मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, ८ ते १० गोदामे जळून खाक

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्या आहे. तर, पाण्याचे दोन टँकरही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगी संदर्भात अग्नीशमन विभागाने माहिती दिली.

मानखुर्द येथील मंडाला भागातील भंगार गोदामांना भीषण आग लागून त्यामध्ये ८ – १० गोदामे जाळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र गोदामे व त्यातील साधनसामग्री जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मानखुर्द, मंडाला येथील भंगार गोदामांना, झोपड्यांना आगी लागण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. प्राप्त माहितीनुसार, मानखुर्द, मंडाला भागातील २० फिट रोड, मातंग नगर येथील झोपडपट्टीत गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग अवघ्या २० मिनिटांत भडकली. त्यामुळे आग स्तर -२ ची असल्याचे सकाळी १०.३३ वाजता अग्निशमन दलाने जाहीर केले. या आगीची माहिती मिळताच बघ्यांची एकच गर्दी उसळली.

आगीचा काळाकुट्ट धूर दूर अंतरावरून दिसत होता. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र या आगीत भंगार गोदामे जळून खाक झाल्याचे समजते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ८ फायर इंजिन व ४ जंबो वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने या आगीवर काही अवधीत नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा या आगीत आजूबाजूचे आणखी काही गोदामे, झोपड्या आदी जळून खाक झाले असते.

ही आग का कशी काय लागली, याबाबत पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा भिवंडीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना