घरलाईफस्टाईलपावसाळ्यात होणाऱ्या 'या' आजारांना ठेवा दूर

पावसाळ्यात होणाऱ्या ‘या’ आजारांना ठेवा दूर

Subscribe

आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ झालेल्या वातावरणामुळे आणि प्रतिबंधक उपाययोजना न केल्यामुळे विविध आजाराचे प्रमाण वाढते.

पावसाळा या ऋतूमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ झालेल्या वातावरणामुळे आणि प्रतिबंधक उपाययोजना न केल्यामुळे विविध आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे लवकर निदान आणि उपचार केल्यास हे आजार दूर ठेवता येतात. पावसाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या आजारांची घ्या अशी काळजी घेता येईल.

डेंग्यु

डेंग्यूची जगभरात अनेक ठिकाणी साथ असते. हा आजार डास चावल्याने फ्लूसारखा आजार होतो. स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, शरीरावर पुरळ उठणे, निघून जाणे, पुन्हा उठणे, खूप ताप, डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, उलट्या आणि मळमळ ही डेंग्यूची लक्षणे आहेत. या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या एईडिस डासांची वाढ स्वच्छ, साचलेल्या पाण्यात होते. त्यामुळे बादल्या आणि पाण्याच्या पिंपांच्या झाकणावर पाणी साचणार नाही याची खातरजमा करून झाडे लावलेल्या कुंड्यांच्या खाली साचणारे अतिरिक्त पाणी काढून टाका.

- Advertisement -

मलेरिया

हा परजीवीमुळे होणारा विकार असून हा आजार मच्छर चावल्याणे होतो. ताप, हुडहुडी भरणे, डोकेदुखी, मळमळ व उलट्या, स्नायूमध्ये वेदना व थकवा, घाम येणे, छातीत किंवा पोटात दुखणे आणि खोकला येणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी डासांची वाढ होऊ नये यासाठी सांड पाणी साचू देऊ नये आणि पूर्ण कपडे परिधान केल्याशिवाय बाहेर पडू नये.

- Advertisement -

चिकनगुनिया

हा विषाणू डासांमार्फत फैलावतो. हा संसर्गजन्य रोग नसून विषाणू असलेला डास चावल्याच्या ३-७ दिवसांनंतर या रोगाची लक्षणे दिसू लागतात. ताप व सांधेदुखी ही या रोगाची सामान्यपणे दिसून येणारी लक्षणे आहेत. तसेच डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, सांध्यांना सूज येणे किंवा पुरळ उठणे हीसुद्धा लक्षणे दिसून येतात. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पूर्ण कपडे घाला. वातानुकूलित यंत्रणा किंवा खिडक्यांना जाळ्या नसलेल्या ठिकाणी तुम्ही असाल तर मच्छरदाणी वापरावी.

कावीळ

या आजारात त्वचेला पिवळी झाक येते, डोळ्यांमध्ये पिवळसरपणा दिसतो आणि मूत्रसुद्धा पिवळे असते. यकृताला सूज आली किंवा पित्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास कावीळ होते. सकस व संतुलित आहार घेऊन या आजाराला प्रतिबंध करता येईल.

गॅस्ट्रोएन्टरायटिस

या आजारात आतड्यांना सूज येते. त्यामुळे अतिसार आणि उलट्या होतात. पावसाळ्यात गॅस्ट्रोएन्टरायटिस आणि अन्नातून विषबाधा होणे मोठ्या प्रमाणावर आढळते. अचानक जुलाब सुरू होणे, अशक्त वाटणे, उलट्या होणे, हलका ताप येणे, भूक मंदावणे, पोट बिघडणे, हातापायांत वेदना होणे आणि डोकेदुखी ही या आजाराची लक्षणे आहेत. याला प्रतिबंध करण्यासाठी सकस आहार घ्या ज्यात दही आणि केळे व सफरचंदासारख्या फळांचा समावेश असेल. सॅलड खाणे टाळा. रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा.

कॉलरा

हा संसर्गजन्य रोग आहे. यात जुलाब होतात आणि डिहायड्रेशन होते. वेळीच उपचार न केल्यास हा आजार जीवावर बेतू शकतो. व्हायब्रो कॉलरे हा जीवाणू असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे हा आजार होतो. डिहायड्रेशन झाल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढून रक्तदाब कमी होतो. तहान लागते आणि स्नायूंमध्ये गोळे येतात. याला रोकण्यास उकळलले पाणी प्या, दूषित पाणी टाळा आणि हाताची आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली स्वच्छता राखा.

टायफॉइड

या आजारात खूप ताप येतो, अतिसार होतो आणि उलट्या होतात. दूषित रक्त आणि पाण्यावाटे या आजाराचे संक्रमण होते. ज्या ठिकाणी हात धुण्याची सवय नसते त्या ठिकाणी या आजाराचे प्रमाण अधिक असते. अशक्तपणा, पोटात वेदना होणे, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखी ही टायफॉइडची लक्षणे आहेत. शुद्ध पाणी पिऊन, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखा आणि हात नियमितपणे धुवून स्वच्छ ठेऊन या आजारांना प्रतिबंध करता येईल.

(डॉ. प्रशांत बोराडे, क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -