तेरा मेरा प्यार अमर…

फिल्मी-गैरफिल्मी अशी शेकडो, हजारो, लाखो प्रेमगीतं झाली असतील, पुढल्या काळातही खोर्‍याने होतील, पण का कोण जाणे ‘असली नकली’तल्या ‘तेरा मेरा प्यार अमर...’सारखं प्रेमगीत हे एखादंच!

तेरा मेरा प्यार अमर गीत

हळव्या तारुण्यातल्या अल्लड प्रेमाची एकेक पाकळी उलगडत जाणार्‍या यासारख्या गाण्याच्या प्रेमात पडलेले इतके प्रेमवीर पाहण्यात आहेत की त्यांचं तारूण्य बरीच स्टेशनं मागे पडलं तरी या गाण्यावरचं त्यांचं प्रेम अजूनही तसंंच आणि तितकंच अबाधित राहिलं आहे. आता प्रणय या विषयातली तशीच काही तज्ज्ञ गुलगुलाबी मंडळी म्हणतात की त्या काळातली पडद्यावरच्या आणि पडद्याबाहेरच्याही प्रणयाची पध्दतही तशीच कुसूम कोमल आणि मुग्धमधुर होती म्हणून त्यावेळची प्रेमगीतंही तशीच कळ्याफुलांसारखी नाजूकसाजूक झाली; पण या म्हणण्याला खरंच काही अर्थ आहे का हो?…कारण पाडगावकर तर कधीचे म्हणून गेले आहेत की ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आणि आमचं सेम असतं…’आणि वादापुरता मान्य केलं की आजच्या अत्याधुनिक युगात प्रेम या भावनेच्या अभिव्यक्तीत इकडेतिकडे कणभर बदल झालेला असला तरी प्रेम नावाच्या भावनेत कसा काय बदल होईल! प्रेम प्रेमासारखंच राहील…आणि ते तसंच अस्सल, आरस्पानी राहील तोपर्यंत ‘तेरा मेरा प्यार अमर…’सारखं गाणंही अमर राहील, चिरंतन राहील!

‘तेरा मेरा प्यार अमर…’ हे गाणं तसं म्हटलं तर कृष्णधवल जमान्यातलं. लता मंगेशकरांनी त्या गाण्यातला पहिला शब्द उच्चारण्याच्या आधीपासूनच गाणं आपल्या मनात एक रोमँटिक भोवताल निर्माण करतं ते गाणं संपेपर्यंत त्या गाण्यातला तो भोवताल तसूभरही ओसरू देत नाही. शंकर-जयकिशनच्या संगीतातल्या त्या किमयेला त्या ठिकाणी तर कडक सलाम ठोकावा लागेल! ह्यातले व्हायोलिन्सचे सूर तर अक्षरश: नादावून टाकणारे, पार आतला तळ ढवळून टाकणारे…‘क्या कहाँ है चांद ने, जिस को सुन के चांंदनी, हर लहर पे झुम के, क्यूं ये नाचने लगी…’ हा गीत कवितेतला बादशहा म्हणून नावाजल्या गेलेल्या शैलेंद्रजींनी लिहिलेला या गाण्यातला पहिलावहिला अंतरा, तोही इतका उत्कट की तसेच उत्कट आणि मनमोहक सूर शैलेंद्रजींच्या त्या शब्दाभोवती गुंफले गेलेत.

शैलेंद्र या गाण्यात एके ठिकाणी लिहिता लिहिता लिहून गेलेत की ‘चलती हूं मैं तारों पर, फिर क्यूं मुझ को लगता हैं डर…’ किती गोड ओळी लिहून गेले आहेत. शैलेंद्र प्रेमात पडलेल्या कुणाला तरी सगळ्या ठिकाणी प्रेम आणि प्रेम दिसत रहातं तेव्हा काय वाटतं ते! ते विशिष्ट शब्द गाताना लता मंगेशकरांच्या आवाजातला तो नवथर भावही केवळ लाजवाब! बरं, गाण्याची सांगता करताना वाजलेले सूरही मनात आइसक्रीमसारखे विरघळत जाणारे आणि मोगर्‍यासारखे कानामनात दरवळत राहणारे…

..म्हणूनच आधी म्हटल्याप्रमाणे प्रेमगीतं लाखो होतील. पण ‘तेरा मेरा प्यार अमर लाखात एक..’अगदी कुणाकुणाच्या अमरप्रेमासारखं खरोखरीचं अमर!!