Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी गैरसमजातून साहित्यिक विज्ञानापासून दूर

गैरसमजातून साहित्यिक विज्ञानापासून दूर

Subscribe

साहित्य संमेलनात प्रा. डॉ. जयंत नारळीकरांचं अध्यक्षिय भाषण

नाशिक – मराठी साहित्याकडे पाहिले की त्यात विज्ञान साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञानकथालेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत, असे विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांनी केले.

वाचक किंवा श्रोते देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत असा ग्रह बाळगतात असे सांगत डॉ. नारळीकर अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणार्‍या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की, इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे. मराठीचे अपूर्णत्व सर्वांत जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान-साहित्याबाबतीत. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही.

- Advertisement -

आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्वाचे मूलभूत सिद्धान्त ह्या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा ह्या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे ह्या शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवीजीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली.

विज्ञान साहित्य म्हणजे काय? वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये. ‘पंचतंत्र’ ह्या संस्कृत ग्रंथात नीतीने जगण्यास आवश्यक असे शिक्षण रोचक कथांच्या माध्यमातून दिले आहे. विष्णुशर्मा नावाच्या पंडिताने आपल्या काही नाठाळ शिष्यांना शहाणे करण्यासाठी ह्या उद्बोधक कथा सांगितल्या. हे विद्यार्थी सामान्य शालेय शिक्षणास अपात्र ठरले होते; पण ह्या कथामाध्यमातून बरेच काही शिकले. त्याचप्रमाणे विज्ञानाशी फटकून वागणारा सामान्य वाचक विज्ञानकथा माध्यमातून विज्ञानाशी जवळीक साधू शकेल.

- Advertisement -

विज्ञानकथा आणि वास्तविकता फ्रेड हॉयेलचे उदाहरण अशा विरळ उदाहरणांपैकी आहे, जिथे विज्ञानकथा भविष्यदर्शी ठरली. एच. जी. वेल्स, आर्थर सी क्लार्क, रे बॅडबरी आणि आयझक अ‍ॅसीमॉव्ह यांची नावे विज्ञानकथांच्या संदर्भात घेण्यात येतात. कारण त्यांच्या लिखाणात भविष्यातील वास्तवतेचे द्रष्टेपण होते. एका वैज्ञानिक लेखात १९४५ मध्ये क्लार्क यांनी कल्पना मांडली, की पृथ्वीवरील विषुववृत्तावर सुमारे ३८५०० कि.मी. उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणारा कृत्रिम उपग्रह विषुववृत्तावरून पाहताना डोक्यावर स्थिर असेल व त्याचा उपयोग दळणवळणासाठी करता येईल. आज जे ‘माहिती तंत्रज्ञाना’चे अफाट साम्राज्य पसरलेले दिसते, त्यामागे हीच कल्पना आहे. क्लार्कच्या कल्पनेनंतर तर २-३ दशकांत ही कल्पना वास्तविक प्रयोगात रूपांतरित झाली.

१९७६ मध्ये मी एक गोष्ट लिहिली होती (धूमकेतू), ज्यात पृथ्वीशी एका धूमकेतूची टक्कर होण्याची संभावना चर्चिली होती. वर्षभरात होणार्‍या टकरीतून पृथ्वीला व पृथ्वीवासीयांना कसे वाचवायचे? जागतिक स्तरावर वैज्ञानिक एकत्र येऊन धुमकेतूवर अण्वस्त्र धाडायची कल्पना साकार करतात. हे अण्वस्त्र एका अंतराळयानातून धूमकेतूजवळ धाडले जाते व तेथे त्यातून अणुस्फोट घडवून आणला जातो. स्फोटामुळे धूमकेतूला धक्का बसून त्याची दिशा बदलते आणि पृथ्वीवरचे अरिष्ट टळते. त्यानंतर सुमारे १२-१३ वर्षांनी नासापुढे असा प्रश्न आला होता की, जर एखाद्या लघुग्रहांची किंवा धूमकेतूची टक्कर पुढे संभवत असेल तर त्या अरिष्टापासून पृथ्वीचे रक्षण कसे करावे? तेव्हा नासातील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ यांनी सुचवलेला उपाय वरील गोष्टीत वापरल्याबरहुकूम होता. इतकेच नव्हे तर काही वर्षांतच अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘स्पेसवॉच’ नावाचा प्रकल्प चालू केला, ज्यात सौरमालेतील छोट्या मोठ्या वस्तूंची (अशनी, लघुग्रह, धूमकेतू आदि) निरीक्षणे घेऊन त्यांच्या कक्षा ठरवण्यात येतात. उद्देश हा की, जर त्यापैकी एखादी वस्तू पुढेमागे केव्हातरी पृथ्वीवर आपटणार असेल तर त्या संकटाचे निवारण वेळीच करायला वरील मार्ग अवलंबिता येईल.

विज्ञानकथा लिहिण्यास मी का प्रवृत्त झालो? मला असे वाटते, मी खगोलशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सत्य काय आहे आणि कथा-कादंबर्‍यांमध्ये काय सांगितले जाते याची मला जाणीव आहे. पृथ्वीवरचे आपले अस्तित्व ध्यानात घेतले तर हे समजते की, माणूस इवलासा आहे आणि त्याभोवतीचे विश्व अफाट आहे. हे सारे विश्व समजून घेणे तसे खूप अवघड आहे. आपण समजतो, त्यापेक्षा हे विश्व अधिक गूढ आहे. इतकेच काय आम्ही समजू शकू, त्यापेक्षाही ते अधिक गूढ आहे. असे जे.बी.एस. हॉल्डेन म्हणतो. जे स्वत: शास्त्रज्ञ आहेत आणि विज्ञानकथा लिहितात, त्यांना एक फायदा मात्र नेहमी होतो. एखाद्या वैज्ञानिक प्रश्नाविषयी त्यांना जे वाटते, ते आपल्या कथेमध्ये अधिक प्रभावीपणे सांगू शकतात. असे करण्याची मुभा त्यांना या विषयासंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध करताना नसते. शोधनिबंधात तथ्यांवर भर दिला जातो व अटकळींना दुय्यम स्थान असते. मी विज्ञानकथा का लिहितो? दररोजच्या संशोधनाच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून. सामान्य वाचकाला वैज्ञानिक विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा म्हणून. विज्ञानाचे महत्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी. कधी कधी असेपण होते. आपण विमानतळावर बसलेलो असतो आणि जाहीर करण्यात येते की, विमान सुटावयास दोन तासांचा उशीर आहे. यावेळी त्रागा करून घेऊ नका. माझा सल्ला आठवा. वही समोर ओढा आणि लिहायला लागा. आपणही विज्ञानकथा लिहू शकाल, असेही डॉ. नारळीकर म्हणाले.

विज्ञान कथा कशी असावी?

  • दर्जाचे भान ठेवले पाहिजे.
  • उत्कृष्टतेचे वेगवेगळे निकष लावले तर फारच कमी कथा भविष्यद्रष्ट्याच्या निकषात उतरतील.
  • उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याचीही माहिती देणारे असते.
  • हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच असे नाही. पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे.
  • हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोचला की ठरवेलच.
  • विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर ती किती भाष्य करते यावरदेखील अवलंबून असावी.
  • आपले दैनंदिन व्यवहार मिनिट-तास-दिवस-महिना-वर्ष अशा कालमापकांवर चालतात; पण विश्वातील घटना याहून दीर्घ कालावधीच्या असतात. विज्ञानकथांद्वारे हे फरक व्यक्त करता येतील.

निकृष्ठ विज्ञानकथेचे स्वरुप

‘नव्या’ विज्ञानाची पार्श्वभूमी लेखकाच्या दृष्टिकोनातून वाचकांपर्यंत पोचते; पण पुष्कळ विज्ञानकथात विज्ञानाचे मूळ नियम कारण न देता हवे तसे बदलण्यात येतात. काही निकृष्ट विज्ञानकथा वास्तवात भयकथा असतात. अशा कथा खरोखर विज्ञानकथावृक्षाला मारकच म्हटल्या पाहिजेत. त्या वाचताना विज्ञान एक अनाकलनीय पण भीतीदायक विषय आहे असे वाचकाला वाटते. काही कथानकात तर्कशून्य भीतीला वाव नसतो. तसेच काही भुताखेतांच्या भयकथातून अंधविश्वासांना खतपाणी घातले जाते. एखादी विज्ञानकथा व कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे (वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी) निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणांमुळे वाचनीय वाटेल. अशा स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन. आपण जेव्हा विज्ञानसाहित्याचे मूल्यमापन करतो तेव्हा ज्या विज्ञानावर ते आधारलेले आहे ते पण तपासले पाहिजे.

श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून माझ्या लिखाणाचा गौरव केला. पुढे तर मुकुंदराव किर्लोस्कर यांनी भविष्यवाणी केली की, पुढे-मागे मी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवीन. महान व्यक्तींनी खास प्रसंगी केलेल्या वक्तव्यामुळे नवे प्रवाह निर्माण होण्यास मदत होते. मग विज्ञानकथा यापासून अलिप्त कशी राहील?

काही समीक्षक अशी तक्रार करतात की, माझ्या कथेतील पात्रे खूपदा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. या समीक्षकांना माझे उत्तर असे की, इंग्रजी शब्दाचा उच्चार न करता त्यांनी दिवसभर मराठी बोलून दाखवावे. त्यांना कळेल की, काही इंग्रजी शब्द हे दैनंदिन जीवनात अगदी रूढ झाले आहेत. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा विकसित होते, समृद्ध होते असे मला सुचवायचे आहे. आज शुद्ध समजले जाणारे बरेच शब्द कधीकाळी बाहेरूनच आले होते, हे विसरून चालणार नाही. इंग्रजी भाषा विज्ञानाची भाषा म्हणून मान्यता पावलेली भाषा आहे. जगभर ती वापरली जाते आणि म्हणून टी.व्ही., टेलिफोन, फॅक्स, रडार, रॉकेट हे इंग्रजी शब्द कथांमधून वापरले जाणे स्वाभाविक आहे. तज्ज्ञ लोकांच्या समित्या या इंग्रजी शब्दांचे कृत्रिम मराठी भाषांतर देऊ शकतील. पण सामान्य वाचक जर अशा शब्दांना स्वीकारू इच्छित असेल, तर ते शब्द वापरण्यावर बंदी का असावी?

माझ्या धूमकेतूवरील कथेवर टीका करताना एका समीक्षकाने गंमतच केली! त्याच्या मते – ती कथा फ्रेड हॉयेल यांच्या ऑक्टोबर द फर्स्ट इज टू लेट’ या कादंबरीची नक्कल आहे. या टीकेने चकित होऊन मी हॉयेल यांची मूळ कादंबरी लक्षपूर्वक वाचली. माझे कथानक आणि हॉयेलची वैज्ञानिक कल्पना याबाबत कोठे साम्य आहे का, हे तपासून पहिले. माझी कथा आणि फ्रेड हॉयेल यांची कादंबरी यामध्ये एकच साम्य होते, ते म्हणजे ऑक्टोबरची पहिली तारीख October the first! त्या समीक्षकाला भेटण्याचा योग आला. मी त्याला विचारले, ‘आपण फ्रेड हॉयेल यांची मूळ कादंबरी वाचली आहे काय? वाचली असल्यास मी माझ्या कथेचे कथानक त्या कादंबरीतून घेतले हे कशावरून ते आपण सांगू शकाल काय?’ त्यांनी हे मान्य केले की, कादंबरी त्यांनी वाचलीच नव्हती. कादंबरीच्या नावावरूनच त्यांनी असा तर्क केला होता!

एका विद्वानाने विज्ञानकथा या विषयावर प्रबंध लिहिला. या प्रबंधाला एका विद्यापीठाने डॉक्टरेटही बहाल केली. या विद्वानाने पूर्वीच्या समीक्षकांसारखीच चूक केली आहे. मूळ लिखाण वाचण्याचे कष्ट न घेता, ’भारतीय विज्ञानकथा लेखक इंग्रजी विज्ञानकथांमधून कथानक उचलतात!’ असे ठोकून दिले आहे. याचे त्यांनी दिलेले उदाहरण पहा. कॉनन डॉयलच्या शेरलॉक होम्स कथांचा मी खूप चाहता आहे. गंमत म्हणून मी एक प्रयोग केला. होम्स आणि वॉटसन यांना पात्रे म्हणून घेऊन मी विज्ञानकथा लिहिली. मराठी धर्तीवर कथा लिहिताना शैली मात्र कॉनन डॉयलची राहील याची काळजी मी घेतली. अनेक वाचकांना वाटले, मी हे भाषांतरच केले आहे. काही वाचकांनी पत्रे पाठवून मूळ कथेबाबत विचारणादेखील केली. आमच्या समीक्षक विद्वानाने तर कमालच केली. इतर वाचकांपेक्षा त्यांनी एक पाऊल पुढेच टाकले. ती माझी कथा कॉनन डॉयलच्या ‘ओपल टियारा’ या कथेवरून मी घेतली आहे असे जाहीर केले. कॉनन डॉयल यांनी या नावाची कथाच लिहिलेली नसताना त्यांनी हा शोध कसा लावला, हे त्यांनाच ठाऊक. माझी कथा स्पेशल रिलेटिव्हिटी या तत्त्वावर बेतलेली आहे. कॉनन डॉयल तर या विषयावर काहीच लिखाण करू शकला नसता. कारण त्याकाळी आइन्स्टाइनचा सापेक्षतेचा सिध्दान्त प्रचारात नव्हता आणि पुढे देखील हा विषय फार निवडक शास्त्रज्ञांनाच समजत असे.

मी वूडहाऊस यांचासुद्धा खूप चाहता आहे. एक कथा मी वूडहाऊस यांच्या शैलीत सादर केली. अनेकांची येथेसुद्धा फसगत झाली. वूडहाऊस यांच्या ‘बर्टी बुस्टर’ व ’जीव्ज’च्या एका कथेचेच मी भाषांतर केले आहे, असे अनेकांना वाटले. अनेकांनी पूर्वीप्रमाणेच मूळ कथानकाबाबत विचारणादेखील केली. वूडहाऊस यांनी अशी कथाच लिहिलेली नाही, हे समजल्यावर त्यांनी माझ्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

विज्ञानकथा का लिहाव्यात? विज्ञानकथा लिहिताना लेखकासमोर एक विशिष्ट हेतू असू शकेल. त्याला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकांपर्यंत आणायची असेल; पण एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट, ती कल्पना गोष्टीरूपाने मांडता आली तर वाचक ती सहजगत्या आत्मसात करू शकेल, अशी भावना लेखकाला प्रेरित करू शकेल. एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात रंगीबेरंगी करून दिली तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला ‘कुरूप’, ‘कडू’ म्हणण्याचा उद्देश नाही, तर त्याकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे. शाळेत ज्या अनाकर्षक तर्‍हेेने गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जातात, त्यामुळे विज्ञानाबद्दल सामान्य जनमानसात एक प्रकारची भीती वा अनास्था निर्माण झाली आहे.

काही समीक्षकांच्या मते असा एखादा दृष्टिकोन पुढे ठेवून केलेले लिखाण म्हणजे चांगले साहित्य नव्हे. मी अशा समीक्षकांना विचारतो की, एका दृष्टिकोनातून लिहिलेल्या साहित्याला आपण साहित्य मानावयास तयार नसाल, तर मग तुलसीदासाचे ‘रामचरित मानस’ किंवा महाराष्ट्रातील संतवाङ्मय यांना काय म्हणणार आहात? या साहित्याला तुम्ही चांगले साहित्य म्हणणार नसाल, तर चांगल्या साहित्यासाठी तुमचे वेगळे मानदंड कोणते? पुढे जाऊन पूर्णपणे निर्हेतुक असे साहित्य असते का?

– भविष्यातील चित्रे रेखाटताना विज्ञानकथाकार समाजाला काही वैज्ञानिक संशोधनातून उद्भवणार्‍या धोक्यांपासून सावध करू शकतो. मी १९७५-७७ दरम्यान ‘पुत्रवती भव’ ही गोष्ट लिहिली होती. त्या गोष्टीत गर्भाचे लिंग ठरवता येण्याची क्षमता मिळाली तर काय गोंधळ उडेल याचे वर्णन केले होते. गर्भलिंग निदानामुळे तशीच परिस्थिती उद्भवलेली आपण पाहतो. गर्भ कन्येचा असल्यास तो पाडण्याचे क्रूर काम होऊ नये म्हणून कायदा करावा लागला

एका अमेरिकन विज्ञानकादंबरीत अंतराळयाने काही वर्षांत आपल्या आकाशगंगेच्या एका टोकाकडून दसर्‍या टोकापर्यंत जाताना दाखवली आहेत. भौतिकशास्त्राच्या सापेक्षतावाद सिध्दान्ताप्रमाणे जगात जास्तीत जास्त वेगाने धावू शकतो तो प्रकाश. प्रकाशकिरणे आकाशगंगेच्या चकतीवजा आकाराला त्याच्या व्यासाइतके अंतर ओलांडायला एक लाख वर्षे घेतात! याचा अर्थ विज्ञानकथेतील याने प्रकाशाच्या हजार-दहा हजार पटीने अधिक वेगाने धावू शकतात. इतकी वेगवान याने बनवण्याचे तंत्रज्ञान कोणते? त्यांना सापेक्षतेचा वरील नियम मोडणे शक्य कसे झाले, त्यातून प्रवास करणार्‍या लोकांच्या शरीरधर्मावर इतक्या वेगाचा काय परिणाम होतो, इत्यादी प्रश्नांना लेखकाने पूर्णपणे बगल दिली आहे. अशी ही गोष्ट वाचताना आपण विज्ञानकथा न वाचता परीकथा वाचतोय असे वाटते. परीकथेत एखादी परी राजपुत्राला जादूचे बूट देते, जे घालून तो क्षणार्धात कितीही लांब जाऊ शकतो. याच कारणास्तव मला ‘स्टार वॉर्स’ सारख्या फिल्म्सना विज्ञानकथाधारित म्हणावेसे वाटत नाही. त्यातील अंतराळयाने, विचित्र जीवजंतू, महाभयंकर शस्त्रास्त्रे यांचा मुलामा काढला तर राहते ती सामान्य ‘वेस्टर्न’ फिल्म!

अंतराळयुगातल्या अंधविश्वासांना खतपाणी घालणार्‍याही काही कथा असतात. ’बर्मुडा त्रिकोण’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या भूप्रदेशात अनाकलनीय असे काही घडत नाही, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे; तरी इथे काहीतरी गूढ शक्ती आहे किंवा इथे परकीय जीव पृथ्वीवर ढवळाढवळ करण्यासाठी लपून बसले आहेत, अशा कथानकांचा सुळसुळाट दिसतो. त्यात भर पडते उडत्या तबकड्यांची. अशा यानातून परकीय जीव येऊन पृथीवर लहानमोठी संकटे आणतात ही भावना कुठलाही पुरावा नसताना जनमानसात घर करून राहिली आहे. तिला दुजोरा देण्याचे काम अशा विज्ञानकथा करतात.

अन् मी विज्ञानकथा लिहू लागलो !

१९७४ साली अहमदाबाद येथे एक परिसंवाद होता. एका नामवंत वैज्ञानिक संस्थेने त्या परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवादातील वक्ता श्रोत्यांना झोप आणण्याचे काम चोख बजावत होता. अगदी थोडे श्रोते व्याख्यान ऐकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. मी मात्र त्या व्याख्यानाचा नाद केव्हाच सोडून दिला होता. पण मग वेळ कसा घालवायचा? नेमक्या अशाच एका क्षणी मला असे वाटले, आता आपण कथालेखन का सुरू करू नये? परिसंवादाच्या संयोजकांनी पुरविलेले कागद मी पुढे ओढले आणि लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी वक्त्याचा गोड गैरसमज झाला असेल की मी त्याच्या लेक्चरच्या नोट्स उतरवत आहे. ‘कृष्णविवर’ ही कथा प्रकाशात आली ती अशी.

विज्ञानकथा लिहिण्याचा तो माझा पहिलाच प्रयत्न होता. ही कथा मी मराठीत लिहिली. मराठी विज्ञान परिषद, मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या विज्ञानकथा स्पर्धेसाठी कथा पाठवावी, असा विचार माझ्या मनात घोळत होता. स्पर्धेच्या संयोजकांनी कथेच्या लांबीबद्दल, शब्दसंख्येबद्द्ल ज्या अटी घातल्या होत्या, त्यामध्ये माझी ही कथा बसत होती. मी प्रवेशपत्रिका भरली ती मात्र कचरतच. ‘नारायण विनायक जगताप’ या नावाने मी प्रवेशपत्रिका भरली. मी धारण केलेल्या नावाची आद्याक्षरे माझ्या खर्‍या नावाच्या आद्याक्षरांच्या बरोबर उलट्या क्रमाने होती. मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी माझे नावच काय तर हस्ताक्षर ओळखतील, अशी भीती वाटल्याने मी ती कथा माझ्या पत्नीस लिहून काढण्यास सांगितली व स्पर्धेसाठी एका वेगळ्या पत्त्यावरून पाठवून दिली. माझ्या त्या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले हे जेव्हा मला समजले तेव्हा मला सुखद धक्का बसला. मी विज्ञानकथा लिहू शकतो, याचे समाधान झाल्यामुळे मी त्यापुढे आणखी कथालेखन करण्याचा विचार फार गांभीर्याने न करता तेथेच थांबणार होतो. पण मला अनपेक्षित अशी एक घटना घडली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -