घरमहाराष्ट्रधर्मनिरपेक्षतेतून मुस्लिमांना काय मिळालं?, आरक्षण मिळालं का?, ओवैसींचा सवाल

धर्मनिरपेक्षतेतून मुस्लिमांना काय मिळालं?, आरक्षण मिळालं का?, ओवैसींचा सवाल

Subscribe

धर्मनिरपेक्षतेतून मुस्लिमांना काय मिळालं? आरक्षण मिळालं का? अधिकार मिळाला, न्याय मिळाला? माझा राजकीय धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही. संविधानात लिहिलेल्या धर्मनिरपेक्षतेवर माझा विश्वास आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, मुस्लिम मागासलेले आहेत. संविधानाने मुस्लिमांना आरक्षणाचा अधिकार दिला आहे. मग मुस्लिमांना आरक्षण का दिले जात नाही? असा सवाल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष ॲड. असदुद्दीन ओवैसी यांनी केला. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईतील चांदिवली येथे मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमीन आणि इतर मागण्यांसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओवैसी बोलत होते.

हिंदूंमध्ये, जैनांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये मुलाने वडिलांना मागे टाकले आहे. मुस्लिमांमध्ये वडिलांपेक्षा मुलगा जास्त गरीब आणि मागासलेला आहे. आम्ही आपल्या हातांनी आमच्या राष्ट्राचे कार्य पुढे नेऊ शकत नाही का? असा सवाल ओवैसी यांनी केला. मुस्लिमांच्या आरक्षणाची बाजू मांडताना ओवैसी म्हणाले, मराठ्यांपेक्षा मुस्लिमांकडे जमीन कमी, शिक्षण कमी, नोकऱ्या कमी, मग शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे हृदय फक्त मराठ्यांसाठी धडधडणार का? हे थ्री इन वन सरकार कधी मुस्लिमांसाठी काही विचार करतील की नाही? ८३ टक्के मुस्लिमांकडे स्वतःची जमीन नाही. केवळ ४ टक्के मुस्लिम पदवीधर झाले. २० टक्के मुस्लिमांची कमाई २० हजारांपेक्षा कमी आहे. ६७ टक्के मुस्लिम कच्च्या घरात राहतात. महाराष्ट्रात एकही आयएएस अधिकारी मुस्लिम नाही. मराठा आरक्षणाबाबत सर्वच पक्ष बोलत होते. केवळ AIMIM मुस्लिम आरक्षणाबाबत बोलत आहे, असे ओवैसी म्हणाले.

- Advertisement -

असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मुस्लिम आरक्षणाच्या मागणीबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. त्यांनी मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला आणि त्या बदल्यात या समाजाचा विश्वासघात करण्याशिवाय काहीही दिलेले नाही. तत्पूर्वी, AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी १५० हून अधिक वाहनांच्या ताफ्यासह औरंगाबाद ते मुंबई अशी तिरंगा यात्रा काढली. औरंगाबाद येथून सकाळी सात वाजता निघालेली यात्रा सायंकाळी सात वाजता सभेच्या ठिकाणी पोहोचली.

असदुद्दीन ओवैसी या सभेत म्हणाले की, ‘२४ तास राष्ट्रवादाचा नारा देणारी शिवसेना. तिरंगा हीच राष्ट्रवादाची ओळख आहे, हे ते का विसरले. जेव्हा रॅली पुढे जात होती, तेव्हा रोखण्याचा प्रयत्न का झाला? हा तिरंगा राष्ट्रवादाचीही ओळख आहे, ती आपल्या बलिदानाचीही गाथा आहे. आपल्या वडिलांचीही एक खूण आहे. शेवटी तुम्ही तिरंग्याच्या विरोधात कसे काय झाले? असा सवाल ओवैसी यांनी शिवसेनेला केला.

- Advertisement -

राहुल गांधी मुंबईत आल्यावर फुलांनी स्वागत करणार का?

मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे की, राहुल गांधी मुंबईत आल्यावर ओमिक्रॉनचे नाव घेतले जाईल, कलम १४४ लागू केले जाईल की त्यांचे स्वागत फुलांनी केले जाईल? असा सवाल ओवैसी यांनी केला. तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान केले. काय मिळालं तुम्हाला? मुस्लिम ओवैसी मतं खात असल्याचा विचार केला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान केले. आज दोघेही जाऊन शिवसेनेच्या मांडीवर बसले. मुस्लिमांना कधीपर्यंत फसवणार?, असा परखड सवाल ओवैसी यांनी केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -