घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर भाजपा आणि शिंदे गटाची संतप्त प्रतिक्रिया

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपा आणि शिंदे गटाची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले आहे. भाजपा आणि शिंदे गटातील नेते याबद्दल आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जाणीवपूर्वक स्वराज्यरक्षक असे म्हणतो. काही जण त्यांना धर्मवीर म्हणतात. संभाजीराजे धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तरीही काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर-धर्मवीर म्हणतात, असे अजित पवार यांनी काल, शुक्रवारी विधानसभेत म्हटले होते.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी अजित पवार यांच्या या वक्तव्याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यास सांगितले होते. पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या आणि बलिदान दिले. त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले गेले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांचे लोक काहीही म्हणत असले तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते, हे वास्तव आहे, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील अजित पवार यांच्या या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशा पद्धतीचे अजित पवार यांचे हे वक्तव्य आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. या वक्तव्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. तेव्हा आपण बोललो ते चुकीचे होते, हे अजित पवारांच्या लक्षात येईल, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज हे कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरीपर्यंत ते धर्मवीर धर्मरक्षकच राहतील, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -