घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महापालिकेत अपहार केल्याप्रकरणी सुधाकर बडगुजरांवर गुन्हा दाखल

नाशिक महापालिकेत अपहार केल्याप्रकरणी सुधाकर बडगुजरांवर गुन्हा दाखल

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि.१७) सलग तिसर्‍या दिवशी दोन तास बडगुजर यांची चौकशी केली. तर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी़), नाशिकने सरकारवाडा पोलीस ठाण्यात बडगुजरांसह तिघांवर नाशिक महापालिकेत अपहार व बनावट दस्तऐवजसंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एसीबीकडून रविवारी बडगुजरांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली असून, त्यांना सोमवारी (दि.१८) एसीबीच्या कार्यालयात बोलवले जाणार आहे.

नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध दिलेल्या पत्राचे अनुशंषाने लाचचुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे उघड चौकशी चालू होती. बडगुजर यांनी मे. बडगुजर अँड कंपनीतून डिसेंबर 2006 मध्ये निवृत्ती घेतल्याबाबतची खोटी व बनावट कागदपत्रे बनवली होती. त्यांनी नाशिक महापालिकेत 2007 पासून नगरसेवक व इतर पदे भूषवून बडगुजर अँड कंपनीस नाशिक महापालिकेकडून विविध ठेके मिळवून दिले. बडगुजर अ‍ॅन्ड कंपनीकडून 2006 ते सन 2009 या कालावधीत रक्कम रुपये 33 लाख 69 हजार 439 रुपये स्विकारुन बडगुजरांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. तसेच दोन साथीदारांसोबत संगनमत करुन नाशिक महापालिकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

- Advertisement -

याप्रकरणी सुधाकर भिका बडगुजर, साहेबराव रामदास शिंदे, सुरेश भिका चव्हाण यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 13 (1) (ड) (i)(ii), 13 (2) सह कलम भा. द. वी. कलम 420, 467, 468, 471, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीसह पुरावे गोळा करणे सुरु

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग तिसर्‍या दिवशी रविवारी (दि.१७) सायंकाळी गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात नाशिक पोलिसांनी कसून चौकशी केली. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी बडगुजरांची चौकशी केली. चौकशीत बडगुजर हे काही प्रश्नांना उत्तरे देत आहेत, तर काही प्रश्नांना उत्तर देणे टाळत आहेत. काही प्रश्नांना नंतर उत्तरे देतो, असेही ते सांगत आहेत. चौकशी करताना पुरावेसुद्धा गोळा केले जात आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढमाळ यांनी सांगितले.

चौकशीनंतर गुन्हा दाखल

नाशिक महापालिकेतील अपहार, बनावट दस्तऐवजसंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली. त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांवर अपहारचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना चौकशीची नोटीस दिली जाणार असून, सोमवारी (दि.१८) चौकशीसाठी एसीबी कार्यालयात बोलवले जाईल.
शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र

कायदेशीर सल्ला घेणार

सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे माहिती नाही. याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार आहे, असे सुधाकार बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -