घर महाराष्ट्र अजित पवार गटाचे दावे शरद पवार गटाने फेटाळले, निवडणूक आयोगाकडे दाखल केले...

अजित पवार गटाचे दावे शरद पवार गटाने फेटाळले, निवडणूक आयोगाकडे दाखल केले उत्तर

Subscribe

शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यावर उत्तर देण्यात आले आहे. अजित पवार यांनी केलेले दावे फेटाळत शरद पवार गटाने मेल च्या माध्यमातून निवडणूक आयोगासमोर उत्तर सादर केले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील आता पक्षाच्या चिन्हावरून आणि नावावरून न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे. अजित पवार यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी बंडखोरी करण्यात आल्यानंतर त्यांनी थेट पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ही अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. त्यानंतर या प्रकरणी आक्रमक झालेल्या शरद पवार गटाकडून या प्रकरणी निवडणूक आयोगात दाद मागण्यात आली होती.

हेही वाचा – अजित पवारांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ? जयंत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

- Advertisement -

या प्रकरणी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मागील महिन्यात उत्तर देण्यास सांगितले होते. परंतु शरद पवार गटाकडून चार महिन्यांचा वेळ मागण्यात आला होता. मात्र त्यांना निवडणूक आयोगाकडून तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला. त्यानुसार आज 8 सप्टेंबरला उत्तर देण्याची वेळ संपणार होती. त्यामुळे शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यावर उत्तर देण्यात आले आहे. G20 निमित्त आज नवी दिल्लीतल सर्व सरकारी कार्यालये ही बंद असल्याने निवडणूक आयोगाचे कार्यालय सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी केलेले दावे फेटाळत शरद पवार गटाने मेल च्या माध्यमातून निवडणूक आयोगासमोर उत्तर सादर केले आहे. (Ajit Pawar group’s claims rejected by Sharad Pawar group, reply filed with Election Commission)

शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले दावे तर फेटाळण्यात आलेच आहेत. परंतु, त्यासोबतच त्यांनी अजित पवार गटातील 9 मंत्री आणि 40 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच, शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असा दावा सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तसेच, अजित पवार गटाला देखील या प्रकरणी आजच उत्तर दाखल करायचे आहे. परंतु, अद्यापही याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

- Advertisement -

याबाबत अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. शरद पवार गटाने कितीही दावे फेटाळले तरी त्याने कोणताही फरक पडत नाही. कारण आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेताना सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास केला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, ते पाहता निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, असा दावा तटकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. परंतु अद्याप या प्रकरणी निवडणूक आयोगाने पक्ष फुटीची केस अशी नोंद करून घेतलेली नाही. पण येणाऱ्या काळात या प्रकरणाचा नेमका काय निकाल लागतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -