घरमहाराष्ट्रतुमचं पत्र अपमान आणि धमकावणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांचं सडेतोड उत्तर

तुमचं पत्र अपमान आणि धमकावणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांचं सडेतोड उत्तर

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेणारं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुमचं पत्र अपमान करणारं आणि धमकावणारं आहे, असं सांगत पत्रातील भाषेवर तिव्र शब्दात आक्षेप घेतला आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र माध्यमांवर व्हायरल झालं आहे. या पत्रामध्ये राज्यपालांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचं स्पष्ट दिसतंय. तुमच्या पत्राचा असंयमी स्वर आणि धमकावणारा सूर पाहून मी वैयक्तिकरीत्या खूप दु:खी झालो आहे. ते पत्र संविधानातील घटनात्मक पद असलेल्या राज्यपालाचा अपमान आणि बदनामी करणारं आहे, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

राज्यपालांचं पत्र

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे की, तुमच्या पत्रात तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद २०८ नुसार नियम तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण तुम्ही अर्धवट माहिती देत आहात. त्याच अनुच्छेदात म्हटलं आहे की, जो काही विधीमंडळाचा निर्णय घेतला जाईल, तो संविधानिक असला पाहिजे. संविधानिक प्रक्रिया पार पाडूनच त्याची कार्यपद्धती असली पाहिजे.

संविधानाच्या कलम १५९ नुसार राज्य घटनेचं संरक्षण, संवर्धन आणि बचाव करण्याची मी शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भातील नियमात करण्यात आलेले बदल हे प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्यानं निवडणूक घेण्यास संमती देता येणार नाही.

- Advertisement -

आपण सभापती निवडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी ११ महिने घेतले आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ६ आणि ७ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. या दूरगामी सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासले जाणे आवश्यक आहे. मी सभागृहाच्या कार्यपद्धती/कार्यवाहीच्या बाबतीत त्याच्या विशेषाधिकारावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत; तथापि, घटनेच्या कलम २०८ मध्ये नमूद केल्यानुसार प्रथमदर्शनी असंवैधानिक आणि बेकायदेशीर वाटणाऱ्या प्रक्रियेला संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.

तुमच्या पत्राचा असंयमी टोन आणि धमकावणारा सूर पाहून मी वैयक्तिकरीत्या खूप दु:खी झालो आहे. ते पत्र संविधानचं सर्वोच्च पद असलेल्या राज्यपालाचा अपमान आणि बदनामी करणारं आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -