घरफिचर्सअजेंडा कोणाचा, गळी कोणाच्या?

अजेंडा कोणाचा, गळी कोणाच्या?

Subscribe

विरोधकांची एकच चूक आहे. त्यांना सौरभ गांगुली व महेंद्रसिंग धोनी यातला फरक ओळखता आलेला नाही. गांगुली तत्काळ प्रतिक्रीया देणारा तर धोनी मनामध्ये चाललेल्या उलघालीचा लवलेशही न दाखवणारा होता. कितीही चिथावण्या मिळाल्या म्हणून प्रतिसाद न देणारा तो धोनी आणि सोळा वर्षात कुठल्याही भयंकर आरोप वा बदनामीला दुर्लक्षित करणारे मोदी; यातले साम्य कोणाला ओळखता आले आहे काय? मोदी हा भारतीय राजकारणातला नवा प्रकार आहे. मनमोहन सिंग, वाजपेयी, अडवाणी, पवार वा देवेगौडा ,नरसिंहराव यांच्याशी तुलना करून त्याला हाताळता येणार नाही.

राफेल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्रत धारण करून कशाला बसलेले आहेत? सगळे विरोधक तोच प्रश्न विचारीत आहेत आणि माध्यमातूनही तोच भडीमार चालू आहे. पण त्याला मोदी अजिबात बधलेले नाहीत. साहाजिकच विरोधकांना अधिकच जोर चढला आहे आणि अधिकाधिक तावातावाने राफेलचा विषय रंगवला जात आहे. यातून मग आरोप खरे असल्याने वा बोलायला काहीच नसल्याने मोदी चिडीचूप बसल्याचा निष्कर्ष काढला जाणे स्वाभाविक आहे. त्यातून मग पुढली पायरी म्हणजे राफेलची खरेदी मोदी सरकारला पराभवाच्या कडेलोटावर घेऊन जाणार, इथपर्यंत मजल गेली तर नवल नाही. एका माणसाला आपल्यावर हे संकट कोसळले असताना गप्प बसणे परवडू शकते का? नसेल तर मोदी गप्प कशाला? त्याचे उत्तर अजेंडा असे आहे. राफेल खरेदीत कुठलाही घोळ नाही की भ्रष्टाचार नाही आणि त्यामुळे आपल्या सरकारला वा लोकप्रियतेला धोका नाही, याची मोदींना पुरेपूर खात्री आहे. तशीच खात्री त्यांना आज नव्हे मागल्या अनेक वर्षापासून आहे. म्हणून २००२ पासून त्यांनी कधीही अशा गदारोळाला वा आरोपबाजीला उत्तर देण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. त्याचे कारण असे, की अजेंडा कोणी ठरवायचा?

सध्या जो धुरळा राहुल गांधींनी उडवला आहे, तो त्यांचा अजेंडा आहे आणि हळुहळू विरोधी पक्षही त्यात ओढले जाऊ लागले आहेत. तो अजेंडा स्वीकारला, मग मोदी विरोधी राजकारणाचे राहुल नेता होऊन जातात. बाकीच्या विरोधकांना तोंडाने त्यांचे नेतृत्व मान्य करायची गरज उरत नाही. आपोआप राहुल विरोधी पक्षाचे नेतेच होऊन जातात. सध्या अनेक चाचण्या आल्या आहेत आणि येतही आहेत. त्यात सगळे राजकारण मोदी व इतर, असेच घुमते आहे. मग त्यात मोदींना पर्याय कोण असे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपोआप राहुल असे येते. दोघांच्या लोकप्रियतेमध्ये वा पाठींब्यामध्ये मोठी तफावत आहे. ४८ विरुद्ध २२ अशी तफावत असली, तरी दुसर्‍या क्रमांकावर राहुल आहेत. तिथेच बाकीच्या विरोधकांची गोची होऊन गेलेली आहे. त्यांनी कितीही राहुलचे नेतृत्व झिडकारले वा नाकारले, तरी देशाच्या कानाकोपर्‍यात काँग्रेस पक्षाचे थोडेतरी अस्तित्व आहे. बाकीच्या कुठल्याही विरोधी पक्षाला एकदोन राज्यापलिकडे स्थान नाही. साहाजिकच स्थानिक मतचाचणीत प्रादेशिक नेता पुढे असतो आणि राष्ट्रीय प्रश्न आला, मग मोदी नको असलेला मतदार राहुलकडे बोट दाखवतो. त्याची गोळाबेरीज २२ टक्क्यांपर्यंत येत असते. कारण राहुलने देशभर गोंधळ घातलेला आहे. त्याला प्रतिसाद म्हणून मते मिळणार नाहीत. पण जनमानसात देशव्यापी विरोधातील नेता कोण, तर राहुल ओळखीचा चेहरा असतो. मोदींनाही तेच हवे आहे. प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रादेशिक नेता बलवान असला, तरी विरोधी नेता मात्र मोदींच्या तुलनेत दुबळा असायला हवा आहे. त्यासाठी मग राहुलचा अजेंडा एकप्रकारे भाजपने स्वीकारलेला आहे. पण मोदींनी नाकारलेला आहे. ही गुंतागुंत समजून घेतली, तर मोदींचे राफेलविषयीचे मौन समजून घेता येईल. राहुलच्या प्रश्नांना उत्तरेही देण्याची गरज नाही. पण भाजपा नेते प्रवक्ते खुलासे करीत असतात. मोदी गप्प बसतात. यातून काय साधले जाते?

- Advertisement -

देशासमोरच राष्ट्रीय प्रश्न कुठला? किंवा कोणते प्रश्न आहेत? तर जे राहुलनी मांडलेत, तेच आहेत. निदान भाजपाला असेच चित्र उभे करायचे आहे. जितका भाजपावाले राहुलचा धिक्कार करतील व टिंगलटवाळी करतील, तितकी राहुलची राष्ट्रीय प्रतिमा उभी रहायला हातभार लागतो. तशी प्रतिमा उभी रहाण्याने भाजपला थेट फायदा नाही. पण राष्ट्रीय पर्याय शोधू बघणार्‍या मतदाराला स्थानिक प्रादेशिक नेता व राहुल यातून निवड करण्यासाठी गोंधळात पाडले जाते. एका चाचणीत तेलंगणामध्ये स्थानिक लोकप्रियता चंद्रशेखर राव यांची आहे. ती भाजप वा मोदींपेक्षा अधिक आहे. पण लोकसभेसाठी प्रश्न विचारला मग मोदी व राहुल असे उत्तर येते. हा फरक महत्वाचा असतो. तोच मग विविध राज्यातील लोकसभेच्या मतदानावर प्रभाव पाडणार असतो. कारण मागल्या व येत्या लोकसभा निवडणुकीत तोच महत्वाचा फरक आहे. तेव्हा मोदी भाजपला जिंकून देतील किंवा नाही, अशा तिढा होता आणि आता मोदी जिंकतील की नाही, असा विरोधकांना पेच आहे. त्यात जिंकायचे असेल तर आपला अजेंडा इतरांच्या गळी मारणे व त्यांना अजेंडा नाकारणे ही रणनिती असते.

विरोधकांची एकच चूक आहे. त्यांना सौरभ गांगुली व महेंद्रसिंग धोनी यातला फरक ओळखता आलेला नाही. गांगुली तत्काळ प्रतिक्रीया देणारा तर धोनी मनामध्ये चाललेल्या उलघालीचा लवलेशही न दाखवणारा होता. कितीही चिथावण्या मिळाल्या म्हणून प्रतिसाद न देणारा तो धोनी आणि सोळा वर्षात कुठल्याही भयंकर आरोप वा बदनामीला दुर्लक्षित करणारे मोदी; यातले साम्य कोणाला ओळखता आले आहे काय? मोदी हा भारतीय राजकारणातला नवा प्रकार आहे. मनमोहन सिंग, वाजपेयी, अडवाणी, पवार वा देवेगौडा ,नरसिंहराव यांच्याशी तुलना करून त्याला हाताळता येणार नाही. या माणसाने राजकारणात आल्यापासून राजकीय वातावरणच बदलून टाकले आहे. निकष व नियम बदलले आहेत. त्याला नव्या पद्धतीने हाताळावे लागेल. त्याच्या चाली ओळखून प्रतिकार करावा लागेल.

- Advertisement -

त्याने २०१४ मध्ये काँग्रेसच्या हातून अजेंडा हिरावून घेतला होता आणि आजही आपलाच अजेंडा इतरांवर लादणे सुरू आहे. पुढल्या निवडणुकीचा अजेंडा मोठमोठ्या जाहिरसभा मेळावे किंवा सोशल माध्यमातील संपर्कातून मांडायला सुरूवातही झाली आहे. पुढल्या तीनचार महिन्यात त्यालाच सामोरे जाण्याची नामुष्की विरोधकांवर येणार आहे. अखेरच्या हातघाईसाठी त्यांनी मागे काही राखून ठेवले नाही, तर धुमश्चक्री होईल तेव्हा कुणाचा खुर्दा उडणार आहे? नोटाबंदी, कुठल्या डायरीतील मोदींचे नाव, जीएसटी. अगदी संसदेतील भूकंप, अशा सर्व धक्क्यांना तोंड देऊन या नेत्याने साडेचार वर्षे सुरळीत घालवली आहेत. त्याला असले फुसके बार उडवून बाद करता येत बसते. आज राफेलच्या खरेदीत अंबानींचे नाव घुसवलेले आहे. गेल्या लोकसभेत असाच हलकल्लोळ अदानींच्या नावाचा करून हाती काय लागले होते? मैदानी फौज कुशलतेने हातळणारा पक्षाध्यक्ष आणि लोकप्रियतेच्या शिखरावर साडेचार वर्षानंतरही असलेला पंतप्रधान; हे मिश्रण असल्या दिवाळीच्या फटाक्यांनी उडवून देता येणार नाही. किंबहुना राहुल विरोधकांच्या माथी मारण्याचा मोदींचा डाव मात्र त्यातून कमालीचा यशस्वी होताना दिसतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -