घरफिचर्सप्रसिद्ध लेखक व. पु. काळे

प्रसिद्ध लेखक व. पु. काळे

Subscribe

वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व.पु. यांचा जन्म 25 मार्च १९३२ रोजी झाला. व. पु. काळे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु. काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा असा त्यांचा विनोद असे. विशेषत: तरुणाईच्या मनावर वपुंनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून गारूड केले होते. जगणे हीसुद्धा एक कला आहे, ती आपण अवगत करायला हवी, असा संदेश ते अगदी सहज देऊन जात असत.

व. पु. या २ शब्दावर तमाम रसिक अजूनही प्रेम करत आहेत. त्यांचे विचार आदानप्रदान करत आहेत. व. पु. मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आपल्या मराठी मातृभाषेत लिहिली याला तोड नाही. वपुंचे मराठी लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे, समृद्ध करणारे आहे. आपण सारे, अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबर्‍या खूपच गाजल्या.

- Advertisement -

आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण रंजक पद्धतीने सांगणारे थोर साहित्यिक म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे. ‘वपु’ या दोन अक्षरांनी महाराष्ट्राला परिचित असलेल्या व. पु. काळे यांचा वाचकविश्वात स्वतंत्र असा संप्रदाय आहे. वपुंनी ६० पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केलं. त्यातील पार्टनर, वपूर्झा, ही वाट एकटीची यांचे कथाकथन त्यांनी स्वतः केलं. या कथाकथनाला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली आणि ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचणारे वपु पहिले लेखक ठरले. पेशाने आर्किटेक्ट असणारे वपु इमारतींच्या आराखड्याचे रेखन करण्यापेक्षा लेखन करू लागले आणि मराठी साहित्याला एक थोर साहित्यिक लाभला.

वपुंचं लिखाण चौफेर होतं. कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र्य असे सर्व लेखन प्रकार त्यांनी हाताळले. लेखनातली विशेष बाब म्हणजे कथा संपताना कथेत अचानक येणारा ट्विस्ट. त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या, स्वैर वेड्या मनाचे विविध कंगोरे अधोरेखित करणार्‍या असत. वपुंची कथा वाचताना डोळ्यासमोर कथेचे कथानक तरळते. कथा वाचून झाल्यावरही त्यातले एक एक प्रसंग स्लाइड शोप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत राहतात. लेखकाला कथा आपली वाटावी(च) असंच वपु लिहीत असत. वपुंच्या पार्टनर, झोपाळा, आपण सारे अर्जुन, ऐक सखे, चतुर्भुज, काही खरं काही खोटं अशा अनेक पुस्तकांवर, त्यांच्या कादंबर्‍या आणि कथांवर वाचकप्रियतेची मोहोर उमटली आहे.

- Advertisement -

त्यांचे ‘पार्टनर’ हे पुस्तक भरपूर लोकप्रिय आहे. त्यांच्या सर्व लेखनाचे, कथाकथनाचे श्रेय त्यांनी त्यांच्या पुण्याच्या चिंचोरे गुरुजींना दिले होते. व.पु. काळेंना ‘महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान’, ‘पु.भा.भावे पुरस्कार’, ‘फाय फाऊंडेशनचा पुरस्कार’ आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. सोशल नेटवर्किंग साइट्सवरही वपुंच्या नावाची पाने तयार केली जातात. त्यांचे निवडक विचार, त्यांच्या पुस्तकांच्या समीक्षा या पानांवर शेअर केल्या जातात. वपुंच्या चाहत्यांची संख्या हळूहळू वाढत असून त्यात तरुणांची संख्या जास्त आहे. अशा या थोर लेखकाचे 26 जून 2001 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -