घरलाईफस्टाईलक्रिकेट खेळताना हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ

क्रिकेट खेळताना हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ

Subscribe

तरुणांमध्ये खेळताना किंवा व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.

राजकारण -सिनेमा आणि क्रिकेट हे भारतीयांचे सर्वात आवडते विषय. चार माणसे एकत्र जमली की यापैकी कोणत्या तरी एका विषयावर गप्पांची छान मैफल रंगते. आपल्या कामाच्या अथवा व्यवसायाच्या व्यापामुळे राजकारण आणि सिनेमा या क्षेत्रात तसे उतरणे फार कठीण असते. पण, क्रिकेट खेळायला ना वयाचे बंधन असते ना वेळेचे. नेरुळ नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने रविवारी डॉक्टरांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये नवी मुंबई आणि मुंबईतील १५० डॉक्टरांनी भाग घेतला होता. क्रिकेट अथवा इतर कोणतेही स्पर्धात्मक खेळ खेळतांना वैद्यकीय प्रशिक्षक/निरीक्षक अथवा डॉक्टर असावा याबाबत तेरणा हॉस्पिटलने यावेळी जनजागृती केली. आजमितीला मुंबईसह नवी मुंबई, ठाणे पालघर या लगतच्या शहरांमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी अनेक सामने तसेच स्पर्धा भरवल्या जातात.

हे वाचा – क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं खेळाडूचा मृत्यू

वयाच्या १५ व्या वर्षांपासून ते पन्नाशी पार केलेल्या नागरिकांचा यात थेट सहभाग असतो. त्यातच आता सीएम चषकाची भर पडली असून अनेक तरुण खेळाडू याकडे आकर्षिले जातात. क्रिकेट हा तसा कमी दुखापती करणारा खेळ असला तरीही गेल्या २ ते ३ वर्षांमध्ये क्रिकेट खेळत असताना अनेक तरुणांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ (एमडी -डीएम ) डॉ महेश घोगरे म्हणाले, “तिशीच्या तरुणांमध्ये हृदयविकार वाढत असून त्यामागची कारणे ही आजच्या विसंगत जीवनशैलीमध्ये सापडतात. मुखत्वे खाण्याच्या, झोपण्याच्या वेळेत झालेला कमालीचा बदल शारीरिक आणि मानसिक ताणतणाव वाढण्यास कारणीभूत ठरतो. बदलेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब शरीरात शिरल्यावर हृदयविकार होण्याचा धोका अधिक वाढतो. जेंव्हा मैदानात खेळ सुरु असताना तेथील स्पर्धेच्या वातावरणामुळे शरीरातील रक्तदाब हा वाढलेला असतो. अशा वेळी ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्या खेळाडूचे हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात अशावेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे असते परंतु अनेक वेळा मैदानात उपचार अथवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे हृदयाचा जास्त भाग रक्ताअभावी आपले काम थांबवू शकतो. त्याचा परिणाम हार्ट अटॅक अथवा पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.”

हेही वाचा – सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

- Advertisement -

हृदय विकाराचा झटका येण्याची लक्षणं म्हणजे छातीत जडपणा, अस्वस्थ जाणवणे यामध्ये कधी-कधी छातीत जळजळ देखील होते. क्रिकेट खेळताना अनेक वेळा अस्वस्थ वाटल्यामुळे त्या खेळाडूला सावलीत बसण्यास सांगितले जाते. अथवा थंड पेये दिली जातात, असे न करता जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनेकवेळा कोणताही सराव न करता अनेक जण क्रिकेट खेळण्यास येतात हे सुद्धा शारीरिक तणाव वाढण्याचे म्हणजेच रक्तदाब वाढण्याचे कारण ठरू शकते, असे ही डॉ महेश घोगरे सांगतात.

हृदयाला झोपही महत्त्वाची

दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते हीच विश्रांती झोपेच्या माध्यमातून मिळत असते. म्हणजेच शरीर आरोग्यदायी ठेवण्यात झोपेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असते; पण काही लोक रोज प्रमाणापेक्षा जास्त, तर काही जण कमी झोप घेत असतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. रोज सात तासांपेक्षा कमी अथवा जास्त झोपेचा थेट संबंध हृदयाच्या तारुण्याशी येतो. जी तरुण मंडळी रोज सात तासांपेक्षा कमी झोप घेते त्यांचे हृदय वृद्धत्वाकडे जात असल्याचे अमेरिकेतील जॉर्जियामधील ‘इमोरी युनिव्हर्सिटी’तील संशोधनात दिसून आले आहे. सततचा मानसिक ताणतणाव, बिघडलेली आर्थिक गणिते, नात्यांमधील दुरावा आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुण पिढी पाहता भविष्यात हृदयविकार वाढण्याची शक्यता असून रोजच्या जीवनशैलीमध्ये तात्काळ बदल करणे गरजेचे आहे, असा सल्ला देखील डॉक्टर देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -