घरफिचर्सअभिनयाचे विद्यापीठ अस्तंगत!

अभिनयाचे विद्यापीठ अस्तंगत!

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी महाराष्ट्राच्या नाट्य-सिने क्षेत्रांवर सलग पाच दशके अभिनयाचा ठसा उमटवला. वयाची नव्वदी पार केलेला हा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे अभिनयाचे विद्यापीठच! मराठी नाटक तसेच, मराठी आणि हिंदी चित्रपटांतील अभिनयाने रसिक मनाचा ठाव घेणारा प्रगल्भ अभिनेता अशीही त्यांची ख्याती होती. वृध्दापकाळामुळे गेल्या काही काळापासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. डॉ. लागू यांच्या जीवनाचा पट उलगडल्यास एक बाब सिद्ध होते, ती म्हणजे त्यांचा प्रवास केवळ अभिनयापुरता सीमित नव्हता. एक परिपूर्ण अभिनेत्यासोबतच संवेदनशील समाजवादी, विज्ञानवादी, टीकाकार, बुद्धीप्रामाण्यवादी, अंधश्रद्धेचा विरोधक आदी भूमिकांमधूनही मराठी मुलखाने त्यांच्या कार्याची दखल घेतली. श्रीराम लागू तसे मूळ पेशाने डॉक्टर. १९५०च्या दशकात कान-नाक-घसा क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात साधारणत: पाच वर्षे व्यवसायात व्यतित केली. डॉक्टरकीच्या पुढील अभ्यास व अनुभव प्रगल्भतेपोटी ते काही वर्षे कॅनडा व इंग्लंडस्थित लौकिकप्राप्त वैद्यकीय संस्थांमध्ये सहभागी झाले. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी पुण्यासह टाबोरा, टांझानिया आदी ठिकाणी व्यावसायिक व्याप्ती वाढवली. तथापि, डॉक्टरकीची पदवी असूनही, त्यांना वेड लावले ते अभिनयाने. महाविद्यालयीन जीवनात नाटकात सहभागी होऊन डॉ. लागू यांनी अभिनयाची झुल खर्‍या अर्थाने अंगावर चढवली होती. तो प्रवास पुढे नेऊन मराठी रंगभूमी आणि पाठोपाठ रूपेरी पडद्यावरील अंगभूत कौशल्याने लवकरच त्यांना सार्वत्रिक प्रसिध्दी मिळाली. थोर नाटककार वसंत कानेटकर यांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांच्या व्यावसायिक नाट्याभिनयाचा खर्‍या अर्थाने श्रीगणेशा झाला. एक पूर्णवेळ नाट्य अभिनेता म्हणून त्यांच्या कामाची वास्तविक अर्थाने ती सुरुवात होती. नमनाच्या या दमदार प्रवेशानंतर डॉ. लागू यांनी मागे वळून पाहिलेच नाही. किंबहुना, त्यानंतर यशाने त्यांचा पाठलाग सुरू केला तो तब्बल नंतरची पन्नास वर्षे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’मधील त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका कमालीची गाजली. भालबा केळकर यांच्यासमवेत पुरोगामी नाट्य संस्थेची मुहूर्तमेढ रोवून डॉ. लागू यांनी अभिनयातील आणखी एक मैलाचा दगड गाठला. अग्निपंख, अ‍ॅन्टीमनी, आंधळ्याची शाळा, कन्यादान, कस्तुरीमृग, काचेचा चंद्र, किरवंत, मुख्यमंत्री, यशोदा, हिमालयाची सावली, क्षितीजापर्यंत समुद्र, चंद्र आहे साक्षीला अशा कितीतरी मराठी नाटकांतील त्यांच्या भूमिकांनी मराठी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. नाटकांव्यतिरिक्त पिंजरा, सामना, सिंहासन, सुगंधी कट्टा, स्वयंवर, देवकी नंदन गोपाला, या मराठी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. डॉ. लागू यांच्या पिंजरा व सामना चित्रपटांतील हटके भूमिका त्यांना वेगळी ओळख देऊन गेल्या. दोन्ही चित्रपटांत त्यांची मास्तरची भूमिका होती. एरव्ही ग्रामीण भागात कार्यरत असलेला हा मास्तर म्हणजे एक सरळमार्गी व नेमस्त विचारसरणीचा चेहरा म्हणून मानला जातो. तथापि, पिंजरा चित्रपटात प्रारंभी ध्येयवाद जपणारा, मात्र त्यानंतर नर्तकीच्या अधीन जाऊन स्वत:चे अध:पतन घडवून आणणारा मास्तर डॉ. लागू यांनी पध्दतशीर रंगवला. सामनामधील सावकारशाहीला आव्हान देणारी मास्तरची भूमिका तर त्यांच्या अभिनयाचा कळस ठरली. अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका गाजल्या. डॉ. लागू यांच्या एकूण कारकिर्दीचा लेखाजोखा मांडायचा तर, त्यांनी चाळीसपेक्षा अधिक मराठी, हिंदी व गुजराती नाटकांमध्ये अभिनय केला. शंभरहून अधिक मराठी व हिंदी चित्रपटातील भूमिकांची सनद त्यांच्या नावावर आहे. सुमारे वीस मराठी नाटकांच्या दिग्दर्शनाची मोहोर डॉ. लागू यांच्या कामगिरीला चमक देऊन गेली. नाट्य-चित्र अभिनयात पारंगत असलेल्या डॉ. लागू यांनी लिखाण करून स्वत:चे साहित्यिक अंगही विकसित केले. मराठीसोबत हिंदी व गुजराती रंगभूमीला त्यांचे योगदान राहिले. त्यांच्या मते अभिनयासाठी नाट्य अथवा चित्रपटातील पात्र केवळ निमित्तमात्र असतात. मी देखील त्यापैकीच एक आहे. रसिक प्रेक्षक हा प्रगल्भ असतो. रंगमंच अथवा रूपेरी पडद्यासमोर बसताना तो परीक्षक म्हणूनही बसलेला असतो. त्याला त्या पात्रांमधील नैसर्गिक अभिनय भावतो. भडक अभिनय ही रसिकांची नापसंती बनते. आपण स्वत: या बदलांना अनुसरून अभिनयाचा प्रवास केल्याचे ते नेहमी सांगत. अभिनयात चार चाँद लावलेल्या या अभिनेत्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती वेळोवेळी अस्वस्थ करून गेली. याकाळात त्यांची वैचारिक नाळ अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी जुळली. आस्तिक विचारसरणीच्या विरोधात असलेल्या डॉ. लागू यांचे विचार स्वत:पुरते मर्यादित राहिले नाही. दगडाच्या मूर्तीत देव नसल्याचे धाडसी विधान करायलादेखील ते चुकले नाही. अशाच एका जाहीर विचार मांडणीने त्यांना कमालीच्या टीकेला सामोरे जावे लागले, जेव्हा त्यांनी ‘देवाला रिटायर करा’ नामक लेख लिहिला. या लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाल्याचे त्यांनी म्हटले होते. शिवाय, देव हा अंधश्रध्देशी निगडित भाग असल्याचे त्यांचे विधान अनेकांचा रोष ओढवून घेणारे होते. डॉ. लागू कमालीचे विज्ञानवादी आणि समाजवादी विचारांचे होते. समाजातील परंपरा व अंधश्रध्दा वेदनादायी असल्याचे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. नवसासारख्या अंधश्रध्देला सुशिक्षित लोकांकडून खतपाणी घातले जात असल्याबद्दल ते जाहीर टीकास्त्र सोडत. देशातील अंधश्रध्देला गरिबी आणि आणि अज्ञान हे दोन घटक कारणीभूत असल्याचे त्यांचे ठाम मत होते. माणूस अंधश्रध्देने नव्हे तर कर्तृत्वाने प्रगतीचे मार्ग चोखाळू शकतो. स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी ध्येयनिश्चिती व अथक प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणत. डॉ. लागू यांच्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेने ते कमालीचे संवेदनशील आणि हळवे बनले. त्यांचे पुत्र तन्वीर हे रेल्वेत प्रवास करताना झोपडपट्टीतील मुलाने त्यांच्या दिशेने दगड भिरकावल्याने ते जखमी झाले. पुढे त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. खांद्याला लागलेल्या मुलाचे प्राणोत्क्रमण डॉ. लागू यांच्यासाठी कमालीचे वेदनादायी ठरले. या कौटुंबिक धक्क्यातून सावरताना त्यांचा मोठा कालापव्यय झाला. डॉ. लागूंकरवी दिवंगत मुलाच्या नावाने २००४ मध्ये रूपवेध प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘तन्वीर सन्मान’ आणि ‘तन्वीर नाट्यधर्मी’ पुरस्कार देण्यात येतात. याद्वारे ज्येष्ठ रंगकर्मींना गौरवण्याची प्रथा आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांची समाजाभिमुखता अधोरेखित झाली. डॉ. लागू यांना आपल्या जीवनप्रवासात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले. तथापि, प्रतिकूल परिस्थितीतही ते कधी डगमगले नाही. शिवाय, त्यांनी कोणत्याही तडजोडीचा मार्ग स्वीकारला नाही. बहुधा याच कारणामुळे त्यांच्या प्रसिध्दीचे वलय अभिनयापुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठी राहिली. डॉ. लागू यांच्या पंचदशकीय अभिनय प्रवासाचे वर्णन केवळ शाब्दिक चौकटीत बसू शकत नाही. ‘झाले बहु, होतीलही बहु, परंतु या सम हाच’ एवढीच शाब्दिक सुमनांजली आपण वाहू शकतो. अभिनयाचे हे विद्यापीठ आता अस्तंगत झाले असले तरी त्यांच्या स्मृती या क्षेत्रातील अनेक पिढ्या घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरतील. उद्या जेव्हा केव्हा महाराष्ट्राच्या नाट्य-चित्र अभिनयाचा इतिहास लिहिला जाईल, त्यामधील एक पान डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू यांच्या नावाने राहील. कुसुमाग्रजांनी रंगवलेले नटसम्राटाचे पात्र आज खर्‍याखुर्‍या आयुष्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उद्घोष कधीही थांबणार नाही. डॉ. लागू यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -