शिवतीर्थावर बसून चिथावणी देणे सोपे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

Ajit Pawar's warning to Raj Thackeray It is easy to provoke by sitting on Shivteertha
शिवतीर्थावर बसून चिथावणी देणे सोपे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कुणाचीही हुकूमशाही चालणार नाही. कायद्याविरोधात कुणी काही केल्यास पोलीस कारवाई करणार, असा इशारा अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला. शिवतीर्थावर बसून चिथावणी देणे किंवा भडकावणारी भाषणं करणं सोपं आहे, पण केसेस तर कार्यकर्त्यांवर होणार ना. राज्यातील कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवू नये, अशा शब्दांत अजित पवार यांनी ठाकरेंना सुनावलं.

नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, राज ठाकरेंनी मागच्याच सभेतील भाषण पुन्हा केलं. शरद पवारांनी कधीही जातीच राजकारण केले नाही. कारण नसताना शरद पवारांचे नाव घ्यायचे, त्यांचे नाव घेतले म्हणजे प्रसिद्धी मिळते. रामदास आठवले, राजू शेट्टी यांनीही हेच सांगितले. पवार साहेब मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. त्यांना जी भूमिका पटते ते स्पष्टपणे सांगतात. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कुणाचीही हुकुमशाही चालणार नाही. कायद्याने, संविधानाने सांगितलेल्या नियमांचे पालन सर्वांना करावे लागेल, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

उत्तर प्रदेशात फक्त मशिदींवरील भोंगे उतरवले नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे मंदिरांचेही लाऊड स्पिकर बंद झाले. अयोध्येलाही लाऊड स्पिकर लागायचा तोही बंद झाला. मशिदीवरील भोंगे काढायचे, इतर ठिकाणचे काढायचे नाही असे कसे होईल. कोर्टाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. राज ठाकरेंच्या सभेत अटी-शर्तींचे पालन केले गेले नसेल तर पोलिसांनी पुढील कारवाई करावी. लोकसभेच्या वेळी ते भाजपविरोधात बोलत होते. त्यानंतर आता त्यांचे मनपरिवर्तन झाले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरोधात बोलायला सुरुवात केली, असे अजित पवार म्हणाले.

मुख्य प्रश्नांना बगल

भडकावणारी भाषणे करून समाजातील जातीय सलोखा अडचणीत येणार असेल, जातीयवादी विष पेरले जाणार असेल तर हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. राज ठाकरेंनी एकदा इतिहास नीट वाचावा. आज राज्यात उष्णतेची लाट, भारनियमनाचा प्रश्न, इंधन दरवाढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर ते बोलत नाहीत अन् नको त्या विषयावर बोलतात, हे योग्य नाही असेही ते म्हणाले.