घरमहाराष्ट्रभिवंडीत विविध मतदार केंद्रावर बंद पडले ६६ ईव्हीएम मशीन

भिवंडीत विविध मतदार केंद्रावर बंद पडले ६६ ईव्हीएम मशीन

Subscribe

भिवंडीत सतराव्या लोकसभेसाठी उन्हाच्या तीव्र झळांमध्ये सुमारे ५२ टक्के मतदान झाले. दरम्यान, विविध मतदान केंद्रांवर ६६ विविध मशीन बंद पडले.

सतराव्या लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी गेल्या महिनाभरपासून सुरु होती. सोमवारी या निवडणूकीसाठी शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. भिवंडी लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, शहापूर, मुरबाड, कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदार संघात सांयकाळी उशिरापर्यंत ९ लाख ६६ हजार २९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुमारे ५२% टक्के मतदान झाले आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला संथगतीने सुरुवात झाली. यावेळच्या निवडणूकीत मतदान यंत्रासोबतच मतचिन्ह दर्शविणारे यंत्र (व्हीव्हीपॅट) असल्यामुळे मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. या यंत्रामध्ये आपण कोणाला मतदान करतो हे उमेदवाराच्या नाव आणि चिन्हासह दिसत होते. त्यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले. मात्र सहा विधानसभा क्षेत्रात १५ बॅलेट मशीन, १७ कंट्रोलमशीन, ३३ मतचिन्ह दर्शविणारी मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या. मात्र मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानूसार राखीव ठेवण्यात आलेल्या मशीन लावून मतदान पुन्हा सुरळीत सुरु करण्यात आले.

- Advertisement -

भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार खासदार कपिल पाटील, कॉग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे, वंचित आघाडीचे डॉ.अरुण सावंत, सपा-बसपा पार्टीचे डॉ. नुरुद्दीन अंसारी यांच्यासह १५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. गुरूवार (ता.२३ मे) रोजी मौजे भावाळे येथील प्रेसिडेन्सी हायस्कुलमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन वंचित आघाडी सह विविध अपक्ष उमेदवारांमध्ये निवडणूक निकालाविषयी कमालीची उत्सुकता आहे. भिवंडी लोकसभा निवडणूकीसाठी संथ गतीने सुरु झालेल्या मतदानात उन्हाच्या तीव्रतेची झळ आडकाठी ठरत होती. या निवडणूकीसाठी ७ लाख ८ हजार ७७१ पुरुष तर ४ लाख १६ हजार ५१० महिलांनी तसेच १३ तृतीय पंथीयांनी असे एकूण ९ लाख ६६ हजार २९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सुमारे ५२ . ४३ टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रे सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानासाठी लोकसभा क्षेत्रात २२०० मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. या केंद्रात २२०० केंद्राध्यक्ष आणि ६६०० मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -