घरलाईफस्टाईलबालपणीचा काळ.....

बालपणीचा काळ…..

Subscribe

बालपणीचा काळ सुखाचा ...आठवणीतच सतत असावा....आयुष्याच्या उतरणीला...सोबतीला बालमित्रमैत्रिणींचा हात हाती असावा. अगदी असंच काहीसं घडलं माझ्याबाबतीत.

मी मृदुला वर्दम, पूर्वाश्रमीची नयना पिळणकर. विक्रोळीला कन्नमवार नगरात बालपण गेले. कामगार वर्ग या वसाहतीतच १४८ मध्ये भरणारी आमची शाळा हो…माध्यमिक विद्यालय, शाळा अगदी बिल्डिंगच्या तळमजल्यावर भरणारी, आठवर्ग समोरच्याच बिल्डिंगमध्ये, तर चार वर्ग १५५ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर. पण त्या शाळेतील आनंद, मजा आजही ३६ वर्षांनंतर डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे उभी राहते. त्याला कारणच तसं आहे. आमची शाळा छोटी असली तरी येथील शिक्षकांची मने इतकी मोठी की शाळेतील प्रत्येक मूल जणू त्याचं स्वत:चं मूल आहे.

पालकांनी नुसते शिकवण्यासाठी त्याच्या हातात सोपवलं नव्हतं तर मुलांचे भवितव्यच जणू त्यांना घडवायचं होतं. त्यासाठीची धडपड, प्रयत्न म्हणजे शाळेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आज डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी.ए., शिक्षक, लेखक, गायक अशा क्षेत्रात प्रगती पथावर आहेत. याचे सर्व श्रेय प्रिन्सिपॉल प्रभूसर…तावडेसर… मराठी विषय शिकवण्यात हातोटी असणारे पाठकसर..तावडेसर…इंग्रजी सोपं करून शिकवणारे गायवल सर…इंग्रजीबरोबर..गाणंही शिकवावं तर त्यांनीच…परबसर नसते तर गणित अवघडच. पाटील सर …नाईकसर दोघे दोघे…म्हणजे एकाच आडनावाचे दोन दोन शिक्षक मग त्यांना नावदेखील …छोटे पाटीलसर…मोठे नाईक सर… प्रभू मॅडम…दोघी बहिणी…चेहर्‍यावरून खूप कडक शिस्तीच्या वाटणार्‍या….पण तितक्याच प्रेमळ.. जोशी मॅडम हिंदीत मास्टर …त्याचबरोबर गाईड शिक्षिका अशा दोन्ही भूमिकेत…त्यांनी शिकवलेल्या नॉट आजही मारू शकतो इतक्या पक्क्या….हस्तकला मोरे बाई…मोठं कुंकू गोर्‍यापान चेहर्‍यावर खुलून दिसायचं…. कागदाच्या घडीतून अनेक चमत्कार हसत हसत घडवायच्या….आता त्या या जगात नाहीत…कदमबाई…परबबाई..चौधरीसर…जगतापसर..भाटावडेकर..झळकीकरबाई..संस्कृतचं देवचं टेबल काय विसराल. आजही खणखणीत आवाजात गाणं म्हणतात. तेव्हा भले भले गायकही लाजतील त्याच्यापुढे असा आवाज…अशा अनेक शिक्षकांनी घडवलेली आमची १० वीची १९८१ बॅच शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडली. त्यानंतर सगळे आपापल्या विश्वात रममाण झाले. अचानक ३५ वर्षांनंतर नंदिनी, कुंदा यांना कल्पना सुचली. आपण भेटू. विक्रोळीतील मुली एकत्र आल्या. सुगंधा प्रभूच्या घरी भेटल्या. त्यानतंर भारतीने माझा नंबर दिला. फोन व्हॉटस्अ‍ॅप चालू होतं.

- Advertisement -

नंदिनी माझी एकाच बाकावर बसणारी मैत्रीण. हिच्यावर पती निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला.तिला भेटायला गेलो.त्यानंतर मुलींना म्हटलं नंदिनीला यातून बाहेर काढूया. मुलांना शोधू …शोध सुरू झाला. एक एक गडी सापडत गेला. ४० जणांना शोधण्यात यश आलं. भेटीचा बेत ठरला. २४ डिसेंबरला ठाण्यात भेटलो. काही चेहरे ओळखीचे. काही अनोळखी. प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. गप्पा, नाश्ता, केकही कापला. कारण सर्वांनी ५० शी पार केली होती.नंतर वाढदिवसाच्या निमित्ताने भेटत राहिलो. कधी येऊर, ठाण्यातील नवीन नवीन हॉटेल, जणू धमाल सुरू झाली. गेल्यावर्षी फेब्रुवारीत सुशील जाधवच्या रिसोर्टवर धमाल करून आलो ..तर यावर्षी अतुलच्या अलिबागच्या घरी जाऊन आलो…वर्षाने तर विविध खेळ घेऊन सगळ्यांना परत लहान करून सोडले. छाया तेरसे कंबरेचे मोठे ऑपरेशन होऊनही सहलीला आली व बक्षीसही मिळवले.

म्हाडाची नोकरी सांभाळून शेतकरी म्हणून उदयास येणारा आमचा मित्र चक्क संगमेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पिकवतो. त्याच्या शेतातून आणलेलं कलिंगड म्हणजे साखरपेरणीच. आमच्या या ८१च्या बॅचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्याबरोबर पहिली ते चौथी, सातवीपर्यंत असलेली व नंतर दुसर्‍या शाळेत गेलेले आमचे मित्र सामील झालेत. त्यात सुशील..समीर ..अभिजीत…संदीपसारखे मित्र संदीप तांडेल..याला तर माध्यमिकबद्दल इतकी आत्मियता की त्याने चक्क १९७५ ते २००० सालापर्यंतच्या मुलांना शिक्षकांना एकत्र घेऊन स्नेहसंमेलन करायचे ठरवले. शाळेतील १९८३ च्या बॅचच्या विजय तेरसेने कार्यक्रमाची पूर्ण धुरा सांभाळली व १ ऑक्टोबरला माध्यमिकच्या शाळेच्या हॉलमध्ये स्नेहसंमेलनासाठी मुलेमुली जमले. शाळेच्या शिपायाने घंटा वाजवली व प्रार्थनेने कार्यक्रमास सुरूवात झाली.अनेक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात तर आमची ८१ची बॅच परत एकदा लहान झाली व महाराष्ट्रची लोकधारा सादर केली.

- Advertisement -

स्त्री भ्रूणहत्येवर विद्या डिचोलकरने बसवलेले नाटक, योग्य संदेश देऊन गेलं. शाळेच्या मित्रमैत्रिणींसमोर सादरीकरण करून ३५ वर्षांपूर्वीच्या संमेलनात रमलो. विशेष म्हणजे शिक्षकही भेटले. सर्व गुरूजनांचे आशीर्वाद लाभले. शाळेतील इतर बँचच्या मित्रमैत्रणीना भेटलो.आत्ता आम्ही भेटतोच, विधायक कार्यही करतो. मित्रमैत्रिणींची दु:ख स्वत:ची समजून मदतीला धावून जातो..त्याचे समाधान तर आहेच..पण शिक्षकांच्या संस्कारांमुळेच हे शक्य झाले.आमच्या बॅचचा सर्वात सहनशील व्यक्ती कोणी असेल तर तो म्हणजे दिनेश साईल..शाळेत असताना शेजारच्या बिल्डिंगीत असूनही न बोलणारे आम्ही आज जीवाभावाचे मित्रमैत्रिणी झालो आहोत …..मी चिडल्यावर शांतपणे सगळे सांभाळण्याचे काम दिनेशचेच…

आमच्या बॅचचा क्रिकेटियर….प्रवीण वाळके आजही लहान होऊन सहलीचा आनंद द्विगुणित करतो. मास्टर माईंड सुनिल शहा व जयश्री पोफळे छोट्या छोट्या आठवणींचा खजिनाच घेऊन फिरतात. मनिषा प्रत्येक भेटीच्या वेळी स्वत:च्या हातची एखादी डिश खिलवतेच. गुडघेदुखीचा सामना करत मंगल सहभागी होते. ऑॅफीस घर तारेवरची कसरत करत येणार्‍या मेधा…रागिणी खरंच ग्रेट. नंदा..प्रतिभा..सुनंदा..सुगंधा ..हेमा..महेश..किशोर..सुहास…अजय..सुदेश हेही जमेल तशी हजेरी लावतात. तर भारती सावंत पतीचे आजारपण, मुलांचे शिक्षण सांभाळत, सहभागी होण्याचा प्रयत्न करते. अशा एक ना अनेक, मित्रमैत्रिणी आता निमित्त शोधून भेटतो. भेटीचा आनंद द्विगुणित तर करतो, सुखावतोही.

— मृदुला वर्दम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -