घरमहाराष्ट्रकेईएम रुग्णालयातील ९६ वर्षे जुन्या नर्सेस क्वार्टर्समधील सिलिंगचा भाग कोसळला

केईएम रुग्णालयातील ९६ वर्षे जुन्या नर्सेस क्वार्टर्समधील सिलिंगचा भाग कोसळला

Subscribe

एखाद्या इमारतीच्या बांधकामाला किमान ३० वर्षे झाली आहेत, त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे व त्यात ती इमारत अधिक धोकादायक असल्यास तिचा पुनर्विकास होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास करणे अथवा तातडीने मोठी दुरुस्ती कामे करणे आवश्यक असताना रुग्णालय प्रशासन फक्त त्याची वरकरणी डागडुजी करून आपली जबाबदारी टाळत आहे, असा गंभीर आरोप अनिल कोकीळ यांनी केला आहे.

मुंबई – मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या नर्सेस क्वार्टर्समध्ये सिलिंगचा भाग कोसळला. यामुळे एक महिला जखमी झाली आहे. संगीता चव्हाण (४०) या जेवण बनविणाऱ्या महिला कर्मचारी डोक्याला जखम झाल्याने जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केला आहे.

केईएम रूग्णालयाच्या तीन मजली नर्सेस क्वार्टर्स इमारतीचे बांधकाम १९२६ ला उभारलेले आहे. या इमारतीच्या बांधकामाला जवळजवळ ९६ वर्षे पूर्ण झाली असून इमारतीच्या सिलिंगचा भाग अधूनमधून कोसळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

- Advertisement -

सिलिंगचा काही भाग पंख्यासह कोसळण्याची घटना घडून गेली आहे. गुरुवारी सकाळी रुग्णालय परिसरात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास नर्सेस क्वार्टर्स इमारतीच्या तळमजल्यावर सिलिंगचा काही भाग कोसळून पडला. त्यामुळे नर्सेस क्वार्टर्समध्ये एकच खळबळ उडाली आणि धावपळ सुरू झाली. या घटनेत, संगीता चव्हाण (४०) या नर्सेसला जेवण बनवून देण्याचे काम करणाऱ्या महिला कर्मचारीच्या डोक्याला मार लागून जखम झाली व त्यामधून रक्त वाहत होते. त्यामुळे त्या महिलेचे कपडेही रक्ताने माखल्याने खराब झाले. मात्र इतर नर्सेस, कर्मचारी हे त्या महिलेच्या मदतीला धावले. सदर महिला कर्मचारीला लागलगीच रुग्णालयात उपचार देण्यात आले.

वास्तविक, एखाद्या इमारतीच्या बांधकामाला किमान ३० वर्षे झाली आहेत, त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे व त्यात ती इमारत अधिक धोकादायक असल्यास तिचा पुनर्विकास होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास करणे अथवा तातडीने मोठी दुरुस्ती कामे करणे आवश्यक असताना रुग्णालय प्रशासन फक्त त्याची वरकरणी डागडुजी करून आपली जबाबदारी टाळत आहे, असा गंभीर आरोप अनिल कोकीळ यांनी केला आहे.

- Advertisement -

तसेच, भविष्यात पुन्हा अशा दुर्घटना घडण्याची व त्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे अनिल कोकीळ यांनी म्हटले आहे. यापूर्वी, रुग्णालय प्रशासनाला सिलिंग दुर्घटना घडल्याने तातडीने लक्ष देऊन मोठ्या दुरुस्तीची कामे करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र रूग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच सदर दुर्घटना घडून त्यामध्ये एक महिला कर्मचारी जखमी झाली असून ती थोडक्यात बचावली. अन्यथा तिच्या जीवावर बेतले असते, असे अनिल कोकीळ यांनी म्हटले आहे.

स्थानिक आमदार चौधरी, माजी नगरसेवक कोकीळ यांची घटनास्थळी भेट

केईएम नर्सेस क्वार्टर्समध्ये सिलिंगचा भाग कोसळून एक महिला कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी व माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी, घाबरलेल्या स्थितीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी, नर्स यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, सदर दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारण्यात आला.

त्याचप्रमाणे रुग्णालय प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत नर्सेस क्वार्टर्सच्या दुरुस्ती आणि पर्यायी व्यवस्थेबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच, प्रशासनाने सदर घटनेची गंभीर दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे अनिल कोकीळ यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -