Avinash Bhosale : रिक्षाचालक ते रिअल इस्टेट किंग, कोण आहेत अविनाश भोसले?

पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale Arrested) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल (DHFL) बॅंक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून अविनाश भोसले यांचा शोध सुरू होता. ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. तसेच त्यांच्या घरावर छापेमारी (Raid) केली होती.

ईडीनं गेल्या वर्षी अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती जप्त केली होती. अविनाश भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. सीबीआयने अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३० एप्रिल रोजी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा : ईडीने अविनाश भोसलेंच्या मुलाचा नोंदवला जबाब, ६ ते ७ तास कसून चौकशी

रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे किंग…

नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. रास्ता पेठ भागात ते भाड्याच्या घरात राहायचे होते. कालांतरानं त्यांनी रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे भोसलेंची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तिंशी झाली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटं मिळू लागली. पुण्यातील बाणेरमध्ये भोसलेंचा व्हाईट हाऊस बंगला आहे. हाऊसच्या टेरेसवर भोसलेंच्या मालकीचं हेलिकॉप्टरदेखील आहे.

कोण आहेत अविनाश भोसले?

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशी अविनाश भोसले यांची ओळख आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या एबीआयएल ग्रुपचे मालक असलेले भोसले राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. बांधकाम क्षेत्रासंबंधीत असलेले शिवसेनाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईनंतर ईडीने अविनाश भोसले यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. २००७ मध्ये परदेशातून महागड्या वस्तू आणल्याने आणि परदेशी चलन बाळगल्याने ईडीने अविनाश भोसलेंवर कारवाई केली.

दरम्यान, येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असून, त्यामध्ये कर्जाऊ रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.


हेही वाचा : अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, २४ फेब्रुवारी पर्यंत अटक नाही