घरमहाराष्ट्रराज्यात लवकरच मेगाभरती!

राज्यात लवकरच मेगाभरती!

Subscribe

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे राज्यात लवकरच मेगा नोकरभरती होण्याची शक्यता असल्याचे मानले जाते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे राज्यात लवकरच मेगा नोकरभरती होण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. राज्यात लवकरच मेगा नोकरभरती होणार असल्याने सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणार्‍या लाखो तरुणांना दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनीही उपस्थिती लावली होती.

- Advertisement -

यानंतर विद्यापीठाच्या सभागृहात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी औरंगाबाद आहे, असा विलक्षण योगायोग आहे. विद्यापीठातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या पुतळ्यातून येथे येणार्‍या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहील, असे त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलगुरू प्रमोद येवले यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही यावेळी दिली. याचवेळी प्रेक्षागृहात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात लवकरच मंजूर पदांची भरती करण्यात येईल. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरीभरती करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

- Advertisement -

७५ हजार कर्मचार्‍यांमध्ये प्राध्यापकांची भरती होणारच आहे. तसेच जी पदे मंजूर आहेत, त्यांचीच भरती होईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्हाला सत्तेत येऊन दोनच महिने झाले आहेत, त्यामुळे थोडा धीर धरावा. दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘मोठा कार्यक्रम’ केल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संतपीठ, वसतिगृह विस्तारीकरण, अध्यासन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुलासह विद्यापीठाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांना निधी देण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या विविध घोषणा
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी रुपये, पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार, जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार, मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प, जालना पाणीपुरवठा नूतनीकरण, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार, लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद, मराठवाडा वॉटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता, या घोषणा केल्या.

फडणवीसांसमोर तरुणांची घोषणाबाजी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी पोलीस भरतीच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या तरुणांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्‍या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांना तरुणांच्या आक्रमक घोषणाबाजीचा सामना करावा लागला. पोलीस भरतीच्या मागणीसाठी तरुणांकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीने चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचेही पहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -