घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? दिल्लीत फडणवीस-अमित शाह यांची भेट

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? दिल्लीत फडणवीस-अमित शाह यांची भेट

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचा एकमेकांना भेटण्याचा सिलसिला अचानक वाढला आहे. मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी ही भेट झाली असली तरी त्याची माहिती आता समोर आलीय. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ दोन तास बैठक सुरू होती. या बैठकीत ऑपरेशन लोटसची चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून २० मिनिटे चर्चा झाली. दिल्लीतील या चर्चेनंतर फडणवीस तातडीने महाराष्ट्रात परतले होते. त्यानंतर महाराष्ट्रामधील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपचे मोजके महत्वाचे नेते उपस्थित होते, असे कळते.

प्रताप सरनाईक अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्यानंतर अनिल परब तसेच मिलिंद नार्वेकर ईडीच्या रडारवर आहेत. महाविकास आघाडी सरकारभोवती ईडीचा फास आवळत नेत शेवटी विरोधकांना भाजपशी जुळवून घेण्यास भाग पाडण्यात येईल. या घटकेला काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याभोवती तपास यंत्रणा फिरणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली असल्याचे कळते. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एका पक्षाला गळाला लावून भाजप सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात विरोधकांकडे बहुमत असताना त्यांचे आमदार फोडून भाजपने ऑपरेशन लोटस यशस्वी केले होते. मात्र, महाराष्ट्रात विरोधी आमदार फुटण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेना किंवा राष्ट्रवादी यापैकी एका पक्षालाच सोबत घेऊन पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा भाजप विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

मी नागपूरमधील कामाकरिता दिल्लीला गेलो होतो- फडणवीस
‘मी दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलो की पतंगबाजी सुरू होते. मी दिल्लीत गेलो होतो. नागपूरचे एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. धर्मेंद्र प्रधान यांची भेट घ्यायची होती. त्यांच्या भेटीला उशिर होता म्हणून अमित शहा यांना फोन केला. तर त्यांनी १५ मिनिटे आहेत, भेटायला येऊ शकतो म्हणून सांगितले. त्यामुळे त्यांची भेट घेतली. मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर पतंगबाजी होते. आज दिवसभर ही पतंगबाजी सुरू होती. त्यामुळे माझे मनोरंजन झाले’, असे फडणवीस म्हणाले.

ईडीच्या कारवाईचे समर्थन
फडणवीस यांनी जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे समर्थन केले. कोर्टाच्या आदेशानुसारच ही कारवाई झाली आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही चौकशी झालेली नाही. जरंडेश्वर कारखान्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी हायकोर्टाने पोलिसांना एफआयआर दाखल करण्याची सूचना केली होती. हे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यात मनी लॉन्ड्रिंगचा अँगल होता. त्यावेळी ईडीने ईसीएआयआर दाखल केला होता. त्यानुसार ईडीची चौकशी सुरू आहे. त्यावेळी आमचे सरकार होते; पण तरीही ही चौकशी कोर्टाच्या आदेशानेच होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -