घरदीपोत्सवमहागाईला नाही तोड, पण दिवाळी तर झाली पाहिजे गोड!

महागाईला नाही तोड, पण दिवाळी तर झाली पाहिजे गोड!

Subscribe

दिवाळी ही फटाके, रांगोळी, आकाश कंदीलासोबतच फराळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खुसखुशीत चकली, खमंग चिवडा आणि लाडू, करंजी आणि जिभेला सुखद चव देणारे अनारसे… दिवाळीमध्ये या सर्व पदार्थांची लज्जत जरा वेगळीच असते. आता आठवड्यावर येऊ ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त अशा विविध पदार्थांच्या खरेदीसाठी बाजरपेठा गजबजल्या आहेत. मात्र यंदा या फराळाला महागाईची फोडणी बसली आहे. या फराळाच्या किमती तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही दिवाळीचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही, त्यामुळे ही दिवाळी गोडच केली जाणार आहे.
अलीकडे रेडिमेड फराळ घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. रेडिमेड घरगुती फराळाची मागणी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढलेलीच आहे. त्यामुळे स्वीट मार्टस, महिला बचत गट आणि गृहउद्योग कंबर कसून कामाला लागले आहेत. दादर, परळ, लालबाग, वडाळा, गिरगाव, ठाण्यातील प्रसिद्ध फराळाच्या दुकानांत दिवाळीच्या फराळाची लगबग सुरू आहे. अनेक दुकानांमध्ये मिठाईसह चकली, करंजी, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनारसे दिसू लागले आहेत.

फराळविक्रीचे बदललेले स्वरुप

यापूर्वी घराघरांत दिवाळीचा फराळ बनवला जात असे. नंतर-नंतर नोकरदार स्त्रिया फराळातील पटकन होणारे काही मोजके पदार्थ बनवत होत्या, तर काही तयार पदार्थ बाहेरून घेतले जात होते. पण आता शहरी भागांतील अनेक कुटुंबांत सर्वच फराळ तयार घेतला जातो. त्यातही लक्ष्मीपूजनानिमित्त चकली, करंजी, रवा लाडू आणि अनारसे यांना सर्वाधिक मागणी आहे. फराळ ऑनलाइन ऑर्डर करण्याचा ट्रेन्ड मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यात व्हॉटस्अॅपसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मसवरून ऑर्डर घेतल्या जात आहेत. फराळाचे फोटो, रिव्ह्यू पाहून बुकिंग केले जात आहे. अनेक विक्रेते घरपोच फराळ देत असल्याने नोकरदार महिलांना सोयीचे जात आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन पदधतीबरोबरच दादर, शिवडी, गिरगावमधील काही नागरिक स्वत: दुकानात येऊन फराळ टेस्ट करून तो खरेदी करताना दिसत आहेत. मात्र मोठ्या फराळ विक्रेत्यांच्या तुलनात महिला बचत गट, गृहउद्योगांच्या फराळाच्या किमती कमी आहेत. मात्र पॅकिंगच्या पद्धतीत फरक दिसतोय.

- Advertisement -

पण एकूणच ऑनलाइन रेडिमेड फराळाचे मार्केट विस्तारत आहे. यात परदेशात राहणाऱ्या मराठीबरोबरच अमराठी कुटुंबीय देखील दिवाळी फराळास पसंती देत आहे. हे पदार्थ परदेशातील मुले आवडीने खात आहेत. यामुळे फराळ विक्रेत्यांचा व्यवसाय आणि संस्कृती अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्येही वेगाने पसरत आहे.

फराळातील नव्या टेस्ट

यापूर्वी फराळात चकली, करंजी, शंकरपाळे, लाडू, चिवडा असे काही मोजकेच पदार्थ घरी बनवले जायचे. मात्र आता बाजारात फराळांमध्येही नव्या टेस्ट, नवे प्रकार पाहायला मिळत आहेत. यात अनारसे, सँडविच.. खारे.. बेक्ड गोड.. क्रिस्पी शंकरपाळे, कडबोळी, कांदा चिवडा, ओल्या नारळाची करंजी, नानखटाई, चिरोटे, बालुशाही, मुग लाडू हे पदार्थ पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

शुगर फ्री फराळाचाही ट्रेण्ड

शुगर फ्री, डाएट फराळालाही काही नागरिक पसंती देत आहेत. वाढत्या मधुमेहींचे प्रमाण लक्षात घेता शुगर फ्री करंजी, बेक्ड करंजी, गुळ मेथीचे लाडू, डाएट चिवडा, ऑइल फ्री चकल्या असा फराळही लोकप्रिय होत आहे. या फराळासोबतच नातेवाईकांना ड्रायफ्रुट्स आणि लहान मुलांना फटाक्याच्या डिझाईन्सचे चॉकलेट्स देण्याची नवी प्रथा रुढ होत आहे. विविध आकर्षक बॉक्समध्ये हे डायफ्रुट्स, चॉकलेट विकले जात आहेत. दिवाळीच्या बदलत्या उत्साहात पारंपरिक फराळाची जागा या पदार्थांनी काही प्रमाणात घेतली आहे.

फराळातून जपल्या जातायत भावना

वाढत्या महागाईतही ग्राहकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून विक्रेत्यांनी यंदा फराळाचे दर परवडतील असे ठेवले आहेत. परदेशातील त्यांचे नातेवाईक हे पदार्थ आवडीने मागवत आहेत. व्यवसाय जरी असला तरी, या फराळातून आम्ही भावना, प्रेम परदेशातील नातेवाईकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
– अभिजीत जोशी, फॅमिली स्टोअर्स, दादर

घरगुती फराळांस पसंती 

कोरोनानंतर यंदा दिवाळीनिमित्त फराळ घेणाऱ्यांची संख्या वाढतेय. विशेषत: मेथी, डिंकाचे लाडूंना पहिली पसंती आहे. मात्र ऑनलाइन फराळविक्रीमुळे महिला बचत गट किंवा छोट्या गृहउद्योगांच्या पारंपरिक फराळविक्रीस काही प्रमाणात फटका बसतोय. असे असले तरी, काही नागरिकांना आमच्याकडील पदार्थांची चव पसंत असल्याने ते आमच्याकडूच फराळ घेतात.
– सरिता तांबडे, सरिता गृहउद्योग, ठाणे

फराळाचे दर 

भाजणी चकली – ३६० ते ५०० रु. (कि)
करंजी – १८ ते २५ रु. (प्रति नग)
रवा लाडू – १५ ते २८ रु. (प्रति नग)
बेसन लाडू – १५ ते २५ रु. (प्रति नग)
शंकरपाळे – २७० ते ३६० रु. (कि)
पोहा चिवडा – ३२० ते ४०० रु. (कि)
मका चिवडा – ३२० ते ३८० रु. (कि)
अनारसे – १८ ते २५ रु. (नग)
नानखटाई (केशर \ वेलची) – ३२५ (कि)


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -