घरमहाराष्ट्रसकाळी ७ ते रात्री ९ आम्‍ही घरीच थांबणार

सकाळी ७ ते रात्री ९ आम्‍ही घरीच थांबणार

Subscribe

चला कर्फ्यूत सामील होऊया, करोनाला हरवूया! , मुंबईकरांचा निर्धार,एक दिवस देशासाठी,५ वाजता टाळ्या आणि थाळीनाद

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने विविध सेवा ३१ मार्चपर्यंत बंद केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभर जनता कर्फ्यूसाठी देशवासी सज्ज झाले आहेत. संसर्ग वाढू नये म्हणून नागरिक रविवारी घरात थांबतील. ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातही प्रत्येकजण यासाठी तयारीत आहे. सायंकाळी ५ वाजता टाळ्या आणि थाळीनाद करण्यात येईल. ठाणे, पालघर, रायगडमधील बाजारपेठा शनिवारपासूनच बंद केल्या आहेत. राज्यात सर्वत्र संचारबंदीचे वातावरण असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा रविवारी बंद ठेवल्या आहेत. करोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २२) सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत जनता कर्फ्यू लावण्याचे आदेश सरकारी यंत्रणांना दिले आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील जनता सज्ज झाली असून गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे रिकामी झाली आहेत. ठाण्यात सर्वत्र शुकशुकाट दिसतोय. शहराने मोकळा श्वास घेतला आहे.

- Advertisement -

शहरातच थांबा, प्रवास टाळा-नरेेंद्र मोदी
करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाचा परिणाम मात्र मोठा असेल, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ‘केवळ घरात राहणेच गरजेचे नसून तुम्ही ज्या शहरात, ज्या भागात असाल तिथेच राहणे आवश्यक आहे. अनावश्यक प्रवासामुळे ना तुम्हाला मदत होईल ना इतरांना’ असे ट्विट शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

घराबाहेर पडू नका!
नागरिकांनी जनता कर्फ्यूला समर्थन म्हणून घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे. करोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था/ संघटना यांच्यावर महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदींनुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेचे सर्व उपआयुक्त, परिमंडळे, संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने महापालिका भवनात पदाधिकारी, अधिकारी यांना भेटायला येणार्‍या अभ्यागतांना प्रतिबंध केला आहे.

- Advertisement -

घरी राहूया, काळजी घेऊया!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार उद्या सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्युत सर्व मुंबईकरांनी सामील होऊन करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून खाजगी कार्यालये आणि दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेचे अत्यावश्यक सेवेसाठी असलेले कर्मचारी आपली जबाबदारी पार करत असून आपण सर्वांनी एकत्र येऊन करोनाला हरवूया. घरी क्वारंटाईन केलेले रुग्ण हे बाहेर फिरत असून ते मुंबईकरांच्या आणि आपल्या नातेवाइकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. अशा रुग्णांना १४ दिवस सक्तीने घरीच ठेवले जाईल आणि असा जर कोणी रुग्ण बाहेर आढळला तर त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल. मुंबई लॉकडाऊन केल्यामुळे खाजगी कंपन्यांनी सरकारला आणि महापालिकेला सहकार्य करावे आणि करोनाची साथ रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून सर्वांनी घरीच राहण्याचा संकल्प करावा.
-प्रवीणसिंह परदेशी, आयुक्त, मुंबई महापालिका

वसुंधरा राजे, दुष्यंत सिंह करोना निगेटिव्ह
करोनाची लागण झालेल्या बॉलिवूड गायिका कनिक कपूरच्या पार्टीत सहभागी झालेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र भाजपचे खासदार दुष्यंत सिंह यांनाही करोनाची लागण झाल्याची चर्चा होती. मात्र चाचणीत अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रपती करणार करोना चाचणी
कनिकाच्या पार्टीत उपस्थित असलेले खासदार दुष्यंत सिंह हे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही सहभागी झाले होते. हे लक्षात घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोंविद देखील आता करोना चाचणी करणार असल्याचे बोलले जात आहे.

…तर सक्तीने घरी बसवावे लागेल
राज्यातील करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येत चार जण नागपूरचे आहेत. तरीही नागरिकांकडून शासनाच्या आदेशाचे पालन होत नाही. ते अकारण घराबाहेर पडतात, अशा व्यक्तींना सक्तीने घरात बसवावे लागेल, असा इशारा नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातही चाचण्या?
राज्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तातडीने करोना चाचणी केंद्र सुरू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -