घरदेश-विदेशरेल्वेप्रवासात सुरक्षिततेचा वाली कोण? 'बर्निंग ट्रेन'च्या थरारानंतर प्रश्न पुन्हा ऐरणीवर

रेल्वेप्रवासात सुरक्षिततेचा वाली कोण? ‘बर्निंग ट्रेन’च्या थरारानंतर प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Subscribe

गेल्या काही महिन्यांत रेल्वे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कुठे दोन ट्रेनमध्ये टक्कर तर कुठे ट्रेनला आग, एका ठिकाणी तर चक्क मोटरमनचा हलगर्जीपणा. म्हणजेच या ना त्या कारणामुळे रेल्वेचे अपघात होतच आहेत. म्हणूनच रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांत रेल्वे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कुठे दोन ट्रेनमध्ये टक्कर तर कुठे ट्रेनला आग, एका ठिकाणी तर चक्क मोटरमनचा हलगर्जीपणा. म्हणजेच या ना त्या कारणामुळे रेल्वेचे अपघात होतच आहेत. म्हणूनच रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशात दोन बर्निंग ट्रेनचा थरार घडला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत. काल (ता. 15 नोव्हेंबर) इटावाजवळ नवी दिल्ली-दरभंगा हमसफर एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली होती. ही आग इटावाजवळील सराय भूपत स्टेशननजीक लागली. सर्वप्रथम या एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात आग लागली. त्यामुळे प्रवाशांनी डब्यातून खाली उड्या मारत जीव वाचवला. ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांत आज (ता. 16 नोव्हेंबर) पुन्हा सकाळी इटावाजवळ दिल्लीहून सहरसाकडे जाणाऱ्या वैशाली ट्रेनच्या एस-6 बोगीला आग लागली. या घटनेत 19 प्रवासी जखमी झाले असून यातील 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या घटनांमुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा ही राम भरोसे आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (After the thrill of the burning train, the issue of railway safety is again on the agenda)

हेही वाचा – उत्तर प्रदेशात 24 तासांत बर्निंग ट्रेनच्या दोन घटना, 30 जण जखमी

- Advertisement -

आजपर्यंत रेल्वे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, 2 जूनला ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहनगा रेल्वे स्थानकाजवळ झालेला तीन ट्रेनचा भीषण अपघात हा भारतीय रेल्वे इतिहासातील मोठ्या अपघातांपैकी एक आहे. या अपघातात 288 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर 900 लोक गंभीर जखमी झाले होते. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. त्यानंतर आणखी एका ट्रेनने या दोन ट्रेनना धडक दिली होती.
या घटनेनंतर ऑक्टोबरमध्ये ट्रेन रुळांवरून घसरल्याच्या दोन दुर्घटना घडल्या, त्याही तर 15 दिवसांच्या आत. पहिली घटना ही 12 ऑक्टोबरला घडली. ज्यामध्ये दिल्लीच्या आनंद विहार स्थानकावरून गुवाहाटीच्या कामाख्याकडे जाणाऱ्या ईशान्य एक्स्प्रेसचे डबे रात्री साडेनऊच्या सुमारास बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वेस्थानकाजवळ रुळावरून घसरून अपघात झाला. या अपघातात ट्रेनचे 21 डबे रुळावरून घसरले. ज्यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर 20 जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना घडते ना घडतेच त्यानंतर 15 दिवसांच्या आत दुसरी घटना ही आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये घडल्याचे समोर आले. ज्यामध्ये दोन ट्रेनमध्ये धडक झाल्यानंतर यातील एका रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. या घटनेत देखील सहा निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. ओव्हरहेड वायर तुटल्याने विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर ट्रेन रुळावर थांबली. मात्र, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पलासा एक्स्प्रेसने रायगड पॅसेंजरला धडक दिली.

‘बर्निंग ट्रेनचा थरार’

एकीकडे ट्रेनच्या एकमेकांना धडक, रुळावरून ट्रेन घसरण्याच्या घटना घडत असतानाच रेल्वेच्या बोग्यांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसून येत आहेत. केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल केली. मात्र, या ट्रेनमधून होणारा प्रवास देखील सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात भोपाळहून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली होती. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. यानंतर याच दिवशी म्हणजे 17 जुलैलाच पुण्यातील दौंड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूला यार्डमधील एका बोगीला अचानक आग लागली.

- Advertisement -

त्यानंतर सप्टेंबर महिन्यातही गुजरातच्या गोध्रामध्ये ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. प्रवाशांना उतरवण्यासाठी गुजरातच्या जकोट रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या एका मेमू ट्रेनच्या इंजिनला आग लागली आणि ही आग थोड्याच वेळात दोन बोगींपर्यंत पसरली. त्यामुळे घटनास्थळी आरडाओरडा आणि चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

या आगीच्या घटना इतक्यावरच थांबलेल्या नाहीत. तर तमिळनाडूमधील मदुराई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या लखनऊ-रामेश्वर या ट्रेनच्या डब्यात आग लागून 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ही ऑगस्ट महिन्यात घडली. डब्यातून बेकायदेशीरपणे ‘गॅस सिलेंडर’ नेण्यात येत होते, ज्यामुळे हा अपघात झाल्याचे दक्षिण रेल्वेकडून सांगण्यात आले. ज्या डब्यात आग लागली तो ‘खाजगी पार्टी कोच’ होता (संपूर्ण कोच एका व्यक्तीने बुक केला होता) आणि त्यातील 65 प्रवासी उत्तर प्रदेशातील लखनौहून मदुराईला पोहोचले होते.

प्रवाशांच्या जीविताला धोका कायम?

आजवर विविध घटनांमुळे रेल्वेचे अपघात झाले आहेत. मात्र, ज्या चालक आणि रेल्वे पोलिसांच्या भरवशावर लोक प्रवास करत असतात. तेच बेजाबाबदारपणे वागले तर दाद कोणाकडे मागायची? जुलै महिन्यात पालघर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेसुरक्षा दलाच्या एका हवालदाराने आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची आणि दोन बोगीतील तीन प्रवाशांची जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये हत्या केली. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह याने 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी या हत्या केल्याचे तपासात उघड झाले होते.

तर, सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्थानकावर शकूर बस्ती ईएमयू ट्रेनचे इंजिन स्टॉपर तुटून फलाटावर चढले. याबाबत खुलासा करत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, ट्रेनमध्ये उपस्थित पाचही जण मोबाईल फोन वापरत होते आणि मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात आली. या सर्व घटना लक्षात घेता प्रवाशांना जीव मुठीतच घेऊन प्रवास लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -