घरमहाराष्ट्रअवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी नियुक्त चौकशी समितीची पुनर्रचना

अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी नियुक्त चौकशी समितीची पुनर्रचना

Subscribe

अवनी वाघीण मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या चौकशी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये दोन तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

टी-१ वाघीण अर्थात अवनीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. समितीचे तांत्रिकदृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ आणि बंगळुरूच्या सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानचे संशोधक डॉ. पराग निगम यांची सदस्य म्हणून या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी यवतमाळच्या जंगलामध्ये अवनी वाघिणीला वन अधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार शार्प शूटर शआफत अली यांनी गोळ्या घालून मारले होते. त्या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

अवनी प्रकरणावरून वाद-राजकारण

अवनी वाघिणीला ठार मारण्याची आवश्यकता नव्हती, तिला बेशुद्ध करून देखील भागले असते असा दावा करत अनेकांनी वन अधिकाऱ्यांसोबतच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टार्गेट केलं आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तर थेट या प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. शिवाय विरोधी पक्षांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

- Advertisement -

कशी असेल चौकशी समिती?

या प्रकरणावरून टीका होऊ लागल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवनी वाघीण प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली. या समितीमध्ये वन्य जीव क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी नेमण्यात आलेल्या दोन नव्या सदस्यांसोबत आता या समितीमध्ये सहा तज्ज्ञांचा समावेश झाला आहे. यामध्ये वरील अध्यक्ष, सह अध्यक्ष आणि सदस्यांशिवाय मुंबईच्या वाईल्ड लाईफ कन्झरवेशनचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया आणि भारतीय वन्यजीव संस्थान देहरादूनचे डॉ. बिलाल हबीब यांचा सदस्य म्हणून तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्यास तयार’

अवनीला मारलं की हत्या केली?

सदर समितीकडे टी-१ वाघिणीच्या मृत्यूप्रकरणात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गतच्या तरतुदी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले आहे किंवा कसे? याची खातरजमा आणि तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याप्रकरणी नियमांनुसारच अवनीला मारल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वनअधिकाऱ्यांनी केला आहे. तर काही प्राणीमित्र आणि विरोधकांनी तिला बेशुद्ध करायला हवं होतं असा आक्षेप घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -