घरताज्या घडामोडीपुरासाठी अलमट्टी धरण जबाबदार नसल्याचा अहवालातील खुलासा - अजित पवार

पुरासाठी अलमट्टी धरण जबाबदार नसल्याचा अहवालातील खुलासा – अजित पवार

Subscribe

पूरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तज्ञ समिती नेमण्याची गरज

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या पूरपरिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी याआधीच्या सरकारने सल्लागार समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात पूरासाठीचे अलमट्टी धरणातील विसर्ग हा कारणीभूत नसल्याची स्पष्टोक्ती देण्यात आली होती. अलमट्टीमुळे ही पूराची स्थिती निर्माण होते असेही कुठेही अहवालात दिसले नाही. म्हणूनच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील नागरिकांना मदत करण्याची भूमिका दोन्ही बाजूच्या राज्य सरकारने ठेवायला हवी. त्यासाठी दोन्ही सरकारमध्ये चर्चेची गरज असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. पुणे, कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दूधगंगा, राधानगरी, वारणा, कोयना यासारख्या धरणाच्या पाण्यातून बॉटलनेक तयार होतो. परिणाम सांगली आणि कोल्हापूर या राज्यांना पूराच्या पाण्याचा फटका बसत असल्याचे अजित पवार यांनी या आढावा दौऱ्यानंतर मांडले. पावसाने उसंत घेतल्याने आता अनेक भागात पाण्याची पातळी कमी होण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पंचनामे व्हायला सुरूवात होत आहे. पण १०० टक्के पंचनामे झालेले नाहीत असेही अजित पवार म्हणाले. पण या पूराच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी मांडले. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारची तयारी आहे. त्यासाठीच तज्ञ व्यक्तींची समिती नेमण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे अलमट्टी धरणाच्या विसर्गामुळे दरवर्षी निर्माण होणारी समस्या पाहता दोन्ही राज्यांकडून या समस्येसाठीचा प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे ते म्ङणाले.

- Advertisement -

ब्रिटीशकालीन रस्त्याच्या मोऱ्या बदलणार

सांगली आणि कोल्हापूर भागत काही भागात ३२ इंच ते ४९ इंच इतका पाऊस पडला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ठप्प होण्यापासून ते गोकुळच्या दुधाचा पुरवठा बंद होण्यावर परिणाम झाला. परिणामी डिझेल वितरणावरही बंधने आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पावले उचलावी लागली.पण आता वाहतूक पूर्वत झाली आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सध्याच्या रस्त्याच्या मोऱ्या ज्या ब्रिटिशकालीन आहेत, त्या मोऱ्यांचा आकार वाढवण्यात येईल असे ते म्हणाले. त्यासाठीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या ब्रिटिशकालीन मोऱ्यांचा आकार वाढवण्यात येईल. अनेक ठिकाणी मोऱ्यांचा आकार छोटा असल्याने रस्तेही वाहून गेले आहेत. त्यामुळेच मोऱ्यांच्या पाईपएवजी बॉक्स किंवा स्लॅब निर्माण करण्यात येतील. त्याचा उपयोग हा वाहून आलेली झाडे, कचरा रोखण्यासाठी होऊ शकतो. तसेच रस्ते तुटण्याचे नुकसानही होणार नाही असे त्यांनी सांगितले.

 

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -