घरलाईफस्टाईल‘स्वाईन फ्लूपासून बचाव’

‘स्वाईन फ्लूपासून बचाव’

Subscribe

स्वाईन फ्लू हा एक विषाणूंपासून (एच -1, एन-1) होणारा व झपाट्याने पसरणारा आजार आहे. या आजाराच्या विषाणूंचा प्रसार हा हवेतून होतो. सध्या या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते. तथापि वेळेत उपचार सुरू करून संपूर्ण उपचार पूर्ण केले तर हा आजार गंभीर स्वरुप घेत नाही. या बाबींचा विचार करता स्वाईन फ्लू या आजाराविषयी प्रत्येकास प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे.

ज्याप्रमाणे सर्दी होते तसाच स्वाईन फ्लू स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने होतो. अशा रुग्णांच्या शिंकण्यातून, खोकल्यातून या विषाणूंचा हवेमार्फत तसेच आजूबाजूच्या वस्तुंच्या प्रत्यक्ष संपर्कातून प्रसार होतो. स्वाईन फ्लूची लक्षणे सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरपासून ते लक्षणे सुरू झााल्यानंतर सात दिवसांपर्यंत रुग्णाकडून या विषाणुचा प्रसार सुरू असतो.

स्वाईन फ्लूची लक्षणे –

* खोकला* ताप* घसादुखी* नाक चोंदणे+नाकातून स्त्राव* अंगदुखी* डोकेदुखी
* थंडी वाजणे* अशक्तपणा इ. ही सुरुवातीची लक्षणे आहेत.

- Advertisement -

उच्च रक्तदाब असणार्‍या व्यक्ती, मधुमेह ग्रस्त व्यक्ती, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती तसेच गरोदर महिलांना या आजाराची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा जोखमीच्या व्यक्तींना स्वाईन फ्लूची लस टोचण्यात येते. शासकीय दवाखान्यातून ही लस त्यांनी टोचून घेतली पाहिजे.

गंभीर स्वरुपाचा स्वाईन फ्लू रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना रुग्णालयात घेण्यात येतो व त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. यासाठी आपल्या राज्यात ठिकठिकाणी शासकीय तसेच काही खासगी प्रयोगशाळेत ही तपासणी करण्यात येते.
इन्फ्लुएंझा उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा असणार्‍या खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्लू उपचाराची मान्यता आहे.

- Advertisement -

स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी

*वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत* पौष्टिक आहार घ्यावा* लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा* धुम्रपान करू नये* पुरेशी झोप/ विश्रांती घ्यावी* भरपूर पाणी प्यावे * सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये * आपल्याला फ्लूसदृश लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये *तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत *शिंकताना तसेच खोकताना तोंडावर घडीचा रुमाल वापरावा.

स्वाईन फ्लू रुग्णाची घरीच काळजी घेताना

*घर मोठे असेल तर रूग्णाकरिता स्वतंत्र वेगळी खोली निश्चित करावी.
*रूग्णाने उपचार पूर्ण होईपर्यंत इतर कुटुंबीय, पाहुणे यांच्यात मिसळणे टाळावे.
*रुग्णाने तोंडावर साधा रुमाल बांधावा.
*रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी.
*घरात कोणी अतिजोखमीचे असतील ; बालके, वृद्ध, मधुमेही, उच्च रक्तदाब असलेले, कॅन्सर, किडनी- फुफ्फुसे- यकृताचे आजार असलेले, दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणार्‍या व्यक्ती, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती व चेतासंस्थेचे आजार असणार्‍या व्यक्तींच्या निकट सहवासात रुग्णाने जाऊ नये.
*घरात ब्लीच द्रावण करून त्याने रुग्णाचा स्पर्श झाालेले टेबल, खुर्ची, फर्निचर, सर्व वस्तू पुसाव्यात.
*रुग्णाने वापरलेले टिशू पेपर, मास्क इतरस्त्र: टाकू नयेत.
*रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात ठेवून नंतर स्वच्छ धुवावेत.
*रुग्णाचे अंथरुण, पांघरुण, टॉवेल, कपडे हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
*रुग्णास भरपूर विश्रांती, पुरेसे द्रव पदार्थ द्यावेत.
*रुग्णाने धुम्रपान करू नये.
*डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत.
* दिवसातून किमान दोनवेळा कोमट पाण्यात मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्यात. पाण्याची वाफ घ्यावी.
* रुग्णास घरी उपचार करत असताना धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड, खाण्यास नकार, उलट्या आदी लक्षणे दिसल्याने तत्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक असते.

शाळा व शैक्षणिक संस्था या ठिकाणी स्वाईन फ्लूचा प्रसार झपाटयाने होत असतो. म्हणून ही बाब टाळण्यासाठी सर्व वर्ग शिक्षकांनी वर्ग सुरू करण्यापूर्वी वर्गातील कोणी विद्यार्थी फ्लूच्या लक्षणांनी ग्रस्त आहे काय याची पाहणी व विचारणा करावी. असल्यास अशा विद्यार्थ्यांना सात दिवस घरी राहण्याचा व जनसंपर्क टाळण्याचा सल्ला द्यावा. स्वाईन फ्लू (एच-1,एन-1) प्रसार थांबविण्यासाठी ‘काय करावे, काय करु नये’ याबाबतची माहिती महत्वाचे ठिकाणी, नोटीसबोर्डवर लावावी, सर्व वर्गात वाचून दाखवावी तसेच याबाबतची हस्तपत्रके विद्यार्थ्यांना द्यावीत.अशा प्रकारे काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूवर नक्कीच नियंत्रण आणता येईल यात शंका नाही.

-डॉ. के. आर. खरात (एम.डी, डी.पी.एच)
सहायक संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -