बारावी गणित पेपर फुटीप्रकरणी ७ जणांना अटक

संबंधित शिक्षकांचे निलंबन - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Four teacher arrest for paper leak in bhiwandi

बारावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.

बारावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंबंधी दीपक केसरकर यांनी विधानसभेत निवेदन केले. केसरकर म्हणाले की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा गणित विषयाचा पेपर ३ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला होता. पेपर सुरू असतानाच साधारणतः दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एका वृत्तवाहिनीवर या पेपरची ६ आणि ७ नंबरची पाने व्हायरल झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली.

ही पाने साधारणत: सकाळी १०.३० वाजेनंतर व्हायरल झाल्याचे वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले. आरोपींपैकी ३ आरोपी शिक्षक आहेत. हे स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षक आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. बुलढाणा यांना संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत विभागीय मंडळ, अमरावती यांच्यामार्फत कळविण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. बुलडाणा यांनी संबंधित शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याबाबत संबंधित संस्था, शाळांना निर्देश दिले आहेत.

डिसिल्वा हायस्कूल, कबुतर खाना, दादर पश्चिम, मुंबई या केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला व या मोबाईलवर इयत्ता १२ वी गणिताच्या पेपरचा काही भाग आढळून आला. यासंदर्भात केंद्र संचालकांनी ४ मार्च रोजी शिवाजी पार्क, पोलीस ठाणे, दादर, मुंबई येथे फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे गेला असून या गुन्ह्यामध्ये ३ अल्पवयीन आरोपी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.