिमल रॉय काळजीत होते. खरंच सांगायचं तर संकटात, सापडले होते. त्यांनी स्वतःचे दिग्दर्शनाचे पैसे घेतले नाहीत. दिलीप कुमारनंही त्यांना धीर दिला आणि स्वतःचे 70,000 रुपये दिले आणि इतकं करून तो थांबला नाही, त्यानं सर्व वितरकांना ही गोष्ट नीटपणं समजावून सांगितली आणि त्यांनीही आपल्या कुवतीप्रमाणं रॉय यांना मदत करावी असं आवाहन केलं होतं. त्यांनी त्याला मनापासून साथ दिली. यथावकाश चित्रपट पूर्ण झाला आणि हिटही ठरला. सर्वांना त्यांचा पैसा परत मिळाला.

- Advertisement -

हा चित्रपट पुनर्जन्माची कथा होता आणि ओसाड गूढ बंगला, साधी भोळी खेडेगावातील माणसे, दुष्ट खलनायक जमीनदार राजा उग्रनारायण, गावच्या प्रमुखाची सुंदर मुलगी तिचं नायकाबरोबर प्रेम .. रॉय पहिल्यापासून अखेपर्यंत आपली पकड निसटू देत नाहीत. त्यामुळंच प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीला खिळून राहात. चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा नायक -दिलीप कुमार- त्याच्या सहकार्‍यासह बायको मुलाला आणण्यासाठी, डोंगराळ भागातील अवघड वाटेने रेल्वे स्टेशनकडे जात असतो. पण त्यावेळी वादळ, पाऊस सुरू होतं.

एक मोठी दरड कोसळून रस्ता बंद होतो. पुढं जाणं शक्यच नसतं. तेव्हा ते दोघं एका ओसाड हवेलीत आसरा घेतात आणि तिथं गेल्यावर देवेंद्रला ते सारं परिचयाचं वाटायला लागतं. जमीनदार राजा उग्रनारायणचं चित्र भिंतीवर असतं आणि ते आपणच -पूर्वजन्मात- काढल्याचं त्याला आठवतं.तेथून फ्लॅश बॅकला सुरवात होते. त्या जन्मात देवेंद्र हौशी चित्रकार आनंद असतो आणि लाकडाच्या व्यापार्‍याचा सुपरवायझर म्हणून आलेला असतो. कलाकार असल्यामुळं भटकण्याची आवड. त्यामुळं उग्रनारायणने मनाई केलेल्या जंगल-वाटेवरून जातो. तेथे गावातील प्रमुखाच्या मुलीच्या (वैजयंतीमाला) प्रेमात पडतो. नंतर अर्थात उग्रनारायणचे वैर, तिच्या भावाला उग्रनारायणच्याच माणसांनी ठार केलेलं असतं. इ.इ. मग त्यांच्यातील वैर, सूड . अशा मार्गानं कथा पुढं जाते. गंमत म्हणजे या फ्लॅशबॅकमध्येही एक फ्लॅशबॅक आहे – आगगाडीच्या अपघाताचा. या सार्‍याला हरकाम्या नोकर चरणदास (जॉनी वॉकर) याची आणि भरपूर गाण्यांची जोड आहे. लेखक ऋत्विक घटक यांनी नियोजित केलेला शेवटात मात्र बदल केला गेला आणि तो रेल्वे स्टेशनवर करण्यात आला होता. हा शेवट सर्वांनाच रुचला.

मधुमतीला प्रेक्षकांची गर्दी चोवीस आठवडे उलटले तरीही कायम होती आणि नेमका तेव्हाच, चोविसाव्या आठवड्यानंतर तो रॉक्सी चित्रपटागृहातून काढून घेण्यात आला. प्रेक्षकही हळहळले. असं का केलं गेलं, असा प्रश्न सर्वांनाच पडला. आणि त्याचं उत्तर मिळालं तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण असं होतं की थिएटर व्यवस्थापनाच्या कराराप्रमाणे चित्रपटाचा रौप्यमहोत्सव – ज्युबिली – झाला, तर व्यवस्थापनाला कर्मचार्‍यांना बोनस द्यावा लागणार होता. तो देण्याची त्यांची तयारी नव्हती म्हणे!

दिलीप कुमार, वैजयंतीमाला, प्राण यांच्या एवढेच प्रभावी काम जॉनी वॉकरने त्याच्या छोट्या भूमिकेत केले होते. दारूच्या आहारी गेलेल्या माणसाच्या भूमिकेतील त्याच्या तोंडचं जंगल में मोर नाचा । किसी ने ना देखा । हम तो थोडिसी पीके जरा झुमे । तो सबने देखा हे गाणे पाहण्यासाठी तर कित्येक जण पुन्हा हा चित्रपट पाहण्यासाठी येत. वास्तव असं होतं की, जॉनी वॉकर आयुष्यात कधीही मद्याला शिवला नव्हता आणि तरीही त्यानं अशा दारुड्यांच्या भूमिका अशा काही रंगवल्या की, त्याच्या गाजलेल्या भूमिका जास्त करून अट्टल मद्यप्याच्याच होत्या.

रॉय यांचा चित्रपट म्हणजे संकलन हृषिकेश मुखर्जी यांचं असणार असं अनेकांना वाटतं पण प्रत्यक्षात मात्र ते गुरुदास यांचे होते. कारण मुखर्जी त्यावेळी मुसाफिरचं संकलन करत होते. त्या काळात मानाच्या समजण्यात येणार्‍या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डबाबत तर मधुमतीनं विक्रम केला. तब्बल नऊ गटांत त्यानं अ‍ॅवॉर्ड मिळवलं होतं. त्या काळचा हा विक्रमच होता. (हा विक्रम दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे ने 1996 मध्ये मागे टाकला, त्यानं 10 अ‍ॅवॉर्ड मिळवली.) मधुमतीला सर्वोत्तम अभिनेता (दिलीप कुमार), अभिनेत्री (वैजयंतीामालाची शिफारस मधुमती आणि साधना या दोन चित्रपटांतील भूमिकेसाठी करण्यात आली होती), सहायक अभिनेता (जॉनी वॉकर), संगीतकार (सलील चौधरी), महिला पार्श्वगायिका (लता मंगेशकर)़, संवाद (राजेंद्र सिंग बेदी), संकलन, छायाचित्रण (दिलीप गुप्ता), कला दिग्दर्शनाची (सुधेंदु रॉय) अ‍ॅवॉर्ड मिळाली आणि इतकं असूनही दिग्दर्शकाला अ‍ॅवॉर्ड नसावं हा विरोधाभास मात्र चांगलाच जाणवणारा होता. पण असं बर्‍याचदा घडलंय. अगदी परदेशातही. का ते ते अ‍ॅवॉर्ड देणार्‍यांनाच माहीत.

छायाचित्रण करणारे दिलीप गुप्ता हे परदेशातून ही कला शिकून आले होते. त्यांनी हॉलीवूडमध्ये ग्रेटा गार्बो, क्लार्क गेबल इ. बरोबर काम केले होतं. त्याशिवाय वॉल्ट डिस्नेकडे त्यांनी अ‍ॅनिमेशनचे शिक्षणही घेतलं होतं. आपले गुरु म्हणून ते न्यू थिएटर्सचे नितीन बोस यांचा उल्लेख करत तर शिष्य म्हणून राधू कर्मकार, तारु दत्त, व्ही. प्रभाकर, बालू महींद्रू इ. नावे घेत.

या चित्रपटातील वैजयंतीमालाचे पोषाख तिची आजी यदुगिरी देवी यांनी तयार केले होते आणि कलादिग्दर्शक सुधेंदु रॉय यांनी ते मंजूरही केले. नवल वाटावं अशी बाब म्हणजे चढ गयो पापी बिछुआ या गाण्याच्या वेळी समूह नृत्यातील नर्तिकांमध्ये तेव्हा अगदी लहान वयाच्या असलेल्या, सध्याच्या ख्यातनाम कोरिओग्राफर सरोज खान होत्या. एकदा बोलताना वैजयंतीमाला यांनीच ती सांगितली होती.

महलपासून सुरू झालेली रहस्यपटांची मालिका मधुमतीनं पुढं चालवली. (शिवाय तिला पुनर्जन्माची जोड दिली.) अगदी खास परतपरत वाजणार्‍या गाण्यासकट आणि गंमत अशी की दोन्ही चित्रपटांतील ती गाणी लता मंगेशकर यांनीच म्हटली होती. आयेगा आनेवाला इतकीच लोकप्रियता आजा रे परदेसीलाही मिळाली. कारण दोन्ही गाणी वेगवेगळ्या संगीतकारांनी वेगळ्या धाटणीनं बसवली होती. त्यांची गोडी आजही अवीट आहे.

आश्चर्यकारक बाब म्हणजे त्या काळी या चित्रपटाचा मुहूर्त परदेशात, तोही कार्लोव्ही व्हेरि फेस्टिवलमध्ये झाला होता. रशियन अभिनेत्री तात्याना कोन्युकोवाने कॅमेरा रोल केला, तर पोलिश अभिनेत्री बार्बारा पोलोन्स्कानं क्लॅपर पर्सन म्हणून काम केलं. मुहूर्ताच्या शॉटच्या वेळी दिलीप कुमार कॅमेर्‍यापुढं होता. या चित्रपटाचं भारतातील चित्रण नैनितालजवळच्या राणीखेत येथे करण्याचं बिमल रॉय यांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणं ते सुरूही झालं. पण प्रथम चाचणीचे निकाल पाहिले तेव्हा तेथील धुक्यामुळं फिल्म अगदी धुरकटल्यासारखी दिसत होती. त्यामुळं पुन्हा चित्रण तेथेच करून खर्च प्रचंड वाढवण्यापेक्षा मुंबईतच आरे कॉलनीत सेट उभारण्यात आला होता व तेथे ते चित्रण झालं. बरंच बाह्यचित्रण महाराष्ट्रात झालं होतं .. महाबळेश्वरला. हे सारं वाचता वाचता आता तुम्हालाही मधुमती पुन्हा एकदा पहावा असं वाटू लागलायं ना?

आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -