घरमहाराष्ट्र'या'चा विचार करणार आहात की नाही? सुषमा अंधारे यांचा जरांगे आणि भुजबळ...

‘या’चा विचार करणार आहात की नाही? सुषमा अंधारे यांचा जरांगे आणि भुजबळ यांना सवाल

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे बीडमध्ये 300पेक्षा जास्त लोकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले असून ज्यात 307 सारख्या गंभीर कलमाचा समावेश आहे. तीनशे लोकांवर गुन्हे म्हणजे एका कुटुंबात किमान पाच माणसे गृहीत धरले तरी, दीड ते दोन हजार लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. याचा विचार मराठा अभ्यासक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ करणार आहात की नाही? असा गंभीर प्रश्न ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा – Manoj Jarange : टाइम बॉण्डवरून मनोज जरांगेंना मिळतेय ‘तारिख पे तारिख’

- Advertisement -

मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणानेही काय साध्य झाले? ना ठोस आरक्षण मिळाले ना आरक्षण मार्गातील अडचणी नीट गावखेड्यांपर्यंत पोहोचल्या. उलट पाच-पंचवीस लोकांचें जीव गेले अन् 7-800 लोकांवर गुन्हे दाखल झाले. मग 100- 100 जेसीबीमधून फुलांची उधळण आणि आर्थिक मागासलेपण म्हणून आरक्षण हा विरोधाभास आहे, हे नेता म्हणून जरांगे यांनी समजून सांगायला हवे, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी छगन भुजबळ यांना एका अनावृत्त पत्राद्वारे केले आहे.

ओबीसींचा लढा नक्की उभा राहावा. पण तो उभा राहत असताना संविधानिक तरतुदी काय आहेत, त्यातले खाचखळगे काय आहेत हे लोकांना समजावून सांगितले पाहिजेत. मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून का आणि कसे शक्य नाही, हे संविधानिक भाषेत मांडले जावे. पण अशा पद्धतीने दोन्हीकडून चिथावणीची भाषा करत गावगाड्याची वीण उसवू नये, असा सल्ला देतानाच, यामुळे राज्यातल्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यात भाजपा यशस्वी होत असल्याची टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुमचे काही मुद्दा पटले आणि खटकले सुद्धा…, सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर छगन भुजबळ

राज्यात आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा झाली आहे, त्यावर आता कोणी बोलणार नाही. कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा नऊ-अठरा वाजले आहेत, त्यावरूनही लक्ष हटवले जात आहे. ड्रग्ज आणि अंमलीपदार्थांच्या विळख्यात महाराष्ट्रातील तरुणाई अडकत चालली आहे. त्यावर पडदा टाकण्यात येत आहे. महिलांची असुरक्षा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कंत्राटी भरती, सरकारी क्षेत्रांचे खासगीकरण या सगळ्यांच्या चर्चा झाकोळल्या जात आहेत. राज्यात 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. ऐन हिवाळ्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाण्याचे टँकर सुरू झाले आहे. हिवाळ्यात ही स्थिती आहे तर उन्हाळ्यात काय? शेतकऱ्यांचे पिक विमा आणि अनुदान अजूनही प्रलंबितच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना आव्हान द्यायचे किंवा भुजबळ यांनी जरांगे यांना प्रतिआव्हान द्यायचे यामध्ये मराठा किंवा ओबीसी यांचे कोणते हीत लपले आहे? आरक्षणाचा मुद्दा बाजूला करत दोन्हीकडून (भुजबळ आणि जरांगे) जी वैयक्तिक पातळीवरची चिखलफेक होत आहे, यामुळे ना आरक्षणाचा प्रश्न सुटेल ना निर्दोष तरुणांवर दाखल झालेले गुन्हे निघतील, पण यामुळे भाजपाचा फायदा नक्की होईल. मराठा समाजाची भीती दाखवत सगळ्या ओबीसींना एकत्रित करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, भाजपच्या प्रयत्नांना आपल्यामुळे बळ मिळेल, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : भुजबळांमागे अदृष्य हात, विजय वडेट्टीवारांचा कोणाकडे इशारा?

आजवर तुम्ही संघ विचारधारेच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलात. मग आता भाजपाच्या या खेळीमध्ये का अडकत आहात? दुर्बल आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे, असे तुम्हालाही वाटते ना आणि त्याच वेळेला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असेही वाटते ना? तर मग ही भूमिका आपण शांतपणे जरांगे यांनाही समजावून सांगू आणि हा संपूर्ण आरक्षण तिढा सोडवण्याची क्षमता आणि अधिकार ज्या केंद्र सरकारकडे आहेत, त्या केंद्रातल्या भाजपाला प्रश्न विचारू, असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी भुजबळ यांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -