घरफिचर्सअमूल्यामागील प्रेरणा कोणाची?

अमूल्यामागील प्रेरणा कोणाची?

Subscribe

गुरुवारी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी बंगळुरूमध्ये सीएएविरोधात रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत एका मुलीने जबरदस्तीने स्टेजवर प्रवेश करत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणांमुळे एकच गजहब झाला. त्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची आता चौकशी करण्यात येत आहे. अमूल्या नावाच्या या मुलीचा पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देण्यामागे काय उद्देश होता, याची आता चौकशी होत आहे. तिने पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्यामुळे तिच्या घरावर काहीजणांनी दगडफेक केल्याची माहिती आहे. ही मुलगी मागील सात-आठ दिवसांपासून घरातून निघून गेली होती. तिला आपण असे चिथावणीखोर भाषण देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला असे अमूल्याच्या वडिलांनी मीडियाला सांगितले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही मुलगी माओवाद्यांच्या संपर्कात होती, असे उघड झाले आहे. मग अमूल्याला अचानक पाकिस्तानबद्दल प्रेम कसे निर्माण झाले, हा प्रश्न आहे. तिला पाकिस्तान हा नरक नसून स्वर्ग असल्याचा साक्षात्कार झालेला आहे. मजेची गोष्ट अशी की, ज्यांना असे वाटते त्यांनी नरकात तडफडत राहण्याची काय गरज असते, तेही सांगून टाकावे, पण ते कधी होत नाही. कुठल्याही स्वातंत्र्याचा वापर ते स्वातंत्र्य देणारी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच अधिक व नेमका होत असतो. साहजिकच सध्या जे काही चालू आहे, त्यात कुठलीही नवलाई नाही.अशा ‘आझादी’वीरांशी भांडत बसण्यापेक्षा आपल्याला कसले स्वातंत्र्य हवे आहे आणि ते कसे टिकवायचे, त्याची चिंता केली पाहिजे. काश्मिरातील काही लोकांना आझादी हवी आहे आणि दिल्लीत नेहरू विद्यापीठाच्या आवारात तशा घोषणाही झाल्या. मग त्याचीच पुनरावृत्ती बंगळुरूमध्ये झाली, पण आझादी कसली व कशापासून, त्याचाही खुलासा व्हायला पाहिजे ना? तुम्हाला देशातील सत्तेविरूद्ध घोषणा करण्याचे स्वातंत्र्य आहे. ते सरकार उलथून टाकण्याचा थेट मतदानाचा मार्गही उपलब्ध आहे. वेगळा विचार व धोरणे घेऊन सत्तांतर करण्याचीही मोकळीक आहे. मग आणखी कुठले स्वातंत्र्य बाकी उरले, ज्याची मागणी चालू आहे? कुठल्या आझादीसाठी घोषणाबाजी चालू आहे? या घोषणाबाजीने इथल्या पुरोगाम्यांना नव्या दमाचा प्रेषित कन्हैयाच्या रूपाने मिळाला होता. काही दिवस गजाआड पडल्यावर जामीन घेऊन सुटलेल्या कन्हैयाने कोणती मुक्ताफळे उधळली होती? काश्मिरात भारतीय सैनिक बलात्कार करतात. तीच त्याला आझादी वाटते काय? त्याला वा तत्सम लोकांना अशारितीने गुन्हे करण्याची आझादी हवी आहे काय? साधारणत: चार वर्षांपूर्वी नेहरू विद्यापीठामध्ये वसतिगृहात एका विद्यार्थिनीला गुंगीचे पेय पाजून बलात्कार करण्यात आला. त्याबद्दल कुठे वाच्यता करू नये म्हणून तिला धमकावण्यात आले. तो बलात्कार करणारा त्याच कन्हैयाच्या विचार व पक्षाचा मोठा युवानेताही होता. मग त्याने कुठले स्वातंत्र्य अनुभवले? विद्यापीठात बलात्कार करण्याला हे लोक आझादी म्हणतात काय? तशी मुभा म्हणजे आझादी असते काय? सैनिकांनी केलेला बलात्कार असतो आणि पुरोगामी विद्यार्थी नेत्याने बलात्कार केल्यास त्याला महिलांचा उद्धार समजण्याला आझादी म्हणतात काय? या आझादीची व्याख्या नेमकी काय आहे? कुठलाही समाज किंवा देश काही श्रद्धा व समजुतीच्या आधारे उभा राहतो किंवा टिकून राहतो. त्या श्रद्धा हाच त्याचा भरभक्कम पाया असतो आणि त्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे त्याचे रक्षण करीत असतात. त्यांच्याशी लढूनच त्या देशाला पादाक्रांत करता येत असते. तेच शक्य नसेल तर सोपा मार्ग त्या देशाचा भरभक्कम पाया असलेल्या समजुती वा श्रद्धा खिळखिळ्या करून टाकण्याचा असतो. ते काम सोपे व किमान धोक्याचे असते. त्याच देशातील बुद्धीवाद, युक्तीवाद यांची हत्यारे बनवून पाया खिळखिळा करून टाकता येतो. तुम्ही कुठल्या तरी अभिमानाच्या आधारे जगत असता. आज मागास पाकिस्तानला जगणे कठीण आहे. मग तिथल्या जनतेला आपली क्रुर सत्ता उलथून पाडणे कशामुळे शक्य झालेले नाही? कुठलाही अन्याय, हिंसा वा हाल सोसून पाकिस्तान कशाला टिकून आहे? त्यामागे धर्माची श्रद्धा कामी येते. उपाशी पोटी त्या धर्मश्रद्धेसाठी तो पाकिस्तानी अन्याय सहन करतो, अर्धपोटी जगतो. धर्माभिमानावर तिथले राज्यकर्ते उपाशी जनतेला खेळवू शकतात. उलट त्यापेक्षा सुखवस्तू असलेल्या भारतात आझादीची भूक काहीजणांना लागलेली आहे. त्या आझादीला हत्यार बनवून लोकांची माथी भडकवली जातात. पोटापाण्यापेक्षा धर्म महत्त्वाचा आणि त्यासाठी उपाशीपोटी राहून धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्राण पाणाला लावून लढले पाहिजे, ही वेगळी श्रद्धा त्या लोकांमध्ये रुजवली जाते. इसिसमध्ये दाखल व्हायला गेलेल्यांना कुठली व कशापासून आझादी हवी होती? त्यांना कुणा मौलवीने चिथावण्या दिल्याचा आरोप निराधार आहे. त्याने भले आगीत तेल ओतले असेल, पण त्याला हवी असलेली आग आझादीच्या घोषणाबाजीने लावलेली असते. एकीकडे अशी आग लावायची आणि दुसरीकडे तशा घोषणा वा कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी अविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार वापरायचा. त्याचा परिणाम काय होतो?
आझादी बोंबलणारे शिरजोर होतात आणि दुसरीकडे त्यामुळे दुखावले जाणार्‍याच्या देशाभिमानाचा पाया खिळखिळा होऊन जातो. अशा देशविरोधी घोषणा वा वक्तव्याला कायदा रोखू शकत नसेल, तर हा कायदा काय कामाचा, असे सामान्य देशप्रेमीलाही वाटू लागते. जो कायदा देशाच्या अभिमानाचे संरक्षण करू शकत नाही, तोच कायदा किंवा व्यवस्था आपले तरी संकटातून रक्षण कसे करील, अशी धारणा त्यातून वाढीस लागते. ही धारणा मग कुठल्याही समाज वा देशाचा भरभक्कम पाया खिळखिळा करून टाकत असते. हे सर्वात सोपे युद्ध असते. ज्यात तुमच्या देशाचे कायदेच शत्रूला संरक्षण देतात आणि त्याची जोपासनाही करतात. कारण अभिमान संपुष्टात आला, मग कशासाठी लढायचे तेच कारण-हेतू निकालात निघालेले असतात. लढणे ही हिंमत व धाडस असते आणि मनोधैर्य खच्ची झालेली माणसे लढू शकत नाहीत. आजकाल देशात अविष्कार स्वातंत्र्य वा आझादीच्या नावाने तेच युद्ध पुकारले गेले आहे. त्यातून लोकांच्या मनातील देशाभिमान, स्वाभिमान याचे खच्चीकरण जोरात चालू आहे. त्यामुळे अमूल्यासारखी मनोवृत्ती नेमकी शोधून त्यावर इलाज केला पाहिजे. ते रोखणे हेच आज महत्त्वाचे आहे. त्याला खतपाणी घालणारे उजळमाथ्याने सध्या फिरत आहेत. त्यांना बुद्धीवादी असे विश्लेषण लावले जाते. मग असे कथित बुद्धीजीवी अमूल्यासारख्या तरुणांना हेरून त्यांना चिथावणी देत असतात. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी अमूल्या एक प्यादे आहे. त्यामागील प्रेरणा आणि बुद्धी कोणत्या बुद्धीजिवीची आहे, हे शोधून काढायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -