घरमहाराष्ट्र'सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहिती आहे'; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

‘सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहिती आहे’; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Subscribe

सरकार कोणाचंही असो, अजित पवार उपमुख्यमंत्री असणार - चंद्रकांत पाटील

पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचारा आता वेगळंच रुप धारण करत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याचं विान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ता बदलबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे असं, चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजप जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

अजत पवार यांनी बुधवारी पंढरपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही, असं अजित पवार म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं. अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असतं. माणसाने नेहमी नम्र राहायचं असतं. नीट बोलायचं असतं. सरकार पडणार नसेल तर इतका आकांडतांडव कशासाठी? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणण्याचं कारण नाही. तुम्हाला ते पडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार याची तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता. जेव्हा सरकार पडेल तेव्हा सर्व टाइमटेबल माहिती होतं असं मान्य कराल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांना राज्यात कोरोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही पंढरपूरात दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. यावरुन हे निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली दिसतेय. पायाखालची जमीन सरकली की जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजप जिंकणार हे स्पष्ट आहे, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. अजित पवारांना काय झालं आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळई त्यांनी अजित पवारांवर असलेल्या आरोपांवर देखील भाष्य केलं.

- Advertisement -

अजित पवार यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री….उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं सरकार आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतील, असा जोरदार टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात चंद्रकांत पाटलांचा उल्लेख चंपा असा केला होता. यावर देखील चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेत. त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील, असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -