घरCORONA UPDATEरत्नागिरीत चौदा दिवसात उभारली अद्ययावत विषाणू प्रयोगशाळा

रत्नागिरीत चौदा दिवसात उभारली अद्ययावत विषाणू प्रयोगशाळा

Subscribe

रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ कोटी ७ लाख रुपये खर्च करून विषाणू प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, या संकटासोबत आता पावसाळी आजारांचे आव्हान देखील राज्य सरकार समोर असणार आहे. हेच आव्हान लक्षात घेऊन रत्नागिरीमध्ये केवळ चौदा दिवसात विषाणू प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे ई लोकार्पण झाले. दरम्यान रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ कोटी ७ लाख रुपये खर्च करून विषाणू प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे ई उद्घाटन झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे ते म्हणाले.

लॉकडाऊन सुरु झाला त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु आहे असे सांगून ठाकरे म्हणाले की कोरोनाचे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या. आता ही संख्या ८५ झाली आहे. संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना तपासणीसाठी फार दूर जावे लागणार नाही. यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे यापुढील काम सरकारचे असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास मुंबईतून तर सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि प्रसाद लाड हे रत्नागिरीतून तर आमदार भास्कर जाधव चिपळूणमधून या कार्यक्रमात सहभागी झाले.

आरंभी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत माहिती दिली. या प्रसंगी रिमोटने उद्घाटन झाल्यावर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत तयार करण्यात आलेला एक वृत्तपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रसारणही करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

वैद्यकीय महाविद्यालय

या विषाणू प्रयोगशाळेमुळे आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कोरोना चाचण्यांचा वेग वाढेल आणि त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला होईल. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजूरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या १४  दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे व उपकरणे यासाठी ८० लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी १५ लाख रुपये खर्च झाला.

कर्करोग चाचण्यांचीही सुविधा

या प्रयोगशाळेत कोविड तसेच एच.आय.व्ही, जनेटिक ओळख आदि सोबत कर्करोगाच्या चाचण्याही होतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना आणि रत्नागिरीला एकाच दिवशी मंजूरी प्राप्त झाली आणि रत्नागिरीची प्रयोगशाळा विक्रमी वेळेत सुरु झाली असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -