घरफिचर्सबुद्धिप्रामाण्यवादी अभिनेता!

बुद्धिप्रामाण्यवादी अभिनेता!

Subscribe

लोकशाहीचा मूलाधार जो सामान्य माणूस, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्याला महिनोन्महिने दूरदर्शनवर रामायण, महाभारत दाखवत राहिलो. अत्यंत निर्बुद्ध अशा मालिका दाखवल्या. असं का केलं? तर त्याची विचारशक्ती मारून टाकायची म्हणून. सामान्य माणूस शहाणा झाला तर आजच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारांना तो टिकू द्यायचा नाही. शोषणाची व्यवस्था तो उलथून टाकेल. मंत्र्यांचे तनखे, चैनी बंद पाडेल. तो त्यांना इस्टेटी वाढवू देणार नाही. हा धोका लक्षात घेऊन सामान्य माणसाला गुंगीत ठेवायचा प्रयत्न करण्यात आला. तो शहाणा होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. त्याचा अडाणीपणा अभेद्य ठेवण्यासाठी, तो अधिकाधिक वाढवण्यासाठी शिक्षणाची मुद्दाम आबाळ करण्यात आली. दारिद्य्र वाढू दिलं म्हणजे लोक लाचार बनतील, ते काबूत राहतील हे असं षड्यंत्र बहुधा रचण्यात आलं. मी काही मोठा विचारवंत किंवा समाजशास्त्रज्ञ नाही; पण लोकशाही देशातला एक जबाबदार नागरिक म्हणून अवतीभवती उघड्या डोळ्यांनी पाहणं, त्याचं विश्लेषण करणं, जे जाणवतं ते मांडणं आणि योग्य दिशेनं प्रयत्न करणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांना सातत्यानं मदत करणं, माझं कर्तव्य आहे, असं मी मानतो’.

हे विचार आहेत ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे. ‘रूपवेध’ पुस्तकात ‘माझी गाफील पिढी’ या लेखात त्यांनी हे विचार मांडले आहेत. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, सामाजिक काम, लेखन आणि अर्थातच त्यांचा अभिनय प्रवास हा चिरकाल टिकून राहणारा आहे. राजकीय परिस्थितीवर त्यांनी केलेले भाष्य आजही जनसामान्यांना धर्मरुपी अफूची गोळी देऊन मेंदू ताब्यात घेण्याची राजकारण्यांची गोष्ट सांगते… झुंडीच्या कळपात सहभागी न होता मला काय वाटते हे महत्त्वाचे आहे, असे सांगत लागू आयुष्याच्या अंतापर्यंत आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहिले. देवाला रिटायर्ड करून दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा, हे सांगताना त्यांना कधी धर्म संरक्षकांची भीती वाटली नाही. निर्भयपणे त्यांनी आपले काम सुरू ठेवले. विशेष म्हणजे हे काम सुरू ठेवताना आपण फक्त विचार देत आहोत, पुढचे काम माझे नाही, अशी उंटावरून शेळ्या हाकण्याची त्यांची कधीच भूमिका दिसली नाही. यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी स्वतःला जोडून घेताना नरेंद्र दाभोलकर आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. मुख्य म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा रथ पुढे नेताना सोबत्यांना आर्थिक आधार दिला. नाटक, सिनेमातून जे काही पैसे मिळवले ते आपल्याला जगण्यापुरते ठेवून बाकीचे ते कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी दिले. एखाद्या नटाची ही सामाजिक बांधिलकी आदर्शवत अशी आहे.

- Advertisement -

सामाजिक क्षेत्रात झोकून देत काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा संसार चालवण्याची जबाबदारी फक्त आपल्या एकट्याच्या हाताने पुरी पडणार नाही. ही जबाबदारी समाजाचीही आहे, अशी भूमिका मांडत सामाजिक कृतज्ञता निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी समविचारी मित्रांना सोबत घेतले. या निधीचे ते विश्वस्त बनले. निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, डॉ.बाबा आढाव, प्रा.पुष्पा भावे यांच्या सोबतीने त्यांनी हे काम केले. मोठ्या कलाकारांच्या साथीने ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग करत सामाजिक निधीत पैशाची मोठी भर टाकली. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकाच्या १०० व्या प्रयोगाचे मानधन मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलन तसेच साने गुरुजी स्मारकाला दिले. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात महाराष्ट्र वैचारिक, सामाजिक आणि प्रगत म्हणून घडत असतानाच्या कालखंडातील युवकांसाठी लागू हे प्रेरणास्थान होते. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारसरणीच्या पायावर जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणी विरोधात दिलेला संपूर्ण क्रांतीचा नारा यामुळे महाराष्ट्रातील युवक पेटून उठले होते. या युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाची धग पेटवत ठेवली. पुढे त्यात यश आल्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. या युवकांचे प्रेरणास्थान लागू होते. त्या तरुणांच्या विचारांची बैठक पक्की करण्याचे काम त्यांनी केले.

समाजवादी आणि निरीश्वरवादी विचार मांडताना लागू यांनी आपल्या विचारांची कधीही तडजोड केली नाही. आज समाजवादी विचार आणि तशी जगणारी माणसे कमी कमी होत जात असताना नवीन पिढीला आधार देण्याचे काम गेली अनेक वर्षे लागू सातत्याने करत आले होते. आज लागूच हे जग सोडून गेल्यामुळे या पिढीला कोणाचा आधार असेल असा विचार येतो; पण, ‘असा विचार मनात आणूच नका. जगात खूप चांगली माणसे आहेत, ती तुम्हाला आधार देतील. सामाजिक बांधिलकीचा वसा मात्र टाकू नका’, अशा धीरगंभीर आवाजात ते नक्की बोलले असते. फक्त रंगभूमीचाच नव्हे तर आचार-विचारांचाही ‘सम्राट’ असणार्‍या डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण आदरांजली!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -